पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमाम हिंदुत्ववाद्यांचे आदर्शपुरुष. मोदी यांनी इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रमुखपदी नेमलेले थोर विचारवंत लोकेशचंद्र यांच्याच शब्दांत सांगायचे तर ते ‘प्रत्यक्ष भगवंताचे अवतार’ आणि ‘महात्मा गांधींहून थोर’ आहेत. असे मोदीजी एकीकडे सातत्याने गांधीजींचा गुणगौरव करीत असताना त्यांचे भक्त आणि अनुयायी मात्र इकडे गांधींच्या मारेकऱ्याचा उदोउदो करीत आहेत. रविवारी या भक्तगणांनी आणि गणंगांनी नथुराम गोडसेची मयंती ‘बलिदान दिन’ म्हणून साजरी केली. हे नेमके काय गौडबंगाल आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात आजही आहे. म्हणजे मोदी ज्या संघविचारात मोठे झाले तो विचार महात्मा गांधी यांना प्रातस्मरणीय मानतो. काही काळ याच विचाराने गांधीवादी समाजवाद या राजकीय भूमिकेला जवळ केले होते आणि त्याच वेळी या संघविचारांवर चालणारी मंडळी गांधींचा पराकोटीचा द्वेष करतात. त्यांना देशद्रोही समजतात आणि त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचे कृत्य करणाऱ्यास राष्ट्रभक्त म्हणून मिरवतात. यात जो अंतर्विरोध आहे तो संघविचारांशी सहानुभूती असणाऱ्यांनाही घोटाळ्यात पाडणारा आहे. संघातील ज्येष्ठांना आणि श्रेष्ठांना विचारले तर ते सांगतील की मुळातच असा घोटाळा निर्माण होण्याचे काही कारणच नाही. कारण संघाने नथुरामला कधीही आपला मानलेला नाही. त्याच्या कृत्यांची आणि विचारांची जबाबदारी संघाची नाही. गांधीहत्येनंतर खुद्द सरदार पटेल यांनी त्या कृत्याबद्दल संघाचीही भूमिका संशयास्पद ठरवल्याचा इतिहास असला तरी संघाने जाहीररीत्या कधीही आपले मानलेले नाही. रविवारीही संघाने त्याचाच पुनरुच्चार केला. त्यात एकच बाब आवर्जून सांगावी अशी होती. ती म्हणजे नथुरामचा बलिदान दिवस साजरा करणाऱ्यांना यावेळी संघातर्फे प्रथमच फटकारण्यात आले. नथुरामचे पोवाडे यावेळीच प्रथम गाण्यात येत होते असे नाही. याआधी, लोकसभा निवडणुकीच्या काळात तर नथुरामची मंदिरे उभारण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. हिंदू महासभा, अभिनव भारत, झालेच तर स्वतस ब्रिगेड म्हणवून घेणाऱ्या अतिरेकी हिंदुत्ववाद्यांच्या उटपटांग टोळ्या ही मंडळी याआधीही नेमाने नथुरामनमनाचे कार्यक्रम करीत होती. त्यातून सहिष्णुतेचा कोणता संदेश जात होता हे सांगता येणे कठीण; परंतु त्याला संघाचा फारसा आक्षेप नसे. आम्ही आपले गांधींची टिंगलटवाळी करीत असलो तरी सकाळी मात्र त्यांना स्मरणीय मानतो एवढे पुरेसे झाले हा स्वयंसेवकांचा बाणा असे. यावेळी मात्र संघाने प्रथमच ठोस भूमिका घेत, नथुराम हा कोणी नायक नसून, त्याचा गौरव करण्यातून हिंदुत्वाची बदनामी होत असल्याचे स्पष्ट बजावले. ते एकापरीने बरेच झाले. अन्यथा पंजाबात भिंद्रनवालेसारख्यांची जयंती-मयंती साजरी करण्यावर संघ कोणत्या तोंडाने आक्षेप घेऊ शकला असता? तमिळनाडूतील वायकोसारखे नेते तमिळ अतिरेकी प्रभाकरनच्या पुण्यस्मरणाचे कार्यक्रम करतात, ते चूक असल्याचे संघाला कसे म्हणता आले असते? तेव्हा नथुरामभक्तांना फटकारून संघाने या प्रकरणातून स्वतची व्यवस्थित सुटका करून घेतली आहे. बाकी मग तसा हा खुलासा बिनकामाचाच म्हणावा लागेल. कारण संघ जाहीररीत्या जे बोलत-चालत असतो, त्याचे अनुसरण करण्याची सक्ती संघाच्या परिघावरील संस्था, संघटनांवर कधीच नसते. त्यामुळेच मोदी एक बोलतात, संघ एक सांगतो, हे परिघावरचे दुसरेच काही करतात आणि लोक गोंधळलेले राहतात, ही नेहमीच गत झालेली आहे. नथुरामबाबतच्या खुलाशानंतरही त्यात फार काही बदल होण्याची शक्यता नाही.