News Flash

कां रे नाहीं लाज?

गावोगावी होणारे अखंड हरिनाम सप्ताह हे भक्तीचे हिरवेगार शिवार.

गावोगावी होणारे अखंड हरिनाम सप्ताह हे भक्तीचे हिरवेगार शिवार. परंतु त्यात हल्ली राजकारणाची बोंडअळी घुसली असून, त्यामुळे या भक्तीच्या सोहळ्याची पूर्ण रया जाऊ लागली आहे. केवळ वारकरी संप्रदायानेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या समाजकारणाविषयी थोडीशीही आस्था असलेल्यांनीही काळजीत पडावे असे हे घटित आहे. ज्या भजन-संकीर्तनाने महाराष्ट्रातील बहुजन समाजाला किमान आध्यात्मिक पातळीवर का होईना, एकत्र आणण्याचे कार्य शतकानुशतके केले, तेच सोहळे आज धनदांडग्यांच्या, राजकारण्यांच्या क्षुद्र हेतूंपायी येथील सामाजिक संरचनेत दुहीची बीजे पेरत असतील तर तो चिंतेचाच विषय ठरतो. आज गावोगावी कमी-अधिक फरकाने हेच घडताना दिसत आहे. कुठे सप्ताह हे आपले राजकीय आणि सामाजिक बळ दाखविण्याचे आखाडे बनले आहेत, तर कुठे ते गावची आर्थिक समृद्धी मिरवण्याचे साधन बनले आहेत. या सप्ताहांतून मिळणाऱ्या प्रतिष्ठेच्या जोरावर ग्रामीण राजकारणाचे पट मांडले जात आहेत. कोण आहे यास कारणीभूत? हरिनाम सप्ताहांमध्ये येऊन राजकीय भाषणबाजी करणाऱ्या राजकारणी नेत्यांना यात सहज दोष देता येईल. ते फायद्याचेही आहे. कारण त्यामुळे मग या सोहळ्याच्या अध्वर्यूना त्यांची जबाबदारी सहज झटकणे सोपे होईल. परंतु त्यांनी जबाबदारी झटकली तरीही वस्तुस्थिती लपून राहणार नाही. ज्यांच्या मेंदूवर तुकोबांच्या अभंगवाणीचे संस्कार आहेत त्या सामान्य शेतकऱ्यांना हे खेळ कळत नाहीत असे नाही. त्यांना हे नक्कीच कळते की आजचे हे पंचतारांकित हरिनाम सप्ताह आपले उरलेले नाहीत. ‘उभ्या बाजारांत कथा’ आणणाऱ्यांचा, ‘कीर्तनाचा विकरा’ करणाऱ्यांचा, कीर्तनाच्या नावाखाली सोंगाडेपणा करून ‘सभेमाजी कुले हलविणाऱ्यांचा’ धिक्कार करणाऱ्या तुकोबांचेही हे सप्ताह उरलेले नाहीत. कीर्तनकाराने जेथे कीर्तनाला जायचे तेथील बुक्काही आपल्या कपाळाला लावता कामा नये असा नियम घालून दिला होता. कीर्तनासाठी ‘द्रव्य घेती, देती तेही नरका जाती’ असे त्यांनी म्हणून ठेवले होते. परंतु आज त्याच सप्ताहांना पैशाने गिळले आहे. कारण आता लाखांची बिदागी घेणारे कीर्तनकार उदयाला आले आहेत. टाळकरीही आता कंत्राटी झाले आहेत. याच अर्थकारणाने सप्ताहांचे रंगरूप बदलून टाकले आहे. साखरसम्राट, शिक्षणसम्राट तसे आता फडसम्राट उदयाला आले आहेत. राजकारण्यांचा पदर धरून वारकऱ्यांचे पुढारपण करणाऱ्या या मंडळींनीच हरिनाम सप्ताह भ्रष्ट केले आहेत. यातीलच अनेकांनी वारकरी संप्रदायाला सनातनी धर्मकारण्यांच्या दावणीला बांधण्याचे कारस्थान चालविले आहे. सध्या सप्ताहांचे राजकीयीकरण झाल्याचे दिसते ते या अशा सालोमालोंमुळेच. यावर, पुढारी हे सप्ताहांत आले, बोलले तर बिघडले कुठे? किंवा सप्ताहांसाठी झाले काही कोटी खर्च तर काय झाले? शहरांतल्या तुमच्या सोहळ्यांमध्ये नाही का उधळले जात पैसे? असे युक्तिवाद केले जातील. परंतु ते फोल आहेत. या सप्ताहांसाठी सामान्य शेतकरी वारकऱ्यांवर बसविली जाणारी पट्टी हा ज्यांना खुशीचा मामला वाटतो त्यांनी खुशाल आपल्या नंदनवनात राहावे. परंतु एकीकडे पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन यांसारख्या संस्था ज्या भागात खरी जनसेवा करीत आहेत, त्या भागांतच हे ‘मंडप-डेकोरेशन’ आणि कीर्तनकारांच्या बिदाग्यांवर उधळले जाणारे धन, तेथील क्षुद्र राजकीय भाषणे करणारे नेते हे सारे पाहून या शेतकरी-वारकऱ्यांच्या मुखात नक्कीच तुकोबांची एक पंक्ती येत असेल, की ‘म्हणवितां हरिदास कां रे नाहीं लाज.. काय ऐसें पोट न भरेसें झालें, हालविसी कुले सभेमाजीं.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 3:32 am

Web Title: political agenda in bhajan kirtan
Next Stories
1 नावातच सारे काही..
2 कावेरीमुळे भाजपची कोंडी
3 इंजिन नसलेली रेल्वेगाडी!
Just Now!
X