माओच्या विचारात धर्माला स्थान नाही, धर्म हाच आमचा शत्रू आहे, असे सांगत आजवर दलित, शोषित, पीडित व आदिवासींची बाजू घेणाऱ्या नक्षलवाद्यांनी परवा एका ख्रिश्चन धर्मगुरूला ठार करून चळवळीतील वैचारिक फोलपणा दाखवून दिला आहे. हिंसेच्या नादात तत्त्व व विचारांना तिलांजली देण्यात ही चळवळसुद्धा मागे नाही हे तेलंगणात घडलेल्या या घटनेतून स्पष्ट झाले आहे. सात राज्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या दंडकारण्याच्या जंगलात नक्षलवादी ज्या काळात जम बसवत होते, त्याच काळात ख्रिश्चन मिशनरीचे कामसुद्धा या भागात वेगाने पसरले. एकीकडे हिंसा तर दुसरीकडे शांतीचा संदेश देणारा हा समांतर प्रवास एकमेकांत अडथळा न आणता सुरळीतपणे सुरू राहिला. चळवळीच्या प्रभावक्षेत्रातील आदिवासींच्या धर्मातराच्या मुद्दय़ावर आक्षेप घेणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांनी मध्यंतरी, नक्षल व मिशनरींत साटेलोटे आहे असे आरोप केले होते. या आरोपांना महत्त्व न देता राज्यकर्त्यांच्या धर्मवेडेपणावर सतत टीका करणाऱ्या नक्षलवाद्यांनी, आता मात्र अल्पसंख्य ख्रिश्चनांना लक्ष्य करून आपल्या आधीच्या भूमिकेलाच छेद दिला आहे. २००८ मध्ये ओदिशातील कंधमालला जातीय दंगली झाल्या. यामुळे अस्वस्थ झालेला स्थानिक नक्षलनेता सव्यसाची पांडाने विहिंपचे नेते लक्ष्मणानंद सरस्वती यांना ठार मारले. यावरून मोठा गदारोळ उठल्यानंतर चळवळीने या पांडाला पदावनत केले होते. नंतर याच पांडाने २०१३ ला नक्षलप्रमुख गणपतीला एक जाहीर पत्र लिहून ख्रिश्चन धर्मप्रसार व धर्मातराबाबत भूमिका का घेत नाही, असा सवाल केला होता. त्याला उत्तर देताना नक्षल नेता गणपतीने प्रसार किंवा धर्मातर हा आदिवासींच्या प्रश्नावरचा अंतिम उपाय नाही, असे उत्तर दिले होते व यात न पडणेच इष्ट असे सांगत पांडाची हकालपट्टी केली होती. या साऱ्या जाहीर सवाल-जबाबावर मौन पाळणाऱ्या ख्रिश्चन मिशनरींना आता नक्षलवाद्यांनी लक्ष्य केल्याने या चळवळीची वैचारिक बांधिलकी नेमकी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘हत्या केलेला धर्मगुरू पोलीस खबऱ्या होता, म्हणजेच माओच्या भाषेत वर्गशत्रू होता व वर्गशत्रूला जात, धर्म नसतो’ असा युक्तिवाद कदाचित नक्षली करतीलही पण तोही तकलादू आहे. कारण खबरे कोण व कुणाची हत्या करायची या बाबतीत नक्षलवादी अनेकदा अगदी तोलूनमापून निर्णय घेत आले आहेत.  या चळवळीच्या वर्तुळात ख्रिश्चन धर्मप्रसाराचा मुद्दा अनेकदा चर्चिला जातो. हा धर्म गाव ते रोम असा संघटित असल्याने त्याला लक्ष्य करून चालणार नाही अशी उत्तरे देऊन या चर्चा थांबवल्या जातात व चळवळीतील आदिवासी तरुणांना शांत केले जाते. पांडाच्या पत्रातच हा घटनाक्रम नमूद आहे. एकीकडे धार्मिक दंगलीत हस्तक्षेप केला म्हणून पांडावर कारवाई करायची व दुसरीकडे धर्मगुरूचा गळा चिरायचा हा नक्षल्यांचा दुटप्पीपणा यातून उघड झाला आहे. ओदिशात ख्रिश्चन समुदायावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा याच नक्षलवाद्यांनी हिंदुत्ववाद्यांवर टीका करणारी पत्रके प्रसिद्धीला दिली आहेत. तेव्हा असंघटित व अल्पसंख्याकांची बाजू घेत यातूनच शोषणाविरुद्धची क्रांती समोर जाईल, असा आशावाद व्यक्त करणारे नक्षलवादी या हत्येचे समर्थन कसे करणार, हा खरा प्रश्न आहे. एकीकडे धार्मिक उन्मादाला विरोध करायचा व दुसरीकडे अल्पसंख्याकांचे गळे चिरायचे हे या चळवळीचे खरे रूप समजायचे का, हाही एक प्रश्न आहेच. या हत्येमुळे आजवर कायम हिंदुत्ववादी गटांचे लक्ष्य असणाऱ्या ख्रिश्चन समुदायालासुद्धा नक्षली हिंसाचाराच्या प्रश्नावर भूमिका घ्यावी लागणार आहे. शोषणाविरुद्ध आवाज उठवत दलित, आदिवासी व अल्पसंख्याकांची सहानुभूती मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या नक्षलवाद्यांचे खरे उद्दिष्ट हिंसाच आहे हे या हत्येने पुरते स्पष्ट केले आहे.