पुलगावच्या दारूगोळा भांडाराला लागलेली आग कायम शिस्तीचे गोडवे गाणाऱ्या लष्कराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहेच, शिवाय अलीकडच्या काळातील या वाढत्या घटना लक्षात घेता दारूगोळ्याच्या सुरक्षाविषयक धोरणावर फेरविचार करायला भाग पाडणारी आहे. या भांडारात मंगळवारी पहाटे घडलेल्या अग्निप्रलयाने आतापर्यंत १८ जवानांचा बळी गेला. या भांडारात ठेवण्यात येणारा दारूगोळा सुरक्षित राहावा म्हणून सर्व प्रकारच्या स्वयंचलित यंत्रणा येथे कार्यरत आहेत. तरीही १५२ क्रमांकाच्या इमारतीला आग लागली आणि त्यात १३० टनांचा रणगाडाविरोधी सुरुंगसाठा नष्ट झाला. लष्कराच्या रिवाजाप्रमाणे चौकशीशिवाय या आगीमागील नेमके कारण उघड होणार नसले तरी मानवी चूक अथवा हलगर्जीपणा यातूनच हा प्रकार घडला असावा असा तर्क काढण्यास बराच वाव आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे सुद्धा तेच म्हणणे आहे. ही आग वेळीच विझवण्यात यश आले नसते तर इतर ठिकाणच्या दारूगोळ्याचा स्फोट होऊन मोठा अनर्थ घडला असता हे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे वक्तव्य दिलासा देणारे असले तरी कडेकोट सुरक्षाव्यवस्था असताना आग लागलीच कशी, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित राहणारा आहे. या भांडाराच्या आजूबाजूला असलेल्या गावांच्या शिवारात कुणी जाळ पेटवला तरी लष्कराचे अधिकारी बेदम मारतात. भांडार परिसरात असलेल्या गवताला आधी आग लागली व ती पसरत गेली ही प्राथमिक माहिती खरी असेल तर त्यातूनही या भांडार व्यवस्थापनाचा निष्काळजीपणाच समोर येतो. मुदतबाह्य़ झालेला दारूगोळा वेळेत नष्ट केला नाही तरीही आगीचा धोका संभवतो हा निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा दावासुद्धा पुन्हा या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाकडेच बोट दाखवणारा आहे. या घटनेनंतर काही अतिउत्साही माध्यमांनी घातपाताच्या संशयाची आवई उठवली असली तरी पर्रिकर यांनी साफ शब्दात त्याचे खंडन करून या साऱ्यांच्या उत्साहावर आवर घातला हे बरे केले. या आगीमुळे लष्कर आणि नागरी प्रशासनात समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आले. आगीचे लोळ व स्फोटाचे आवाज ऐकून सैरावैरा पळणाऱ्या हजारो नागरिकांना नेमका दिलासा तरी कसा द्यायचा, असा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर त्यामुळेच उपस्थित झाला होता. रात्रीची वेळ आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या संयमामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. अशी घटना घडली तर उपचाराच्या पातळीवर लागणाऱ्या सुविधा पुरवण्यात सरकारी यंत्रणा किती तोकडी आहे, याचेही दर्शन यानिमित्ताने झाले. लष्कराला लागणारा दारूगोळा साठवून ठेवणाऱ्या भांडारांना वारंवार लागणाऱ्या आगी हा अधिक चिंतेचा विषय होऊ लागला आहे, हे या घटनेने साऱ्यांच्या नजरेत आणून दिले आहे. १६ वर्षांपूर्वी भरतपूरला, नंतर जम्मू आणि पश्चिम बंगालमधील पनागड भांडारातसुद्धा अशा घटना घडल्या आहेत. याच पुलगाव भांडारात १९८९ला अशीच आग लागून स्फोट झाले होते. सततच्या या घटनांमुळे दारूगोळ्याच्या सुरक्षा पद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. काही लष्करी अधिकाऱ्यांच्या मते या सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घेण्याची हीच योग्य वेळ आहे. ही बाब लष्कराशी संबंधित असल्याने गुप्ततेचा बाऊ करीत आणखी किती बळी जाऊ द्यायचे, या प्रश्नावरही आता अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पारदर्शी कारभारामुळे साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेणारे मनोहर पर्रिकर या संदर्भात आता काही सुधारणावादी निर्णय घेतील, अशी अपेक्षा म्हणूनच या घटनेच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त होऊ लागली आहे.