05 April 2020

News Flash

नक्षल-हिंसेची इशाराघंटा?

दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की नक्षलींच्या प्रभावक्षेत्रात सुरू होणारे जवानांचे मरणसत्र गेल्या कित्येक दशकांपासून थांबायला तयार नाही.

नक्षल्यांनी गेल्या शनिवारी शेजारच्या छत्तीसगडमधील बस्तरमध्ये पुन्हा १७ जवानांना ठार केले.

दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली की नक्षलींच्या प्रभावक्षेत्रात सुरू होणारे जवानांचे मरणसत्र गेल्या कित्येक दशकांपासून थांबायला तयार नाही. नक्षल्यांनी गेल्या शनिवारी शेजारच्या छत्तीसगडमधील बस्तरमध्ये पुन्हा १७ जवानांना ठार केले. हे जवान मारले गेले हे पोलीस यंत्रणेला कळायला २४ तास लागले. यावरून नक्षलींच्या बीमोडासाठी दुर्गम भागात गेली अनेक दशके वास्तव्य करून असणारी ही यंत्रणा किती गाफील आहे याचीच प्रचीती आली. सुकमा जिल्ह्य़ातील चिंतागुफाचा हा परिसर ‘जगातील सहावी हिंसक संघटना’ अशी ओळख असलेल्या नक्षलींचा गड म्हणून ओळखला जातो. देशात नक्षलींकडून सर्वाधिक जवान याच भागात मारले गेले आहेत. ही वस्तुस्थिती ठाऊक असूनही पोलीस व निमलष्करी दलाची यंत्रणा या भागात शोधमोहीम राबवताना कसलीही काळजी घेत नाही. वारंवार सांगूनसद्धा मानक कार्यपद्धतीचे पालन करत नाही. वारंवार घटना घडूनसुद्धा या यंत्रणेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले गृह खाते चुकांची पुनरावृत्ती थांबवायला तयार नाही, हे सारेच संतापजनक आहे. या हल्ल्यात मारले गेलेले बहुतांश जवान राज्य पोलीस दलाच्या विशेष पथकातील आहेत. शरण आलेल्या नक्षलींचा समावेश करून हे पथक उभारले गेले. याचाच अर्थ या पथकाला या दुर्गम भागाची खडान्खडा माहिती होती. तरीही ते नक्षलींच्या सापळ्यात अडकले. हे हलगर्जीपणामुळेच घडू शकते. दरवर्षी मार्च सुरू झाला की नक्षली टॅक्टिकल काउंटर अफेन्सिव्ह कॅम्पेन (टीसीओसी) राबवतात. या काळात ते इतर वेळच्या तुलनेत बरेच आक्रमक असतात. गेल्या वर्षी या काळात याच भागात नक्षलींना एकही हल्ला करता आला नाही. त्यामुळे यंदा त्यांच्याविरुद्ध मोहीम राबवणारे जवान गाफील राहिले व त्याचा फायदा नक्षलींनी उचलला. २०१८ मध्ये याच भागात नक्षलींनी एवढय़ाच जवानांना ठार केले होते. अति आत्मविश्वास बाळगणाऱ्या या जवानांचे या वास्तवाकडे दुर्लक्ष झाले. ‘शहीद दिना’च्या ४८ तास आधी १७ जवानांना जीव गमवावा लागला. अलीकडच्या काही वर्षांत नक्षलींचा हिंसाचार कमी झाला. त्यामुळे या चळवळीचे कंबरडे मोडले अशी धारणा केंद्र व बहुतांश राज्य सरकारांनी करून घेतली आहे. हे आकलन किती चूक आहे हे ताज्या हल्ल्याने दाखवून दिले. ही समस्या हाताळण्याची जबाबदारी केंद्र व राज्यांची असली तरी, नक्षलींचे आंतरराज्यीय स्वरूप पाहता केंद्राचा सहभाग महत्त्वाचा आहे. तरीही सध्याचे भाजप सरकार याकडे गांभीर्याने बघते आहे असे कधीच दिसले नाही. नवे गृहमंत्री अमित शहा यांनी तर एकदाही नक्षलग्रस्त भागाला भेट दिली नाही. पदभार स्वीकारल्यानंतर अशी भेट देण्याचा रिवाजसुद्धा त्यांनी मोडला. यावरून त्यांना ही समस्या सोडवण्यात अजिबात रस नाही, असाच संदेश गेला. उलट हेच सरकार ‘अर्बन नक्षल’च्या प्रकरणात मात्र भलताच रस घेताना सर्वाना दिसले. मुळात नक्षलवाद एकच असला तरी शहरी नक्षलींच्या नावाने चांगले राजकारण करता येते. विरोधकांवर आरोप करता येतात! नक्षलसारख्या गंभीर प्रश्नांवर राजकारण करणेच चूक, पण या सरकारचा कल त्याकडेच जास्त असल्याचा फायदा भविष्यात ही चळवळ उचलेल यात शंका नाही. मध्यप्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगड यांनी राज्यांचा मिळून या चळवळीने नव्याने तयार केलेला एमएमसी झोन व त्याला अलीकडच्या काळात मिळालेली संघटनात्मक बळकटी आणि त्याकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष, या पाश्र्वभूमीवर झालेला हा हल्ला भविष्यातील हिंसक घटनांची इशाराघंटाच वाजविणारा आहे. त्यापासून सरकारे बोध घेणार का हाच यातील कळीचा मुद्दा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 1:05 am

Web Title: naxalite attack in sukma chhattisgarh violence warning bell
Next Stories
1 विस्कटलेले क्रीडाविश्व
2 अपात्र ‘आयाराम’ की अध्यक्षही?
3 इस्रायलमध्येही ‘महाविकास’!
Just Now!
X