इतिहासाचे पुनर्लेखन करणे, हे मुळात आक्षेपार्ह मानले जाऊ नये. अखेर तीही एक अभ्यासशाखा असल्याने तिथेही बदल घडत राहणे, नवे निष्कर्ष निघणे हे अप्रामाणिक नव्हे.  इतिहास-अभ्यासाची शिस्त न पाळणे, आनुषंगिक प्रश्न विचारातच न घेता इतिहासाबद्दलचा एखादा निष्कर्ष जाहीर करणे, अशा प्रकारे केलेल्या इतिहासकथनामागे तात्कालिक वा क्षुद्र हेतू असणे, हे दोष इतिहासाच्या अभ्यासात असतील, तर अभ्यासकावर अप्रामाणिकपणाची शंका घेणे रास्त आहे. इतिहासकथनाचा वापर अस्मिता फुलवण्यासाठी इतरांनी करणे, हे अटळ असते; परंतु इतिहासकाराचेच उद्दिष्ट अस्मिताधारित असल्यास तसल्या इतिहासाला अभ्यासाचा मान मिळत नाही. इतिहासलेखनाबद्दलची ही सर्वज्ञात तथ्ये प्रा. ठाकूरप्रसाद वर्मा यांच्या नव्या संशोधनाबाबतही नक्कीच लागू पडतात. रा. स्व. संघाशी संबंधित अशा ‘विश्व हिंदू परिषद’ व ‘अखिल भारतीय इतिहास-संकलन योजना’ (अभाइसंयो) यांत बनारस हिंदू विद्यापीठातून निवृत्तीनंतर सक्रिय  झालेले प्रा. वर्मा हे ‘अभाइसंयो’च्या अध्यक्षपदी असताना ‘भारतीय दृष्टीनेच भारतीय इतिहासलेखना’च्या अनेक प्रकल्पांचे ते सहलेखक ठरले असून त्यांनी स्वत: लिहिलेले अनेक निबंध लिपीवाचनाशी संबंधित होते. ‘विहिंप’साठी त्यांनी केलेले मोठे काम म्हणजे, ज्याचे मंदिर अयोध्येतील उद्ध्वस्त मशिदीच्या जागी विहिंपला उभारायचे आहे त्या रामलल्लाचा ‘सखा’ म्हणून २००२ ते २०१० या काळात प्रा. वर्मा हे अलाहाबाद उच्च न्यायालयामधील खटल्याचे एक दावेदार होते. नवहिंदुत्ववादी म्हणविण्यास पुरेसे गुण प्रा. वर्मा यांच्याकडे आहेत, हे सिद्ध करणारी माहिती आजवर दुर्लक्षणीयच ठरली असती; परंतु इसवी सनापूर्वी ३३०० ते इ.स.पूर्व १७०० च्या सिंधुसंस्कृतीमधील ‘मोहेंजोदडोची ‘नर्तिका’ ही नर्तिका नसून देवी पार्वती होय’ असे त्यांचे प्रतिपादन केंद्र सरकारचा पाठिंबा असणाऱ्या ‘भारतीय इतिहास संशोधन परिषदे’च्या ‘इतिहास’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले असून त्याचे आधार समजून घेण्यासाठी हा वैयक्तिक तपशील उपयोगी पडावा. ‘अभाइसंयो’च्या तब्बल १८ जणांची वर्णी ‘भारतीय इतिहास संशोधन परिषदे’वर पदाधिकारी म्हणून २०१५ पासून लागलेली असल्याने, ‘हा निबंध ज्याअर्थी परिषदेच्या पत्रिकेत आला त्याअर्थी तो योग्यच ठरतो’, यांसारखी स्वयंसिद्ध विधानेही जपूनच करावी लागतील. विवस्त्र नर्तिकेच्या या छोटेखानी शिल्पाला ‘देवी पार्वतीची मूर्ती’ ठरवताना, १९३१ मध्ये एका युरोपीय तज्ज्ञाने केलेल्या ‘सिंधु संस्कृतीच्या शिक्क्यांमध्ये शंकराचे पूर्व-रूप (प्रोटोटाइप) सापडते’ या विधानाचा आधार प्रा. वर्मा यांनी घेतला आहे; पण त्यांनी जे आधार नमूद केलेले नाहीत, त्यापैकी मोठा आहे तो ‘वेदकाळ हा इसवी सनपूर्व १५००- ११०० असा नसून खरा वेदकाळ सिंधुसंस्कृतीच्याही आधीचा : इ.स.पूर्व ६००० ते इ.स.पूर्व ५००० असा आहे’ या  निष्कर्षांचा. सिंधुसंस्कृतीला ‘वैदिकोत्तर’ ठरवले की मग ‘शिवपूजक सिंधुसंस्कृती’ असा प्रचारही पुढे नेता येतो. त्यापुढील उडी आता प्रा. वर्मा यांनी ‘पार्वती’चा शोध लावल्याने घेतली गेली आहे. सध्या दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात असलेले हे पुरातन शिल्प पाकिस्तानातच हवे, असा दावा कुणा जावेद अहमद जाफरी नामक पाकिस्तानी वकिलाने लाहोर उच्च न्यायालयात दोनच महिन्यांपूर्वी गुदरला होता. त्या वाह्यात दाव्याला प्रत्युत्तर म्हणून प्रा. वर्मासारख्या ज्येष्ठांनी आपली विश्वासार्हता पणाला लावावी काय? आधुनिक चित्रकारांबाबत ‘हिंदू देवतांची विवस्त्र चित्रे’हा गुन्हा ठरला होता, त्याच न्यायाने ही ‘पार्वती मूर्ती’ संग्रहालयात दाखवण्यावर बंदी येणार का? सिंधुसंस्कृती गणेश-कार्तिकेयही होते का? पार्वतीच्या या मूर्तीची भंगिमा (पोज्म) चोला काळातील वा अन्य कुठल्याही पार्वतीच्या मूर्तीशी अजिबातच का जुळत नाही? आदी प्रश्न पुनर्लेखनानंतरही कायम राहणार आहेत.