टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि स्क्वॉश या रॅकेटच्या साह्य़ाने खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये टेनिस आद्य मानले जाते. दुसरीकडे फिक्िंसग, स्पॉटफिक्िंसग या खेळातल्या गैरप्रकारांच्या व्यवहाराला रॅकेट असे संबोधले जाते. ‘रॅकेट’ या शब्दाशी संलग्न दोन संदर्भाचा दुर्दैवी योगायोग म्हणजे टेनिसविश्वात उघडकीस आलेले फिक्िंसग प्रकरण. टेनिस हा खर्चीक खेळ आहे. साहजिकच तो खेळणाऱ्यांची आर्थिक स्थिती खाऊन-पिऊन सुखी वर्गातली. त्यामुळे पैशाच्या चणचणीतून निर्माण झालेली हाव यामागचे कारण निश्चितच नाही. सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडापटूंच्या यादीत टेनिसपटू अव्वल स्थानी असतात. अशा अर्थसंपन्न खेळाला फिक्सिंगची वाळवी लागावी हे विकृतीचे लक्षण आहे. बीबीसी आणि बझफीड या वृत्तसेवांनी गौप्यस्फोट केलेल्या या प्रकरणाचे मूळ २००७ मधील घटनेत आहे. पोलंडमध्ये निकोलय डेव्हडेन्को आणि मार्टिन व्हॅसेलो यांच्यातील लढतीत सट्टेबाजांनी निकालनिश्चितीचा (फिक्सिंग) प्रयोग केला, हे लक्षात आले. संशयाचा काटा रशियातील सट्टेबाज टोळ्यांच्या दिशेने होता. पुरुषांचे टेनिस नियंत्रित करणाऱ्या असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स अर्थात एटीपीने स्वतंत्र खासगी यंत्रणेकडे प्रकरणाचा तपास सोपवला. फिक्सिंगची कीड केवळ त्या सामन्यापुरती मर्यादित नसून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल- अगदी ग्रँड स्लॅम विजेत्या खेळाडूंनाही पैशाचे आमिष दाखवून या गैरप्रकारात सामील करून घेतल्याचे त्या वेळी स्पष्ट झाले. असंख्य दूरध्वनी संभाषणे, ई-मेल, बँकखाती, प्रत्यक्ष भेटीगाठी असे सारेच पिंजून काढून २००८ साली तपास पूर्ण झाला. जागतिक क्रमवारीत अव्वल ५० खेळाडूंत समावेश असलेले २८ खेळाडू गैरप्रकाराशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले. टेनिसमध्ये चॅलेंजर, एटीपी मास्टर्स आणि ग्रँड स्लॅम अशी स्पर्धाची वर्गवारी असते. खेळाची शिखर संघटना या नात्याने एटीपीने वाईट प्रवृत्ती कार्यरत असल्याचे मान्य करून त्यांना समोर आणणे हा प्रक्रियेचा पहिला टप्पा झाला. पण या खेळाडूंना साधी समजही देण्यात आली नाही. शिक्षा न होण्यामागे एटीपी संघटनेवर प्रायोजक तसेच अर्थकारणाचा दबाव होता का हे आता तरी स्पष्ट होणे गरजेचे आहे. आर्थिक दंड, बंदी अशी कोणतीही शिक्षा न झाल्याने हे टेनिसपटू मोकाट झाले. सोमवारपासून सुरू झालेल्या वर्षांतल्या पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत हे कलंकित खेळाडू खेळत असल्याचा दावा एका जागल्याने केला आहे. त्या वेळी या प्रकरणातून बोध घेत एटीपीने गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी समितीची स्थापना केली होती. समितीच्या कर्मचाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे आणि स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात खेळल्या जातात. त्यामुळे समितीच्या संरचनेतच मर्यादा आहेत. ‘बेटिंगला कायदेशीर मान्यता मिळावी’ या मतप्रवाहाला यामुळे फटका बसणार, हे निश्चित. बेटिंगमधून पुढे फिक्सिंगची पायरी गाठली गेल्यास, खेळाच्या भावनेला आणि जिंकण्याची ईर्षां बाळगणे या खेळाच्या गाभ्यालाच हरताळ फासला जातो. मात्र बेटिंग कायदेशीर ठरो की बेकायदा; प्रलोभनांपासून दूर राहण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण आणि दोषींना योग्य वेळी शिक्षा हाच मार्ग सोयीस्कर आहे. टेनिससारख्या खेळाला जगभरातून लोकाश्रय मिळण्यावरच मोठय़ा अर्थकारणाची घडी बेतलेली आहे. एलीट अर्थात उच्चभ्रूंचा शालीन खेळ असे टेनिसचे वर्णन होई. मात्र ताज्या प्रकरणाने टेनिसच्या धुतल्या तांदळातला फोलपणा उघड झाला आहे.