13 December 2018

News Flash

राजकीय दबावाचे ‘गुजरात मॉडेल’

आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यावर नितीन पटेल हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते.

गुजरातमधील निवडणुकीत शेतकरी आणि पटेल समाजाच्या नाराजीचा भाजपला फटका बसला. त्यातून भाजपला विधानसभेत शंभरी गाठणे शक्य झाले नाही. त्यातच, खातेवाटपावरून भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही हेही समोर आले. आतापर्यंत पटेल (पाटीदार) समाज भाजपच्या मागे ठाम उभा राहात असे. यंदा मात्र गुजरातमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून पटेल समाजाचे आंदोलन आणि या समाजाच्या नाराजीचा भाजपला विशेषत सौराष्ट्रात फटका बसला. ही नाराजी दूर करण्याकरिताच मंत्रिमंडळातील दहा कॅबिनेट मंत्र्यांमध्ये पटेल समाजाच्या सहा नेत्यांचा समावेश करण्यात आला. आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यावर नितीन पटेल हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण  तुलनेत नवख्या नेत्याच्या पारडय़ात वजन टाकण्याची नीती कायम ठेवून पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी विजय रुपानी यांना मुख्यमंत्रिपद दिले. नितीन पटेल यांना तेव्हा उपमुख्यमंत्रिपद देऊन पटेल समाज नाराज होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील पटेल समाजाच्या नाराजीच्या पाश्र्वभूमीवर आपल्याला मुख्यमंत्रिपदच मिळेल, अशी नितीन पटेल यांना अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नाही आणि त्यांना उपमुख्यमंत्रिपदावरच समाधान मानावे लागले. खातेवाटप करताना नितीनभाईंकडे आरोग्य, रस्ते बांधणी अशी तुलनेत कमी महत्त्वाची खाती सोपविण्यात आली. आधीच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे अर्थ, नगरविकास आणि पेट्रोलियम ही महत्त्वाची खाती होती. कमी महत्त्वाची खाती मिळाल्याने नितीनभाई रुसून बसले आणि त्यांनी पदभारच स्वीकारला नाही. अस्मितेचा मुद्दा पुढे करून नितीन पटेल यांनी आपले महत्त्व कमी करून पटेल समाजावरच भाजपने अप्रत्यक्षपणे अन्याय केल्याची भावना बोलून दाखविली. या नाराजीला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळाले. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असल्याने त्यांच्या मान्यतेनेच नितीन पटेल यांचे महत्त्व कमी करण्यात आले असणार हे निश्चितच. मोदी आणि शहा या जोडगोळीची पक्षात कमालीची दहशत असून त्यांना कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करीत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांची काही खैर नसते. गेल्याच आठवडय़ात हिमाचल प्रदेशात प्रेमकुमार धुमल यांनी मुख्यमंत्रिपदासाठी दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. वास्तविक धुमल यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघाऐवजी अन्य मतदारसंघात निवडणूक लढविण्यास पक्षाने भाग पाडले आणि त्यांचा पराभव झाला. या पाश्र्वभूमीवर आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी द्यावी ही त्यांची मागणी होती. भाजप नेतृत्वाने ही मागणी तर फेटाळलीच आणि धुमल यांचा विरोध असलेल्या जयराम ठाकूर यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविले. दबावाचे राजकारण सहन केले जाणार नाही, असा संदेश भाजप नेतृत्वाने दिला होता. पण आठवडाभरातच मोदी व शहा यांना आपल्या धोरणात बदल करावा लागला. गुजरातमध्ये नितीन पटेल यांनी पटेल अस्मितेची भाषा करताच त्यांच्याकडे अर्थ हे त्यांच्या मनाप्रमाणे खाते सोपविण्यात आले. या आधी बिहारमध्ये तिकीटवाटपावरून पक्षाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या आर. के. सिंग या निवृत्त गृह सचिवांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून अपवाद करण्यात आला होता. विकासाच्या ‘गुजरात मॉडेल’बद्दल मोदी विधानसभा प्रचारकाळात बोलले नाहीत. आता दबावाच्या राजकारणाचे ‘गुजरात मॉडेल’ भाजपमध्ये रुजणार की काय, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे.

First Published on January 2, 2018 1:30 am

Web Title: nitinbhai patel gujarat gujarat finance minister narendra modi amit shah