सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला वेग येण्यासाठी समतेच्या काही किमान मूल्यांना बहुसंख्य लोकांचीही सहमती आवश्यक असते. बहुसंख्यांची ही सहमती तोंडदेखली किंवा एखादय़ा ‘इव्हेन्ट’पुरती नव्हे, तर प्रामाणिक असावी लागते. लंडनच्या महापौर निवडणुकीत अशा सहमतीची बहुसंख्या दिसून आली, यासाठी ही निवडणूक महत्त्वाची. आजवर लंडनला मुस्लीम महापौर नव्हता. सादिक खान यांनी या थेट निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार झॉक गोल्डस्मिथ यांच्यापेक्षा तीन लाख मते अधिक मिळवून लंडनचा आणि ब्रिटनचा वैचारिक उदारमतवाद कायम आहे, हे दाखवून दिले. गोल्डस्मिथ हे कोटय़धीश आणि सादिक खान हे एका बसचालकाचा मुलगा म्हणून तसे गरिबीतच वाढलेले. गोल्डस्मिथ यांचे खानदान मूळचेच ब्रिटिश तर सादिक खान यांचे वडील पाकिस्तानातून लंडनमध्ये स्थलांतरित. असे अगदी ढोबळ विरोधाभास या निवडणुकीत होते. अशा विरोधाभासांपैकी तुलनेने गरीब किंवा तुलनेने अशक्त भासणाऱ्याचा विजय झाला, की काही तरी अद्भुत घडल्याचे समाधानही वाटते. हे समाधान सादिक खान यांच्याबाबत भाबडे ठरावे, कारण राजकीय क्षेत्रात स्थिरावण्यासाठी सादिक यांनी केलेली गुंतवणूक ही गेल्या किमान एका तपाची- म्हणजे त्यांनी वयाची पस्तिशीही गाठली नव्हती तेव्हापासूनची आहे. त्यामुळेच २००५मध्ये त्यांना टूटिंग भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून ब्रिटिश पार्लमेंटात प्रवेश मिळवता आला आणि ही खासदारकी टिकवता आली. तेव्हा या ‘मुस्लिमविजया’कडे निव्वळ एक अद्भुत घटना म्हणून पाहण्यापेक्षा लंडनच्या उदारमतवादी परंपरांनाही याचे पुरेसे श्रेय देणे उचित ठरेल. या परंपरा अर्थातच सर्वत्र मोडीत निघताहेत आणि लंडनची ताजी निवडणूकही त्यास अपवाद नव्हती. आपल्याकडील राज्यमंत्री- महाराज आणि खासदार- साध्वींना शोभेल, अशा मुस्लीमद्वेषाची राळ सादिक यांच्यावर उडविली गेली. ही टीका अनाठायी आहे, हे लोकांना दिसत असूनही ‘आयसिस’ व अन्य इस्लामी दहशतवादी संघटनांच्या कारवायांमुळे आयतेच तयार झालेले मुस्लीमविरोधी वातावरण आपल्या राजकीय लाभाचे ठरेल, असा मूर्ख विचार गोल्डस्मिथ आणि त्यांचे हुजूरपक्षीय भाईबंद करत राहिले. या टीकेला खरे तर, सादिक यांनी आधीच उत्तर दिले आहे. ‘फेअरनेस- नॉट फेव्हर्स : हाऊ टु रीकनेक्ट विथ ब्रिटिश मुस्लीम्स’ हे अवघे ८० पानी पुस्तक २००८ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले आणि २०१२ मध्ये त्याची आवृत्ती ‘फेबियन सोसायटी’ने इंटरनेटवरही मोफत उपलब्ध केली, त्यात समतेबद्दल सहमती या तत्त्वाला ‘मुस्लिमांना न्याय मिळवून देण्या’च्या अजेंडय़ापेक्षा अधिक महत्त्व द्या आणि मुस्लिमांकडून समरसतेच्या नुसत्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा ते कसे समरस होऊ शकतात याचे आत्मपरीक्षण करा, अगदी धोरणातसुद्धा मुस्लिमांना प्राधान्य द्याच, अशी मते सादिक यांनी मांडली आहेत. राहिला मुद्दा ‘त्यां’नी स्वत:ची लोकसंख्या वाढवून ‘त्यांचा माणूस’ सत्तापदी आणल्याचा! ब्रिटनमधील एकंदर ३० लाख मुस्लीम रहिवाशांपैकी ४० टक्के आबालवृद्ध मुस्लीम लंडन व आसपासच्या परिसरात राहतात, त्यांपैकी लंडनच्या मतदार-मुस्लिमांची संख्या दहा लाख गृहीत धरली, तरी सादिक यांच्या १३ लाख १५ हजारांहून अधिक मतांचा हिशेब या ‘गठ्ठय़ा’पेक्षा जास्तच भरतो. तरीही भारतीय संदर्भात सादिक यांचा विजय समजून घ्यायचा असेल, तर एक मार्ग आहे. मुंबईसारख्या शहरात ‘तरक्कीपसंद’ – म्हणजे सुधारणाप्रिय- बुद्धिवादी मुस्लीम १९५०-६०च्या दशकापर्यंत अनेक क्षेत्रांत आघाडीवर होते आणि हे ‘तरक्कीपसंद’ समाजवादी विचारांचेही होते. त्या सर्व विचारांचा प्रभाव सादिक यांच्यावरही आहे. कौतुक आहे ते, सुधारणाप्रियतेवरील विश्वास कायम राहू देणाऱ्या लंडनचे!