मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ लोकसभा मतदारसंघात भाजपने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी जाहीर केल्याने वादाला तोंड फुटणार, हे निश्चितच होते. या मतदारसंघात काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांना उमेदवारी दिली आहे. सिंग हे रा. स्व. संघ आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध. त्यांच्याशी सामना करण्याकरिता भाजपने कडव्या हिंदुत्ववादी प्रज्ञासिंह यांना उतरवून मतांचे ध्रुवीकरण होईल, अशा पद्धतीने खेळी केली आहे. दिग्विजय सिंग यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात उतरविण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह किंवा उमा भारती यांच्या नावांची चर्चा होती, पण उभयतांनी नकार दिल्याने प्रज्ञासिंह यांचे नाव पुढे आले. प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचा आग्रह रा.स्व. संघाने धरला होता, असे सांगण्यात येते. भोपाळच्या लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष जाणारच, कारण या मतदारसंघातील प्रचार कोणत्या पातळीवर जाईल याची चुणूक उभयतांच्या प्रतिक्रियांवरून आली आहे. ‘अधर्मावर धर्म मात करेल’ ही प्रज्ञासिंह यांची प्रतिक्रिया बोलकी ठरते. ‘भगवा दहशतवाद हा चुकीचा शब्द रूढ करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकविण्यासाठीच प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देण्यात आली,’ या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्यावरून भाजपची खेळी स्पष्टच दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या अन्य नेत्यांनी ‘विकासाच्या मुद्दय़ावर लोकसभा निवडणूक लढविली जाईल,’ असे आधी जाहीर केले होते. सध्या तरी प्रचारात विकासाचा मुद्दा गौण ठरला असून, पुलवामा हल्ला आणि बालाकोटवरील हवाई हल्ले यावरून राष्ट्रवादाचा पुरस्कार केला जात आहे. याबरोबरच मतांचे ध्रुवीकरण होईल अशी पद्धतशीर खेळी केली जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून बजरंगबली की अली हा उल्लेख, अमित शहा यांच्याकडून सातत्याने उपस्थित केला जाणारा पाकिस्तानविरोधी मुद्दा हे सारे मतांच्या ध्रुवीकरणासाठीच केले जात असल्याचे स्पष्टच आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह या तब्बल नऊ वर्षे तुरुंगात होत्या. बॉम्बस्फोटासाठी प्रज्ञासिंह यांच्या नावावर नोंद असलेली दुचाकी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर अद्याप आहे. केंद्रात सत्ताबदल झाल्यावर तपास यंत्रणांचा रोख बदलला आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना जामीन मंजूर झाला. ‘मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या विरोधातील बाजू नमती घेण्याची सूचना आपल्याला तपास यंत्रणांनी केली होती,’ असा आरोप तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी केला तेव्हाच हा खटला कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट झाले होते. भाजपची राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे हे प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीवरून स्पष्ट झाले आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती किंवा विनय कटियार हे पक्षाच्या हिंदुत्वाचे चेहरे. पण या नेत्यांना भाजपने निवडणुकीच्या राजकारणातून यंदा सक्तीची निवृत्ती दिली. त्याच वेळी साध्वी प्रज्ञासिंह यांना रिंगणात उतरवून पक्षाचा हिंदुत्वाचा नवा चेहरा कसा असेल हे दाखवून दिले. भोपाळ मतदारसंघात १९८९ पासून सातत्याने भाजपचा उमेदवार निवडून येतो. या शहरात ७० टक्क्यांच्या आसपास हिंदू तर २५ टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम मतदार आहेत. मतांच्या ध्रुवीकरणावरच ही निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. धर्म, जात किंवा वर्णाच्या आधारे मतांचे पुष्टीकरण करण्याचा कल अमेरिका, फ्रान्स आदी पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये वाढला आहे. आपणही त्याला अपवाद नाही.