22 July 2019

News Flash

अनागोंदीच्या उंबरठय़ावर

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या मैदानाबाहेरील कारणांमुळे अधिक चर्चेत आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या मैदानाबाहेरील कारणांमुळे अधिक चर्चेत आहे. महिला क्रिकेट लोकप्रिय होत असल्याचेच हे लक्षण असल्याचे यामुळे काहींना वाटत असले, तरी खेळाडू-प्रशिक्षकांमध्ये उघडपणे झालेले आरोप-प्रत्यारोप गंभीर असून त्यांची दखल घेणे आवश्यक ठरते. वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत या संघाचा उपान्त्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला. तरीही या संघाची उपान्त्य फेरीपर्यंतची वाटचाल उल्लेखनीय होती. हा संघ सातत्याने जिंकत होता. उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारताची बुजुर्ग क्रिकेटपटू मिताली राजला संघाबाहेर ठेवले गेले. सामना मोठय़ा फरकाने गमावल्यामुळे या निर्णयाची चर्चा सर्वाधिक झाली. वास्तविक खेळापेक्षा खेळाडू मोठा असलेल्या इथल्या संस्कृतीत विजयाचे श्रेय एखाद्याच खेळाडूला मिळणे आणि पराभवाचे खापरही वलयांकित खेळाडूला वगळणाऱ्यांवर फोडले जाणे अपेक्षितच आहे. मिताली राजला उपान्त्य सामन्याआधीच्या सामन्यातही वगळले गेले होते. त्या वेळी अशी चर्चा झाली नाही. वगळण्याचा निर्णय सामूहिक होता आणि प्रशिक्षक रमेश पोवार, कर्णधार हरमनप्रीत कौर, निवड समिती सदस्य सुधा शहा यांचा होता. निव्वळ चर्चा झाली तोवर ठीक होते; परंतु मिताली राजने आपली नाराजी भारतीय क्रिकेट मंडळाकडे (बीसीसीआय) ई-मेलद्वारे कळवली आणि हा ई-मेल यथास्थित बीसीसीआयबाहेरही पोहोचला! येथे काही बाबींचा ऊहापोह आवश्यक ठरतो. खेळापेक्षा खेळाडू मोठी नाही, संघनिवड ही पूर्णपणे कर्णधार आणि प्रशिक्षक (ज्याला क्रिकेटमध्ये संघ व्यवस्थापन म्हणतात) यांची जबाबदारी आणि अधिकारही असतो ही बाब मितालीसारख्या अनुभवी क्रिकेटपटूला पूर्णपणे ठाऊक आहे. आजवर पुरुषांच्या क्रिकेटमध्येही एखाद्या बडय़ा क्रिकेटपटूला वगळल्यानंतर त्याने बीसीसीआयकडे नाराजीचा ई-मेल वगैरे पाठवला नव्हता. बोर्डाच्या एखाद्या सदस्याकडे, पत्रकाराकडे नाराजी व्यक्त करणे आणि अधिकृतरीत्या बोर्डाकडे ती व्यक्त करणे वेगळे. मितालीने प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर हेत्वारोप करणे हे अधिकच गंभीर आहे. पोवार यांना मग मितालीच्या आरोपांचे खंडन करणे भाग होते. त्यावर कडी म्हणजे, जणू मितालीच्या आरोपांची दखल घेऊन पोवार यांना मुदतवाढ देण्यास बीसीसीआयने नकार दिला आणि नवीन प्रशिक्षकपदासाठी जाहिरातही जारी केली. आता पोवार यांनाच प्रशिक्षक करावे म्हणून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी बीसीसीआयला विनंती केली आहे. हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात बीसीसीआयला पूर्णपणे अपयश आले आहे. खेळाडूंमध्ये ई-मेल संस्कृती फोफावणे, वैयक्तिक हेवेदावे, प्रशिक्षकांविषयी अनादर, मनाला वाटेल तसे आणि तेव्हा समाजमाध्यमांवर व्यक्त होणे या प्रवृत्तींना आळा घालण्याची जबाबदारी बीसीसीआयचीच होती. पोवार यांच्याआधीचे प्रशिक्षक तुषार आरोठे हे त्यांची मुदत संपण्यापूर्वीच तडकाफडकी राजीनामा देऊन बाहेर पडले होते. त्यांनी असे म्हटले होते, की या संघातील ‘काही क्रिकेटपटूं’ना भविष्यामध्ये रस नाही. त्यांची बदलण्याची तयारी नाही. त्यानंतर पोवार यांची नियुक्ती हंगामी प्रशिक्षक म्हणून झाली होती. आता त्यांनाही मुदतवाढ मिळणार नसल्यामुळे नवीन प्रशिक्षक शोधावा लागेल. त्याला किंवा तिला संघातील प्रत्येक खेळाडूबरोबर जुळवून घेण्यासाठी वेळ आणि अवकाश द्यावा लागेल. तोवर २०२०मध्ये पुढील विश्वचषक स्पर्धा येऊन ठेपलेली असेल. प्रशिक्षकाला स्वातंत्र्य पुरवण्यास आणि खेळाडूंच्या मर्जीपासून कवच देण्यास बीसीसीआय कधीही प्राधान्य देत नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. अशा प्रकारे वागणूक मिळत असल्यास चांगले प्रशिक्षक तरी भारतीय महिला संघाकडे कशाला फिरकतील, याविषयी विचार होताना दिसत नाही.

First Published on December 5, 2018 1:58 am

Web Title: ramesh powar harmanpreet kaur mithali raj