तुलनेने दुय्यम अशी ओळख असलेल्या विदर्भ क्रिकेट संघाने रणजी विजेतेपदाला घातलेली गवसणी अनेकार्थानी महत्त्वाची आहे. विदर्भ मागास आहे, अशी नुसती ओरड करणे फायद्याचे नाही, तर हे मागासपण घालवण्यासाठी कृतिशील पावलेही उचलावी लागतात, हा वस्तुपाठ या विजयाने घालून दिला आहे. राज्याचा विचार केला तर मुंबईच्या तुलनेत विदर्भ व महाराष्ट्र क्रिकेट संघटनांची ओळख दुय्यम अशीच आजवर राहिली. स्पर्धा आहेत म्हणून संघ खेळवायचा आणि मोठय़ा सामन्यांच्या आयोजनाची संधी कधी मिळते, याची वाट बघत राहायचे, हेच आजवर या संघटनांच्या वाटय़ाला आले. त्याला या विजयाने छेद दिला. लोढा समितीच्या शिफारशी लागू झाल्यानंतर विदर्भ क्रिकेट संघटनेवर असलेली निरंकुश सत्ता अ‍ॅड्. शशांक मनोहर यांना सोडावी लागणे व एक वर्षांच्या आत विदर्भाने हे जेतेपद मिळवणे हा केवळ योगायोग असला तरी या जेतेपदाची बीजे पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रयत्नांत दडली आहेत. विदर्भात खेळाडूंसाठी पहिली अकादमी २००२ मध्ये स्थापन झाली. त्यांच्या ‘मनोलक्ष्य’सारख्या उपक्रमांतून अनेक खेळाडू तयार झाले, पण त्यांच्यात व्यावसायिकता व विजिगीषु वृत्तीचा अभाव होता. यावर मात कशी करायची, या विवंचनेत संघटना असताना बीसीसीआयचा एक निर्णय विदर्भाच्या मदतीला धावून आला. स्थानिक स्पर्धेत बाहेरच्या तीन व्यवसायिक खेळाडूंना घेता येईल, हा निर्णय होताच, मुंबईचे तिघे खेळाडू विदर्भ संघात आले. या साऱ्या प्रयत्नांवर कळस चढवला तो प्रशिक्षक म्हणून सूत्रे स्वीकारणाऱ्या मुंबईच्या चंद्रकांत पंडित यांनी. वासीम जफर, फैज फजल या अनुभवी व भारतीय संघाकडून खेळलेल्या खेळाडूंसोबतच विदर्भाच्या संघात या मोसमात चांगली कामगिरी बजावणारे खेळाडूही आहेत. त्यामुळे हा विजय क्रिकेटची खऱ्या लोकशाहीकरणाकडे वाटचाल दर्शवणारा आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्पर्धामध्ये विदर्भाच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावत होता. गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठल्याचा इतिहास लक्षात घेऊनच चंद्रकांत पंडित यांनी या वेळी रणनीती ठरवली. एकोणीस वर्षांखालील संघात खेळणाऱ्या अकोल्याच्या आदित्य ठाकरेला अंतिम सामन्यात संधी देणे व त्यानेही संधीचे सोने करणे, यासारखी लाजबाब पण मैदानाबाहेरची खेळी पंडित यांच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. नवे खेळाडू शोधण्यासाठी विदर्भातील प्रत्येक शहरात क्लब संस्कृतीला चालना देतानाच विदर्भ क्रिकेट संघटनेने ही सारी प्रक्रिया खेळाडूंच्या हाती राहील, याची काळजी घेतली. भारताचे माजी गोलंदाज प्रशांत वैद्य यांचा याच हेतूने संघटनेत समावेश करण्यात आला. त्यामुळे संघ विदर्भाचा पण खेळाडू नागपूरचे, हे वर्षांनुवर्षे दिसणारे समीकरण बदलले. यातून समतोल संघ तयार झाला. मुख्य म्हणजे, क्रिकेटमध्ये चालणाऱ्या राजकारणापासून या प्रक्रियेला दूर ठेवण्यात आले. गुणवत्ता हाच अंतिम पर्याय असेल, असा संदेश यातून गेला व त्याचे रूपांतर या विजयात झाले. भारतीय क्रिकेट संघाला विदर्भाने दिलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी उमेश यादव या वेगवान गोलंदाजाला निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यासाठी कधी बडोदा तर कधी मुंबईत जाऊन खेळावे लागले होते. अशी वेळ आता वैदर्भीय खेळाडूंवर येऊ नये, यासाठी निवड समितीला त्यांच्या दृष्टिकोनात बदल करायला भाग पाडणारा हा विजय आहे. केवळ राजकारण वा सत्ताकारणच नाही तर खेळासह सर्वच क्षेत्रात विदर्भ सरस कामगिरी करू शकतो, अशी उमेद या विजयाने जागविली आहे.