काश्मिरातील पाम्पोरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले कमांडो, कॅप्टन तुषार महाजन यांच्या शोकमग्न्न पित्याचा प्रश्न आहे- ‘आमची मुलं किती दिवस अजून अशी हुतात्मा होणार आहेत? आमचे राजकीय नेते हे कधी थांबवणार आहेत?’ माध्यमिक विद्यालयाच्या निवृत्त मुख्याध्यापकाचा हा शोकसंताप. कोणास त्यात भाबडेपणाही दिसेल, पण म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. किंबहुना आज सर्वात महत्त्वाचा असेल तर तोच एकमेव प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सैद यांच्या पीडीपीला गळामिठी मारली. सरकारमधील वाटा घेतला. त्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सुधारेल अशी अनेकांची अपेक्षा होती, मात्र तसे झालेले नाही. उलट काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद वाढतानाच दिसत आहे. मुफ्ती मोहम्मद सैद यांच्या निधनानंतर तर परिस्थिती आणखी बिघडली आहे. परकी दहशतवाद्यांचे हल्ले होतच आहेत, पण पुन्हा स्वदेशी दहशतवाद्यांची संख्या वाढू लागली आहे. काश्मीरमधील तरुणाई पुन्हा एकदा दहशतवादाकडे आकर्षित होताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरसाठी राज्यपालांची राजवट ही नेहमीच ‘धोकादायक’ ठरलेली आहे हा इतिहासाचा धडाही आपण शिकलो नाही हेच या परिस्थितीतून दिसते आहे. तेथील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांत तरुण-तडफदार लष्करी अधिकाऱ्यांचे बळी जात आहेत. पाम्पोर हल्ल्यात बळी गेलेले कॅ. पवन कुमार, कॅ. महाजन, लान्स नाईक ओम प्रकाश हे तरुण जवान होते. कॅ. महाजन आणि ओम प्रकाश हे कमांडो होते. कुपवाडय़ात याच महिन्यात झालेल्या हल्ल्यात लान्स नाईक मोहननाथ गोस्वामी शहीद झाले. जानेवारीत कर्नल एम. एन. राय हुतात्मा झाले. गेल्या नोव्हेंबरमध्ये कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. अत्यंत प्रशिक्षित, जाँबाज असे हे जवान आपण सातत्याने गमावत आहोत. त्यांच्या नावाने भावनांचे राजकारण करणे सोपे आहे. ते ट्विटरच्या रणमैदानातून आपण नित्य करीतही आहोत. देशाला हे काहीही परवडणारे नाही. काश्मीरमध्ये आलेल्या तुटलेपणाला केवळ परराष्ट्र वा परधर्म जबाबदार आहे असे मानणे हे सोपे उत्तर झाले. मुळात ती आपल्या पराभवाची कबुली आहे. काश्मीरसाठीच्या मलमपट्टीची घोषणा आपण दर प्रचारसभेत करतो. ती लावता मात्र आलेली नाही. जखमा अजून चिघळलेल्याच आहेत, हा तो पराभव आहे. तो मोदींच्या नीतीचा पराभव आहे की अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या राजकारणाचा हा स्वतंत्र चर्चेचा विषय. मात्र त्याचा फायदा शेजारी देश घेत आहे. मोदी यांच्या पाक मुत्सद्देगिरीला अद्याप अपेक्षित यश लाभलेले नाही. साडी आणि आंब्यांची देवाणघेवाण खूप झाली. त्याची फळे मात्र दिसत नाहीत. जोवर तेथील लष्करावर चर्चेसाठी दबाव येत नाही तोवर ती दिसणारही नाहीत, हेही खरे आहे. मात्र अमेरिका एकीकडे पाक लष्कराचे लांगूलचालन करताना दिसत आहे आणि दुसरीकडे त्यामुळे तेथील दहशतवादी संघटनांना चेव चढला आहे. पाम्पोर हल्ल्यानंतर ‘जमात-उद्-दावा’ने लष्कर-ए-तय्यबाची जाहीर पाठ थोपटली. आपला लष्करशी संबंध नसल्याचे गेली १५ वर्षे सांगणारी ही संघटना अचानक अशी विधाने करीत आहे आणि बरोबरीने पाकचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांची ‘सर्वोत्तम मुजाहिदीन’ म्हणून भलामण करीत आहे याचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे. अशा परिस्थितीत काश्मीर हा आज देशाच्या राजकीय व्यवस्थेपुढील सर्वात मोठा मुद्दा बनला पाहिजे. कमांडो कॅप्टन तुषार महाजन यांच्या पित्याचा प्रश्न नेमका हाच आहे – हे कधी होणार? आमची मुलं किती दिवस अशी शहीद होणार?