12 December 2017

News Flash

प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर!

आपले नियम आपणच पायदळी तुडवून हवे तसे करणे म्हणजे व्यवस्थेसच आव्हान देण्यासारखे असते

लोकसत्ता टीम | Updated: July 28, 2017 3:47 AM

( संग्रहीत छायाचित्र )

आपले नियम आपणच पायदळी तुडवून हवे तसे करणे म्हणजे व्यवस्थेसच आव्हान देण्यासारखे असते, याचे भान रेल्वे खात्यालाही राहिलेले दिसत नाही. ‘तेजस’ या मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाडीचे आगमनापूर्वीच जे कौतुक सुरू झाले होते, ते रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या जाब विचारण्याने किती फोल होते, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. आधीच रेल्वे खाते तोटय़ात. त्यातून खासगी विमानसेवांनी दरात कपात करून रेल्वेला मोठेच आव्हान दिलेले. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेने जे अनेक प्रयत्न सुरू केले, त्यातीलच एक म्हणजे ‘तेजस’. आलिशान आणि सुखद प्रवासाची हमी देणाऱ्या या प्रवासाच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांनी गोंधळ घालून रेल्वे खात्यास जेरीला आणले होते. गेल्या महिन्यात मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या या रेल्वेगाडीच्या तांत्रिक पूर्ततेसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी आवश्यक होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ती सुरू करण्यात आली. आता सुरक्षा आयुक्तांनी रेल्वे खात्यास सुरक्षा मंजुरी न घेतल्याबद्दल धारेवर धरले आहे. सुसाट वेगाने पळणाऱ्या या रेल्वेमधील विविध सोयीसुविधांचा तिच्या सुरक्षित प्रवासावर काही परिणाम होतो किंवा नाही, याची तपासणी करणे आवश्यक असते. रेल्वेच्या रुळांची क्षमता आणि त्यावरून धावणाऱ्या रेल्वेचे वजन यांचे शास्त्रीय विश्लेषण करून मगच रेल्वेचा वेग ठरवण्यात येतो. आजवर या खात्याने या वेगाच्या संबंधी अनेकदा उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. अनेकदा रेल्वे अपघात याच कारणाने होतात, असेही सिद्ध झाले आहे. भारतीय रेल्वे रुळांची क्षमता लक्षात घेता, त्यावरून विशिष्ट वेगमर्यादा पाळणे अत्यावश्यक असते. ही मर्यादा रेल्वेच्या डब्याचे वजन आणि त्याची आसनक्षमता यावर ठरते. तेजस ही रेल्वेगाडी धावण्यापूर्वी तिची तांत्रिक तपासणी करून घेणे आवश्यक होते आणि त्यानंतरच ती रुळावर आणणे सयुक्तिक होते. मात्र तिकडे कानाडोळा करून ही रेल्वे धावण्यास सुरुवातही झाली. कोणत्याही आस्थापनेत असलेल्या विविध पातळ्यांवरील व्यवस्थांची कदर न करण्याची अशी प्रवृत्ती सरकारच्या बहुतेक खात्यांमध्ये दिसून येते. रेल्वे खाते हे माणसांची ने-आण करीत असल्याने, तेथे अशी कदर होणे अधिक महत्त्वाचे असते. परंतु यश दाखवण्याची कोण घाई असलेल्या रेल्वे खात्यास मात्र ते समजत नाही. आपल्याच सुरक्षा यंत्रणेच्या अधिकारांवर अतिक्रमण करून त्यांना वळसा घालणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे, याचे भान सुटल्यामुळे असे घडते. ही रेल्वे सुरू होण्यापूर्वी तिच्यामध्ये असलेल्या अनेक सोयींची मोठी जाहिरात करण्यात आली होती. सुरक्षा आयुक्तांच्या पत्रास खात्याने दिलेले उत्तर मात्र दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन करणारे आहे. ज्या सुविधा असतील असे सांगितले होते, त्या या रेल्वेगाडीत नसल्यामुळे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी करून घेण्याची आवश्यकता नसल्याचे खात्याचे म्हणणे आहे. हे जर खरे असेल, तर याचा अर्थ खात्याने प्रवाशांची फसवणूक केलेली आहे. ते खोटे असेल, तर सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. या गाडीचा वेग ताशी २०० किलोमीटर असेल, असे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात ती ११० किमीच्याच वेगाने धावते, असा खुलासा खात्याने केला आहे. देशवासीयांना बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्या रेल्वेने प्रवाशांची सुरक्षा अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणे योग्य नाही, हे लक्षात ठेवलेले बरे.

First Published on July 28, 2017 3:46 am

Web Title: no security clearance for tejas express 2
टॅग Tejas Express