ज्या काळात शिक्षण क्षेत्र हे अजिबातच उत्साहवर्धक नव्हते, त्या काळात याच क्षेत्रात काम करण्याची जिद्द ठेवणे वेडेपणाचे होते, हे माहीत असूनही पतंगराव कदम यांनी तेच केलं. शिक्षकी पेशातील अनुभव घेतल्यानंतरही त्यांच्या या जिद्दीत जराही फरक पडला नाही. उलट, काही करून दाखवायचेच असेल तर याच क्षेत्रात करायला हवे, असे त्यांना वाटत होते. सत्तरच्या दशकात महाराष्ट्रातील शिक्षणाचे खासगीकरण झालेले नव्हते. पण पतंगरावांनी पुण्यात पहिली शाळा काढून आपल्या स्वप्नाची मुहूर्तमेढ रोवली. पतंगराव हे एक अजब रसायन होतं. अतिशय उमदा, रांगडा आणि उत्साही असा हा माणूस.  संस्था सुरू करायची, तर तिचं नाव ठेवतानाही पतंगरावांची दृष्टी सहज लक्षात येते. नाव ठेवले भारती विद्यापीठ. संस्थेचे कार्यालय अवघ्या शंभर चौरस फुटांचे. पण स्वप्न खरंखुरं विद्यापीठ स्थापन करायचे. म्हणायला हे सगळं खूप सोपं, पण प्रत्यक्षात ते किती अवघड, हे शिक्षण क्षेत्रातल्या कुणालाही सहज समजू शकणारं. राजकारण हा त्यांचा पिंड, पण त्यामागे मदत करण्याचा भाव अधिक. राजकारणात येऊन कुणाला तरी काहीतरी मदत करता येते, याचं त्यांना खूप अप्रूप असायचं. पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत पतंगराव ज्या हिरिरीने भाग घ्यायचे आणि आपला मुद्दा मांडायचे, ते पाहिल्यावर या माणसाकडे काहीतरी वेगळे करून दाखवण्याची कमालीची इच्छा आहे, हे सहज लक्षात यायचे. भारती विद्यापीठाची स्थापना करून पहिली शाळा काढणाऱ्या पतंगरावांना आपण एक प्रचंड मोठे, खरेखुरे विद्यापीठ निर्माण करणार आहोत, हे नक्की माहीत होते. पतंगरावांना माणसांची पारख फार छान होती. प्रत्येकाकडे असलेले गुण त्यांना आधी दिसायचे. अशी फौजच्या फौज तयार करून त्यांनी आपली संस्था नावारूपाला आणली. त्यांच्या कार्यालयात सतत वर्दळ असायची. त्यांनाही अशी अवतीभवती माणसे आवडायची. प्रत्येकाला त्याची अडचण समजावून घेऊन जे शक्य असेल ते करण्याचे आश्वासन देणारे अनेक जण असतात. पण पतंगराव या सगळ्या गोष्टी मेंदूत नोंदवून ठेवायचे. त्यामुळे बरीचशी कामे करताना, त्यांना सगळा इतिहास माहीत असायचा. सांगली जिल्ह्य़ाचा विकास हे त्यांचे ध्येय. सांगलीतला कोणताही माणूस पतंगरावांकडे आला की, त्यांच्या डोळ्यात वेगळाच ममत्वाचा भाव असायचा. सांगलीतल्या कितीतरी जणांना भारती विद्यापीठाची दारे सताड उघडी ठेवून, शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे काम म्हणूनच अधिक  महत्त्वाचे. शिक्षणाच्या क्षेत्रातील धंदेवाईकपणा, तेथील भ्रष्टाचार याबद्दल सतत चर्चा सुरू असतानाही, पतंगरावांनी मात्र आपल्या संस्थेचा दर्जा सतत वाढत कसा राहील, याकडे अधिक लक्ष दिले. देशातील एक प्रतिष्ठित आणि दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून भारती विद्यापीठाचे नाव घेतले जाते, ते त्यामुळे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अनेकदा हातातोंडाशी आलेला घास गमवावा लागला, तरीही नाराज न होणारे आणि मंत्रिमंडळाच्या यादीत नावच नसताना, अगदी ऐनवेळी ते समाविष्ट करण्यासाठी आवश्यक असणारे राजकीय शहाणपण त्यांच्याकडे होते. खाते कोणतेही असो, त्यावर आपली भक्कम पकड निर्माण करणे हे त्यांचे वैशिष्टय़. शिक्षणाचे खासगीकरण होऊ लागल्यावर दर्जा वाढवत नेत, त्याचा पुरेपूर फायदा मिळवणारे पतंगराव हे एक दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. बोलण्यात खास सांगलीचा खमंगपणा, कोणालाही मित्रत्वाचा दर्जा बहाल करणारा, खुसखुशीतपणे टिप्पणी करणारा, राजकारणात विरोधकांशी सरळ दोन हात करणारा, पण तरीही मैत्र टिकवून ठेवणारा असा हा विरळा माणूस निघून जाणे म्हणूनच दु:खकारक.