Praveen Togadia, Vishwa Hindu Parishad, Rss , VHP election

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदाची गुप्त मतदानाने निवड करून हाताबाहेर जात असलेल्या प्रवीण तोगडिया यांना संघटनेतून बाहेर काढण्याचे काम अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करावे लागले.  याचे अनेक अर्थ असू शकतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तोगडिया यांच्यातील वाद. हे दोघेही एके काळचे सहकारी. एकमेकांना पाठिंबा देत पुढे जाणारे म्हणून त्यांची गुजरातमध्ये सर्वाना ओळख होती, पण काळ बदलला आणि मोदी आणि तोगडिया यांच्यात विस्तवही जाईनासा झाला. परिणामी तोगडिया यांची गच्छंती करणे म्हणजे मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, अशी स्पष्ट भूमिका संघाच्या वरिष्ठ नेत्यांना घ्यावी लागली. हेच तोगडिया २०१४च्या निवडणुकीपर्यंत कट्टर हिंदुत्वाची जी जहाल भाषा करत होते, ती संघाला आणि भाजपलाही हवीहवीशी वाटत होती. द्वेषमूलक भाषणे केल्याबद्दल तोगडिया यांच्यावर १९ गुन्हे दाखल आहेत.  बाबरी मशिदीच्या घटनेनंतर संघाने आणि भाजपनेही विश्व हिंदू परिषदेशी आपले कोणतेही थेट संबंध नसल्याचे जाहीर केले होते. वस्तुत: संघाच्या धोरणानुसार चालणाऱ्या संघटनांमधील अंतर्गत बाबींवरही संघाचे सातत्याने बारीक लक्ष असते. विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मोरोपंत पिंगळे यांनी अनेक वर्षे काम पाहिले. त्यांच्यानंतर ती धुरा अप्रत्यक्षपणे तोगडिया यांच्याकडे देण्यात आली. तरीही त्यांना प्रत्यक्ष त्या पदावर नियुक्त होण्यास बराच कालावधी जावा लागला. आता आपणच कायम या पदावर राहणार, असे सांगत त्यांनी रा. स्व. संघालाही अंगावर घेण्याचे औद्धत्य दाखवले, तेव्हाच त्यांची गच्छंती अटळ झाली होती. त्याबरोबरच त्यांच्या भडकावू भाषणांमुळे हिंदुत्व जहाल होऊन, त्याचा सरकारलाच त्रास होऊ लागला. हा जहालपणा सरकारच्याच मुळावर येऊ लागला, हा ‘अति होणे’ या प्रयोगाचा थेट साक्षात्कार होता. संघात किंवा संघाच्या पंखाखाली असलेल्या संस्था संघटनांमध्ये निवड करण्याची खास पद्धत असते. ही निवड सर्वमान्य आहे की नाही, यापेक्षा ती संघाला मान्य आहे की नाही, याला अधिक महत्त्व असते. त्यामुळे तोगडिया यांच्या यापूर्वीच्या नियुक्तीस त्या वेळी संघाने हिरवा कंदील दाखवलेलाच होता. त्याचा उपयोग करीत तोगडिया यांनी आपला वारू अबलखपणे उधळू दिला, ही त्यांची सर्वात मोठी चूक. भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर हे यश आपलेच आहे, असे उघडपणे सांगणारे तोगडिया यांनी नंतर सरकारवरच तोफ डागायला सुरुवात केली. हे इथपर्यंत येणे कोणत्याही संघटनेला परवडणारे नसते. त्यामुळे संघाने अतिशय योजनाबद्ध रीतीने विश्व हिंदू परिषदेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक घडवून आणली. ज्या विश्व हिंदू परिषदेत धर्म संसदेचे म्हणणे अंतिम मानले जात होते, तेथे आता संघाचेच म्हणणे अधिक महत्त्वाचे ठरू लागले, याचे कारण केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी संघालाही मोदी यांना बळ देणे अत्यावश्यक वाटू लागले. उपयोग होण्याऐवजी अडसर होऊ लागला, की पदावरील माणसांनाही अडगळीत टाकण्याचे हे कसब वाखाणण्याजोगेच. विष्णू सदाशिव कोकजे यांचे नाव संघवर्तुळात आदराने घेतले जाते. त्यांचीच विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने, विहिंप आणि हिंदुत्वही आता मवाळ होईल, असे मानण्यात येते. तोगडिया यांनी आता कितीही आगपाखड केली आणि संघ-भाजपविरोधात संघटन करण्याची घोषणा केली, तरी तिचे पुढे काय करायचे, याबद्दल सुस्पष्टता येण्याएवढा संदेश या निवडणुकीच्या निमित्ताने संघाने दिला आहे, एवढे मात्र निश्चित.