राष्ट्रीय अन्वेषण संस्था (नॅशनल इव्हेस्टिगेशन एजन्सी) ही साधीसुधी तपाससंस्था नव्हे. मुंबईतील ‘२६/११’ हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या या संस्थेकडे दहशतवादी कारवायांच्या तपासाचेच काम असल्याने, ‘इंटेलिजन्स ब्युरो’खालोखाल या ‘एनआयए’चे महत्त्व आहे. दहशतवादय़ांच्या मार्गाचा आणि त्यावर मात करण्याचा अभ्यास असलेले अधिकारी मोहम्मद तन्झील हे सीमा सुरक्षा दलातून एनआयएमधील कामगिरीसाठी निवडण्यात आले होते. अर्थातच ते कोणत्या तपास-मोहिमांत सहभागी आहेत याची माहिती गोपनीय होती; परंतु रविवारच्या पहाटे तन्झील यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर बाहेर पडू लागलेल्या माहितीत, पठाणकोट हल्ल्यासंदर्भात त्यांनी काम केले आहे आणि विशेषत: याच हल्ल्याच्या तपासासाठी गेल्याच आठवडय़ात जे पाकिस्तानी तपासपथक पठाणकोटमध्ये आले होते, त्यास पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादय़ांनीच हा हल्ला केल्याचे पुरेसे पुरावे मिळतील असे पाहण्यात तन्झील यांचीही भूमिका होती, असे तपशील उघड झाले आणि हत्येचे गांभीर्य आणखीच वाढले. या पथकाची भेट पूर्ण झाल्यावर १ एप्रिलपासून तन्झील रजेवर गेले. उत्तर प्रदेशातील बिजनौरला घरगुती कार्यक्रमासाठी सहकुटुंब जाण्याचा बेत त्यांनी आखला आणि स्वग्रामाहून दिल्लीकडे परतत असताना हल्लेखोरांनी त्यांची मोटार अडवून, तब्बल २१ गोळ्या झाडल्या. हा घटनाक्रम पाहता हल्ला पूर्वनियोजितच होता, हे उघड आहे. मात्र यामागचे सूत्रधार कोण, हे शोधून काढण्याची जबाबदारी आजवर झालेल्या अन्य सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्यांपेक्षाही अधिक जिकिरीची, अधिक नाजूक, अधिक जटिल आहे. मुळात तन्झील हे काही मुलकी अधिकारी नव्हते. ‘इंडियन मुजाहिदीन’सारख्या, सीमापार लागेबांधे असलेल्या दहशतवादी गटांचा तपास ते करीत होते आणि ‘पठाणकोटशी तन्झील यांचा संबंध नाही’ असे तोंडी खुलासे सोमवारी सुरू झाले असले, तरी त्यांच्या तपासकामाला अडथळा समजणाऱ्या विघातक शक्ती देशातच नव्हे तर देशाबाहेरही असू शकतात हे उघड आहे. लूटमार किंवा वैयक्तिक भांडणासारख्या क्षुद्र हेतूंनी कुणाच्याही हत्या होतात हे खरे, पण तन्झील रजेवर जाण्याची वाट पाहून ही हत्या कशी झाली, हा प्रश्नही उरतो. तेव्हा तन्झील यांच्या मृत्यूचे गूढ लवकर उकलावे, त्यामागील हात कोणाचा हे सर्वासमोर यावे, अशी सदिच्छा व्यक्त करणेच सध्या हाती उरते. अर्थात, हत्येमागे विघातक शक्ती असल्यास त्या केवळ उघड होणे पुरेसे कसे, हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहेच. पठाणकोटला येऊन मायदेशी परतलेल्या पाकिस्तानी तपासपथकाकडे भारताने पुरावे सुपूर्द केले. या पाकिस्तानी पथकातील अधिकाऱ्यांना समोरासमोर बैठकीत भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चाही करण्याची संधी मिळालेली होती. मात्र एवढे झाल्यानंतर मायदेशात ‘आमच्याकडे भारताने पुरावेच दिलेले नाहीत’ अशा उलटय़ा बोंबा या पथकातील अधिकाऱ्यांनीच सुरू केल्या आहेत. ते पुरावे पुरेसे वाटत नसतील, तर हेही म्हणणे मांडण्याची संधी बैठकीमुळे निर्माण झाली होती. त्याऐवजी मायदेशात सहानुभूती मिळवणे किंवा भारतविरोधाचे जुनेच लष्करप्रणीत राजकारण पुढे रेटणे, यासाठी स्वत:चा वापर या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी करू दिला. हे पाक अधिकारी भारतात येताहेत, आपण त्यांना चिकन-बिर्याणी खिलवतो आहोत आदी प्रकारची टीका काँग्रेस व अन्य पक्षांकडून होऊ लागली, तेव्हा सत्ताधारी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी, ‘ही संयुक्त तपासाची पहिलीच वेळ आहे’ अशा शब्दांत जरा सबुरीने घेऊ या, हे सुचवून पाहिले होते. त्या सबुरीपेक्षा मंत्री मनोहर पर्रिकर आणि त्यांच्या संरक्षण खात्यातील अधिकारी यांनी या पाक पथकाशी कमीत कमी संबंध येऊ देण्याचे धोरण ठेवले, ते बरे असे म्हणण्याची पाळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या आडमुठय़ा वक्तव्याने आणली आहे. शेजारी देशाचे हे आडमुठेपण योग्यरीत्या कमी झाले, तर आणि तरच तन्झील यांच्यासारख्या अधिकाऱ्याच्या हत्येचे गूढ हा एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर चर्चेचा विषय होणार नाही.