कॅथॉलिक सेक्युलर फोरम असे धर्मनिरपेक्षतेच्या नावाला हरताळ फासणारे नाव असलेल्या ख्रिश्चन कॅथॉलिकांच्या एका संघटनेने ‘अ‍ॅग्नेस ऑफ गॉड’ या नाटकाच्या मुंबईतील प्रयोगांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सध्याचे वातावरण पाहता या मागणीने कोणास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. प्रस्तुत नाटक एका ख्रिस्ती संन्यासिणीबद्दलचे आहे. ते िहदू वा मुस्लिमांबद्दलचे असते तर त्या धर्माच्या ठेकेदारांनी त्यावर बंदीची मागणी केली असती. याबाबत सगळेच धर्म आता समान पातळीवर आले आहेत. बंदीसाठीची जी कारणे हे धार्मिक दहशतवादी देतात तीसुद्धा एकसमान असतात. कॅथॉलिक सेक्युलरांनुसार हे नाटक कॅथॉलिकांच्या विरोधी आहे. ते परमेश्वराची टवाळी करते. म्हणून त्यावर बंदी हवी. हा युक्तिवाद अगदी एकमेकांची उसनवारी केल्यासारखाच आहे. हे एवढय़ावरच थांबलेले नाही. त्यात ख्रिश्चन नट नाही, हाही आक्षेपाचा एक भाग आहे. िहदू धर्मावर टीका करणारांना नेहमी असे प्रश्न केले जातात की तुम्हाला मुस्लिमांच्या वाईट गोष्टी, त्यांचे मशिदींवरील भोंगे वगरे वगरे दिसत नाहीत का? तुम्ही सतत िहदूंबद्दलच का बोलता? मुस्लिमांबद्दल बोलताना तुमची जीभ टाळ्याला चिकटते का? पूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘एकवीस अपेक्षित प्रश्नसंच’ निघत. उपरोक्त सवाल सर्व धार्मिकांच्या एकवीस अपेक्षितांमधलेच म्हणावे लागतील. या फोरमचे सवालही तसेच आहेत. एवढेच नव्हे, तर ‘हे नाटक कोणा मौलवी किंवा मुन्नीबद्दल किंवा अन्य एखाद्या धर्मातील संन्याशिणीबद्दल असते तर ते सहन करण्यात आले नसते. त्यावर िहसक प्रतिक्रिया उमटल्या असत्या,’ असे सांगत त्यांनी आपल्या धर्मानुयायांना भडकावण्याचा प्रयत्नही केला आहे. धार्मिक दहशतवादाच्या रीतिभातीनुसारच हे सर्व घडत आहे. याबाबतची चर्चची भूमिकाही पाहण्यासारखी आहे. चर्चने बंदीची मागणी केली नसल्याचे मुंबई आर्चडायसिसचे प्रवक्ते नायजेल बॅरेट यांनी स्पष्ट केले आहे, परंतु त्याचबरोबर आविष्कार स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचेही भान असले पाहिजे अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे. अर्थ स्पष्ट आहे. ही जबाबदारी धर्माबद्दल असली पाहिजे आणि धर्म म्हणजे आम्ही सांगतो तोच असला पाहिजे. ही छुपी सेन्सॉरशिप झाली. या सर्व वादामध्ये मौजेची बाब अशी की, हे नाटक मुळात आजचे नाहीच. अमेरिकी नाटककार जॉन पेलमेयर यांचे हे नाटक. १९८५ मध्ये त्यावर चित्रपटही निघाला होता. एका संन्याशिणीला मूल होते. ती त्याला मारून टाकते. त्याचा बाप कोण हे तिला माहीत नसते. ती समजते हा देवपुत्र आहे. न्यायालयात ती वेडी असल्याचे सिद्ध होते. अशी त्याची साधारण कथा. तीही सत्यकथेवर आधारलेली. त्या काळी ती कोणालाही बंदी घालण्याच्या लायकीची वाटली नव्हती. आज मात्र तिने देव-धर्माला बाट लागत असल्याची बोंब ठोकली जात आहे. असे का, हा सर्वानीच विचार करावा असा प्रश्न आहे. आज अतिरेक हा सर्व धर्मातील समभाव बनत चालला आहे. धार्मिक प्रतीकांपायी माणूस मारण्याइतका क्रूर होत चालला आहे. आणि त्या सगळ्यांचे एकच धमकावणे आहे. आमच्याबद्दल कोणीही काहीही बोलता कामा नये. जे बोलायचे ते दुसऱ्यांबद्दल बोला! बोलणारे असे बोलत नसतात असे नाही. पण या अतिरेक्यांची अवघी ज्ञानेंद्रियेच बधिर झालेली असतात, त्याला काय करायचे?

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न