सत्ता ही गुळाच्या ढेपेसारखी असते आणि पाशवी बहुमत असलेली सत्ता ही तर मधात घोळविलेल्या गुळाच्या ढेपेसारखी असते. भारतीय जनता पक्षाला गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पाशवी बहुमतानंतर, या ‘मधात घोळविलेल्या’ गुळाला चिकटण्यासाठी असंख्य मुंगळ्यांच्या रांगा लागल्या. केंद्रापासून राज्यापर्यंत असंख्य राजकारण्यांच्या गळ्यात भाजपचे गमछे आणि डोक्यावर कमलयुक्त टोप्या दिसू लागल्या. या टोपीखालची राजकारणात मुरलेली डोकी त्याआधी वेगवेगळ्या राजकीय विचारांची असली, तरी मधाने माखलेल्या गुळाचा वास लागताच अनेकांना भाजपमध्ये देशाचा तारणहार दिसू लागला होता. देशाची चिंता आणि राष्ट्रीयत्वाचा विचार हे अनेकांचे दाखवायचे दात असले, तरी सत्ता हे खायचे दात असल्याने, भाजपमधील आयारामांच्या लोंढय़ांबद्दल पितृसंस्थेतील अनेक सच्चा संघीयांना चिंताही वाटू लागली होती. आता केंद्रातील सत्तेचा कार्यकाल निम्म्यावर येऊन ठेपल्यानंतर परिस्थितीचे भान येऊ लागल्याप्रमाणे अनेकांचे पाय जमिनीवर येऊ लागले आहेत. केंद्रातील भाजप सरकारवर सुरू असलेली चौफेर टीका आणि सत्ताधीशांविषयीच्या समजुतीचे विरोधकांकडून आक्रमकपणे पुढे आणले जाणारे वास्तव यामुळे अनेकांचे राजकीय आडाखे बदलू लागले आहेत. खोल समुद्रातून सफर करणाऱ्या जहाजावरील उंदरांना वादळाची पहिली चाहूल लागते असे म्हणतात. भाजपचे जहाज आता पहिल्या सत्ताकाळाच्या समुद्रात निम्म्यावर आलेले असताना, पक्षात जे काही सुरू झाले आहे, त्यावरून या सिद्धान्ताची आठवण होणे अपरिहार्यच आहे. केंद्रात पाशवी बहुमताची सत्ता मिळविणाऱ्या भाजपला गेल्या दोन वर्षांत एकाही राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळू शकली नाही आणि पुढे होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या राज्यांतील विधानसभेतही या पक्षाच्या कामगिरीची कसोटी लागणार आहे. दिल्लीत भाजपला अक्षरश: धूळ चारणाऱ्या आम आदमी पक्षाच्या पंजाबातील मुसंडीमुळे भाजपची चिंता वाढलेली असतानाच, पक्षाचा बोलघेवडा मोहरा असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकल्याने पक्षाला धक्का बसला आहे. सिद्धू यांच्या नाराजीचे सूर राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान पक्षात उमटू लागले होतेच. राजकारणातील नाराज बडे मासे पकडण्यासाठी अनेक जण गळ टाकून बसलेलेच असतात. सिद्धू यांच्यासारखा ‘बडा मासा’ आम आदमी पक्षाच्या गळाला लागून पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची स्वप्नेदेखील पाहू लागला आहे, तर दिल्ली-जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील वादातून अरुण जेटली यांच्यावरच थेट हल्ला करणारे कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर त्यांची पत्नीही सिद्धू यांच्या पावलावर पाऊल ठेवत आम आदमी पक्षाच्या वाटेवर आहे. भाजपच्या पाशवी बहुमताच्या सत्तेची मधात घोळविलेल्या गुळाची गोडी कमी होत चालल्याचे हे संकेत असावेत. यशवंत सिन्हा यांच्यासारखा नेता पक्षापासून अंतर राखून आहे, तर शत्रुघ्न सिन्हा कधीपासूनच नाराज आहेत. पक्ष आणि सरकारमधील सत्ताकेंद्रांविषयी उघड नाराजीचे सूर वाढू लागले आहेत, तर भाजप हा मोदी यांचा ‘वन मॅन शो’ असल्याची टीका करणाऱ्या अरुण शौरी यांना ‘नवा केजरीवाल’ ठरवण्याचे खेळ सुरू झाले आहेत. ईशान्येकडील राज्यांतील पक्षांतर्गत धुसफुस शमविण्यासाठी राम माधव यांना कसरत करावी लागत आहे. एकंदरीत, प्रचंड संख्याबळ गाठीशी असतानाही, नाराजांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने प्रवासाच्या पहिल्या टप्प्यातील निम्म्या वाटेवर पोहोचलेल्या पक्षाच्या जहाजाला सावरण्याची नवी जबाबदारी आता मातृसंस्थेच्या शिरावर येऊन पडणार आहे. शिवाय, गुळाची ढेप नव्या मधात घोळवून गोडी वाढविण्यासाठी भाजपचे ‘शहा’णे नेतृत्व कामाला लागलेही असेलच..