News Flash

अपघात, घातपात.. की कपात?

गेल्या दोन महिन्यांच्या काळात देशातील रेल्वेगाडय़ा रुळावरून घसरण्याच्या प्रकारांत वाढ झालेली दिसते.

अपघात, घातपात.. की कपात?

गेल्या दोन महिन्यांच्या काळात देशातील रेल्वेगाडय़ा रुळावरून घसरण्याच्या प्रकारांत वाढ झालेली दिसते. दर वर्षी अपघातांत मृत पावणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या भारतात रेल्वे ही जीवनरेखा मानली जात असल्याने या अपघातांचे गांभीर्य अधिक आहे. आंध्र प्रदेशात हिराखंड एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात चाळीसहून अधिक जणांना जीव गमवावा लागला, ही घटना जेवढी वेदनादायक, तेवढीच चीड आणणारीही आहे. अशा अपघातात मानवी चूक अधिक असल्याचे यापूर्वीच्या पाहणीत निदर्शनास आले असले, तरीही गेल्या काही अपघातांच्या तपासानंतर असे अपघात घडवून आणण्यात घातपाताची शक्यता व्यक्त होत असेल, तर ते अधिकच गंभीर आहे. सामान्यत: अपघाताचे खापर घातपातावर फोडण्याची भारतीय परंपरा आहे. परंतु हिराखंड एक्स्प्रेसच्या अपघाताची चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणांनाच जर असे वाटत असेल, तर त्याचा बंदोबस्त राष्ट्रीय पातळीवरच व्हायला हवा. जगातील मोठी लोहमार्गयंत्रणा असलेल्या भारतीय रेल्वेची चाके सतत धावती ठेवताना, कुठे तरी कधी तरी काही तरी चूक होऊ शकते, हे लक्षात घेऊनच या यंत्रणेत काम करणाऱ्या प्रत्येकाने डोळय़ांत तेल घालून काम करणे अपेक्षित असते. देशभरात पसरलेल्या सव्वा लाख किलोमीटर लांबीच्या रेल्वेरुळांवर जागता पहारा देणे केवळ अशक्यप्राय आहे. याचाच फायदा अतिरेकी शक्ती घेऊ शकतात. नागरी वस्ती नसलेल्या भागांतून रेल्वेचा प्रवास होत असतो आणि अशा ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेमध्ये पोलीस ठेवता येतात. मात्र रुळांची सुरक्षा कशी करायची, या प्रश्नाने आता गंभीर रूप धारण केलेले दिसते. तंत्रज्ञानाच्या युगात उपग्रहामार्फत अशी टेहळणी करणे अशक्य नाही आणि त्याद्वारे घातपात आधीच लक्षात येऊन अपघात टाळणेही अशक्य नाही. मात्र त्यासाठी प्रचंड यंत्रणा उभी करायला हवी. वर्षांकाठी किमान २३ हजार जणांना विविध प्रकारच्या रेल्वे अपघातांत मृत्यू येत असेल, तर रेल्वे खात्याने त्याबाबत अधिकच दक्ष राहायला हवे. मुंबईसारख्या शहरात, रेल्वेशिवाय जगणे कठीण व्हावे अशी परिस्थिती असताना, दर एक-दोन दिवसाआड मेगाब्लॉक किंवा पेंटाग्राफ तुटण्याच्या घटना घडतात आणि त्याचा मनस्ताप प्रवाशांना होतो. रेल्वेगाडी हे यंत्र आहे आणि त्याची निगा अन्य कोणत्याही यंत्राप्रमाणे राखणे आवश्यकच असते. परंतु अनेकदा त्याबाबत हेळसांड होताना दिसते. हिराखंड एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात रेल्वे रूळ तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. दोन तासांपूर्वी याच मार्गावरून मालगाडी गेली होती आणि या मार्गाची तपासणीही नुकतीच करण्यात आली होती. याचा अर्थ दोन तासांच्या अवधीत कुणी तरी रुळाची मोडतोड केली असा होतो. समजा तो ग्राह्य मानला तरीही रेल्वेने सुरक्षेचे उपाय योजण्यात हेळसांड केली आहे, हेही गेल्या काही महिन्यांतील अपघातांवरून स्पष्ट होते. रेल्वे रुळांची निगराणी करण्यावर होणाऱ्या खर्चात सुमारे साठ टक्क्यांची कपात अर्थसंकल्पात करणे हे धोकादायक ठरू शकते, याचा विचार खात्याने करणे आवश्यकच आहे. केवळ घातपाताचे कारण पुढे करून रेल्वेला अशा अपघातांपासून स्वत:चा बचाव करता येणार नाहीच. परंतु त्याच वेळी घातपाताची शक्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घेणेही तेवढेच जरुरीचे आहे. रेल्वेतील कर्मचारी भरती हा ऐरणीवर आलेला विषय आहे. देशभरात सुमारे दीड लाख जागा रेल्वेने भरलेल्या नाहीत. बचतीच्या नावाखाली भरती न करण्याने किमान सुविधांकडे लक्ष देण्याएवढे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. माणसांच्या जिवाशी खेळताना, अशी कपात महागात पडणारी ठरू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 4:03 am

Web Title: railway accident issue
Next Stories
1 ही वेळ नव्हे..
2 संघशक्तीची ठुसठुस!
3 जागतिकीकरणाचा चिनी पुळका
Just Now!
X