25 June 2019

News Flash

गुणवंतांचा गुंता!

ती सगळी मुले अतिहुशार ते हुशार या श्रेणीतील आहेत

ती सगळी मुले अतिहुशार ते हुशार या श्रेणीतील आहेत; म्हणजे त्यांच्या हुशारीशी सामान्यत: स्पर्धा करणे फारच अवघड. यंदा झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात महाराष्ट्रातील अशा ८१ हजार विद्यार्थ्यांना यंदा वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. एवढी मुले उत्तीर्ण होऊनही उत्तीर्ण होणाऱ्यांच्या प्रमाणात महाराष्ट्र अगदीच मागे, म्हणजे खालून चौथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक महाराष्ट्राचा निकाल ३९.५७ टक्के, तर पहिल्या क्रमांकावरील दिल्लीचा निकाल ७४.९ टक्के. तरीही पात्र विद्यार्थ्यांची संख्याही याच राज्यात आहे. राज्यातील उत्तीर्ण झालेल्या मुलांचे पर्सेटाईल किमान ४० एवढे तरी आहेच, म्हणजे ही सगळी मुले हुशार आहेत यात शंकाच नाही. पण या सगळ्या मुलांपैकी केवळ सुमारे साडेसात हजार मुलांनाच वैद्यकीय विद्याशाखेच्या कोणत्या तरी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकणार आहे. आयुष्यात काहीतरी उत्तम कामगिरी करण्याची जिद्द मनाशी बाळगून कठोर परिश्रम करणाऱ्या या मुलांचे हे यश अशा रीतीने मातीमोल होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी असलेल्या जागा अतिशय कूर्म गतीने वाढत आहेत. यंदा त्यात केवळ शंभर जागांची भर पडली आहे. शासकीय, खासगी महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांमध्ये असलेल्या या जागा वाढत नाहीत, याचे कारण तेथे पुरेशा शैक्षणिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करणे आवश्यक असते. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने अध्यापकांच्या अपुऱ्या संख्येबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली. परंतु महाराष्ट्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा काही पुरेशा प्रमाणात वाढत नाहीत. राज्यातील एकूण आरोग्यव्यवस्था आजारी पडलेली असताना, नव्याने डॉक्टर निर्माण करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. परंतु आजवरच्या सगळ्या सरकारांनी शिक्षणावरील खर्च अनुत्पादक असल्याचे समजून त्यात सातत्याने कपात केली. हुशार मुलांची जर ही गत असेल, तर ३५ ते ८० टक्के गुण मिळालेल्या प्रचंड संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य किती काळवंडलेले असेल, याची कल्पनाच केलेली बरी. नीटच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांस मिळालेले पर्सेटाईल  ९९.९९९९२९१, तर पन्नासाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला मिळालेले पर्सेटाईल  ९९.९९४९६७२ एवढे आहेत. कमालीची चुरस असलेल्या या परीक्षेत प्रचंड मिळालेले यश अवघ्या काही हजारांशाने मिळाले आहे. आता या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा म्हटले, तरी त्यांच्यासाठी पुरेशा जागाच उपलब्ध नाहीत. मग या विद्यार्थ्यांनी करायचे तरी काय? तर पुन्हा एकदा नीट परीक्षेला बसायचे, त्यासाठी पुन्हा या वेळेपेक्षा अधिक कसून अभ्यास करायचा आणि आपले नशीब अजमावायचे किंवा अन्य राज्यांतील वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्याची वाट पाहायची. गेल्या महिनाभरात दक्षिणेकडील राज्यांच्या शिक्षण संस्थांनी याबाबतच्या जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. तेथे प्रवेशासाठी जागा शिल्लक आहेत आणि महाराष्ट्रात मात्र ७३ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी नर्सिग किंवा वैद्यकपूरक अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध असले, तरी त्याबाबत समाजात एकूणच नकाराची भावना आहे. एवढय़ा संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे प्रवेश मिळण्यासाठीच्या किमान गुणांच्या टक्केवारीतही वाढच झाली आहे. हे सगळे चित्र केवळ अस्वस्थ करणारे आणि म्हणूनच दुर्दैवी आहे. महाराष्ट्राने या सगळ्याचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळही आता टळून गेली आहे!

First Published on June 7, 2019 2:09 am

Web Title: neet exam result 2019