येत्या २ ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियन पत्रकार आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक जमाल खाशोगी यांच्या नृशंस हत्येला एक वर्ष पूर्ण होईल. त्यांना संपवण्यामागे सौदी अरेबियाचे राजपुत्र आणि त्या देशाचे वास्तवातील राज्यकर्ते मोहम्मद बिन सलमान यांचा हात होता की नाही, याविषयी तर्कवितर्क लढविले जात असले तरी ठोस पुरावा मिळालेला नाही. आता अलीकडेच ‘फ्रंटलाइन’ संस्थेने बनवलेल्या वृत्तपटात आणि ‘सीबीएस’ वाहिनीवरील एका कार्यक्रमात सलमान यांनी, खाशोगी यांच्या हत्येविषयी काही संदिग्ध विधाने केली आहेत. खाशोगी यांच्या हत्येची कल्पना नव्हती, पण या घटनेची जबाबदारी मी स्वीकारतो, असे राजपुत्र सलमान म्हणतात. खाशोगी यांची हत्या इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य कचेरीत झाली. या हत्येसाठी सौदी अरेबियातून जवळपास डझनभर मंडळी त्या देशाच्या सरकारी विमानातून इस्तंबूलला गेली. काही कागदपत्रे मिळवण्यासाठी खाशोगी त्या वेळी कचेरीत गेले होते. तेथून ते जिवंत परत आलेच नाहीत. सुरुवातीस खाशोगी वाणिज्य कचेरीतून कुठे गेले ते ठाऊक नाही, असा पवित्रा सौदी अरेबियाने घेतला होता. पण प्रथम तुर्कस्तान आणि नंतर संयुक्त राष्ट्रांच्या तपास अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केल्यानंतर खाशोगी यांची हत्या झाल्याची आणि त्यांच्या शरीराचे वाणिज्य कचेरीतच तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याची कबुली सौदी अरेबियाला द्यावी लागली. या घटनेविषयीचा संशय राजपुत्र सलमान यांच्याकडे वळल्यानंतर ते काही महिने अज्ञातवासात गेले होते. परंतु या वर्षी जून महिन्यात ओसाका येथे झालेल्या जी-२० परिषदेत ते पुन्हा प्रकटले. त्या वेळी समूह छायाचित्रात एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, दुसऱ्या बाजूला जपानी पंतप्रधान शिन्झो आबे, पाठीमागे तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा जागतिक नेत्यांच्या मांदियाळीत सलमान यांचे जणू पापक्षालनच झालेले होते! त्या भेटीत त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए इन यांच्याशी ८३० कोटी डॉलरचा करारही त्यांनी केला. खुद्द अमेरिकेत तेथील परराष्ट्र खाते आणि गुप्तहेर संस्था (सीआयए) यांची खाशोगी हत्येतील सलमान यांच्या सहभागाविषयी भिन्न मते आहेत. ट्रम्प यांनी खाशोगी हत्येचे वर्णन ‘भयानक घटना’ असे करण्यापलीकडे या प्रकरणात फार रस दाखवलेला नाही. ‘सीबीएस’ वाहिनीवरील त्या मुलाखतीत सलमान यांनी इराणसंदर्भात केलेले विधान खाशोगी हत्येवरील झोत इतरत्र वळवण्याविषयी त्यांची खटपट स्पष्ट करते. इराणशी संघर्ष चिघळला तर तेलाच्या किमती कल्पनातितरीत्या उसळतील आणि हाताबाहेर जातील. तसे झाल्यास जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, अशा इशारा त्यांनी दिला आहे. इराणला युद्धखोर ठरवून त्याला आवर घालण्यासाठी सर्वानी एकत्र यावे, असा त्यांचा एकंदरीत सूर होता. लष्करी नव्हे, तर राजकीय तोडगा काढावा असाही शहाजोग सल्ला त्यांनी दिला आहे. सल्ला शहाजोग, कारण सलमान यांनी अलीकडे उचललेली काही पावले राजकीय किंवा मुत्सद्दी शहाणपण दाखवणारी खचितच नाहीत. येमेनवर त्यांनी लादलेले युद्ध हाताबाहेर जाऊ लागले असून आता त्याच्या झळा सौदी अरेबियालाच बसू लागल्या आहेत. कतारसारख्या देशाशी विनाकारण वाकडय़ात शिरून त्या देशाची कोंडी करण्याचा प्रकार सलमान यांच्याच पुढाकाराने झाला. सुरुवातीस पाश्चिमात्य माध्यमे आणि नेतृत्वाला खूश करण्यासाठी काही जुजबी सुधारणा त्यांनी राबवल्या. परंतु नंतर देशांतर्गत राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी, खाशोगी यांची हत्या ही कृत्ये निव्वळ धक्कादायक नव्हे, तर सलमान यांचे धोकादायक पैलूही दाखवून जातात.