खरे तर, ‘आमचं ठरलंय’ असे एकदा नव्हे, अनेकदा त्यांनी जाहीर केल्यानंतर असे प्रश्न पुन:पुन्हा उभे करणे उचित नाही. पण मराठीजनांना राजकारणात आणि त्यातही मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेच्या राजकारणात पहिल्यापासूनच कमालीचा रस असल्याने, नेमकं काय ठरलंय, याची उत्सुकता नेहमीच सतावत असते. ती गेल्या लोकसभा निवडणुकीत होती, विधानसभा निवडणुकीतही होती, आणि आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही असणार, यात गैर नाही. शनिवारी साक्षात नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली, तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी सर्वात जास्त वेळ टाळ्या वाजविल्या होत्या. यावरून युतीबाबत शिवसेना आणि भाजप यांच्यात ‘काय ठरलंय’ याचा अंदाज करणे शक्य असतानाही, त्याच कार्यक्रमात मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चकार शब्ददेखील का काढला नाही, याचेच कुतूहल अनेकांच्या मनात माजले. पंतप्रधान मोदी यांनी तर जाहीर सभेतच, उद्धव ठाकरे यांचा ‘माझा लहान भाऊ’ अशा शब्दांत उल्लेख केल्याने ज्या टाळ्या पडल्या, त्या साहजिकच भाजपवाल्यांच्या गर्दीतूनच होत्या, हे ओळखणे फारसे कठीण नव्हते. मोदी यांनी या उल्लेखातून ठाकरे-भाजप यांच्यातील नात्याच्या सीमारेषा कायमच्या स्पष्ट करून टाकल्याने, जे काही ठरले असेल ते याच न्यायाने होणार या खात्रीने भाजपमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या असल्या, तरी मुळात- ‘काय ठरलंय?’ हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला. ‘युती होणारच’ असे ठाकरे यांनी त्याच कार्यक्रमात मोदी यांच्यादेखत सांगितल्यावर, खुद्द मोदी किंवा फडणवीस यांनी त्यास दुजोरा देणारा शब्द तरी उच्चारावा अशी अनेकांची अपेक्षा असणार. त्यांनी तसे केले नाही. त्यांच्या मौनाचे दोन अर्थ निघतात. एक तर, ‘शब्दांवाचून कळले सारे’ असा तरी, किंवा उद्धव ठाकरे यांनी युती जाहीर केल्यानंतर- ‘शब्द बापुडे केवळ वारा’ असे तरी काहींना वाटले असले पाहिजे. विधानसभेसाठी सेना-भाजप युती होणार की स्वतंत्र लढून मागच्याप्रमाणे दोघेही निवडणुकीनंतर युती करणार, या शंका अजून संपलेल्या नाहीत. युतीची बोलणी चालू आहे, असे सांगताना उभय बाजूंचे नेते स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेशही कार्यकर्त्यांना देतात आणि ‘आमचं ठरलंय,’ असे सांगत दोन्ही पक्षांचे सर्वेसर्वा नेते मात्र त्याचे गूढ अधिकच गडद करतात. म्हणूनच शनिवारच्या सभेत, सारे नेते एका मंचावर असताना तरी युतीचे काय ठरलेय, ते जाहीर होईल अशा अपेक्षेने एकाच मांडवाखाली जमलेल्या सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातील शंका तशीच सोबत राहिली. एक मात्र या समारंभाच्या निमित्ताने आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना-मोदी यांच्यामधील सौहार्दाला आता मधुर नात्याची किनार लाभली असल्याचा संदेश उद्धव ठाकरे यांच्या जाहीर मोदीस्तुतीतून समाजात गेला आहे. शिवसेनेला सत्तेची हाव नाही, हेही ठाकरे यांनी जाहीर करून टाकले आहे, आणि राज्याचा विकास हवा आहे, हेही स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून या दोन्ही वक्तव्यांची नोंद घेतल्याचे संकेतही दिले. शनिवारी विकास कामांचेच भूमिपूजन करून, शिवसेनेस हव्या असलेल्या विकासाचा पुरावाही भाजपने दिला आहे. त्यामुळे- ‘ठरलंय तरी काय?’ हा प्रश्न सध्या तरी कायम आहे. तसेही, असे प्रश्न चुटकीसरशी सोडविले तर राजकारणात रंगत राहतच नाही. तो रेंगाळत राहण्यातच मजा असते. ते सुटले, तर मराठी मनात स्वभावतच असलेली राजकारणातली उत्सुकताच निकाली निघून जाईल.. ते होणार नाही याची काळजी उभय पक्ष घेत असतील, तर त्यात गंमत आहे!