खरे तर वर्षांकाठी साडेसहा दशलक्ष टन मीठ निर्यात करणाऱ्या भारतात मिठाचा तुटवडा असल्याची अफवा पसरणे, हे समाजमनाची आजची स्थिती दर्शवणारे म्हटले पाहिजे. गरजेपेक्षा अधिक मीठ उत्पादन करणाऱ्या या देशात या एका अफवेमुळे मध्यरात्री मीठ आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेला कानपूरमध्ये धक्काबुक्कीमध्ये मृत्यू यावा आणि अनेक ठिकाणी त्यावरून दंगलसदृश परिस्थिती यावी, हे चित्र आजच्या माध्यमक्रांतीच्या युगात अधिक चिंताजनक म्हणायला हवे. उत्तर प्रदेशात मीठ गायब झाल्याची निर्माण झालेली अफवा मिठागरे असलेल्या मुंबईपर्यंत क्षणार्धात पोहोचण्यासाठी सामाजिक माध्यमांनी मोठाच हातभार लावला खरा, परंतु आपली सगळी बुद्धिमत्ता गहाण टाकून, त्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना काय म्हणावे.. या देशात अफवा वाऱ्यासारख्या पसरतात आणि त्याहूनही गंभीर म्हणजे मोठा समाज त्यावर विश्वास ठेवतो. गणपती दूध पितो या अफवेवर असाच विश्वास ठेवला गेला आणि नंतर आपले हसू झाल्याचे लक्षात येऊनही, समाजमन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत नाही. कशावरही विश्वास बसण्याची ही मानसिकता कातर आहे, तेवढीच दुर्दैवीही आहे. मीठ महाग झाल्याची किंवा ते बाजारातून गायब झाल्याची बातमी पसरल्यानंतर मुंबईतील अनेक दुकानांसमोर रांगा लागल्या. सरकारने मीठ भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याचे जाहीर केल्यानंतरही घरात मिठाचा साठा करण्यास उद्युक्त झालेला समाज ते मिळवण्यासाठी प्रसंगी दोन हात करण्याची तयारी दाखवतो, तेव्हा तो कशावरही सहज विश्वास ठेवतो, हे लक्षात येते. दुसरीकडे नोटा रद्द झाल्याची बातमी हीही अफवा असल्याची चर्चा त्या दिवशी पसरली होती. हे सारे एक प्रकारच्या अस्थर्याला आमंत्रण देणारे आहे. समाजात सतत अशी घबराट पसरणे हे उद्योग, व्यवहार आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी सुलक्षण नव्हे. उलट अफवांमुळे पसरणारी अशी नाटय़मयता अनेकदा अधिक अडचणीची ठरते. अफवांमुळे समाजाची आकलनशक्ती गुंडाळली जाते आणि त्यातून अनेक भयावह म्हणता येतील, अशा अडचणी उभ्या राहू लागतात. मिठाचे भारतीय जीवनातील अनन्यसाधारण स्थान लक्षात घेतले, तरी कुणाही सामान्य व्यक्तीस ते प्रचंड प्रमाणात साठवून ठेवण्याची इच्छा व्हावी, याचे कारण येथे काहीही घडू शकते, यावर त्याची श्रद्धा निर्माण झाली आहे. हे असे होणे समाजाच्या निकोप वाढीस अडथळा आणणारे असते. समाजाच्या सर्व स्तरांतील लोक जेव्हा अशा अफवांवर विश्वास ठेवू लागतात, तेव्हा समाजजीवन विनाकारण उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. मिठाचा खडा जसे आपले जेवणच बेचव करून टाकतो, तसे या अफवांवर विश्वास ठेवणेही समाजजीवन सरभर करून टाकते, हे लक्षात घेऊन आपला सारासारविवेक गुंडाळून मेंढरासारखे भलत्याच्या पाठी धावत न सुटणे अधिक शहाणपणाचे. कोणत्याही सुविचारी समाजात असे घडायला नको आणि त्यासाठी आपली सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवणेच अधिक उपयुक्त ठरणारे असते, याचे भानही सुटायला नको.