ज्येष्ठ रंगकर्मी आणि ‘आविष्कार’चे अध्वर्यू अरुण काकडे तथा काकडेकाका हे नाव प्रायोगिक/ समांतर रंगभूमीशी गेल्या साठेक वर्षांहून अधिक काळ नाळेसारखे अभिन्न लगडून आहे. नाटक हा काकडेकाकांचा शब्दश: श्वास होता. ‘आविष्कार’ संस्थेचे बिऱ्हाड ज्या माहीम म्युनिसिपल स्कूलमध्ये होते, तिथे गेल्याविना त्यांना किंचितही चैन पडत नसे. काम असो-नसो; कुणी येवो-न येवो; काकडेकाका रोज संध्याकाळी माहीमच्या शाळेत गेल्याविना राहत नसत. पुण्यात वाडिया कॉलेजमध्ये शिकत असताना प्रा. भालबा केळकर यांनी त्यांच्या डोक्यात नाटकाचा किडा घुसवला. या किडय़ाने त्यांच्या इहलोकीतून प्रस्थानापर्यंत कधीही पाठ सोडली नाही. पुढे ते भालबांच्याच ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ संस्थेत सामील झाले. त्या वेळी राज्य नाटय़स्पर्धा नुकतीच सुरू झाली होती. पीडीएची नाटकेही त्यात भाग घेत. नोकरीनिमित्ताने पुढे ते मुंबईत आले. पण नाटकाचा किडा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्याच दरम्यान विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद- सुलभा देशपांडे आदी तरुण रंगकर्मी रंगभूमीवर नवे काही तरी करू बघत होते. त्यातून ‘रंगायन’ची स्थापना झाली. काकडेही या कारव्यात सामील झाले. रंगमंचापेक्षा पडद्यामागच्या कामांत त्यांचा अधिक सहभाग असे. रंगायनने मराठी रंगभूमीवर एक मन्वंतर घडवून आणले. त्यात काकडेंचाही मोलाचा वाटा होता. पुढे ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या अरविंद देशपांडे दिग्दर्शित नाटकाचे अधिक प्रयोग करण्यावरून उद्भवलेल्या वादातून ‘रंगायन’ फुटली. तेंडुलकर, अरविंद व सुलभा देशपांडे, काकडे आदी मंडळी त्यातून बाहेर पडली आणि त्यांनी ‘आविष्कार’ संस्थेची स्थापना केली. गिरीश कार्नाड यांच्या ‘तुघलक’सारख्या बलदंड नाटकाच्या निर्मितीने ‘आविष्कार’ने आपली दमदार वाटचाल सुरू केली. छबिलदास शाळेत प्रायोगिक नाटकांसाठी नवे घर वसवण्यात आले. पुढे ‘छबिलदास नाटय़चळवळ’ नामे ते अजरामर झाले. या सगळ्यात काकडेकाकांचे व्यवस्थापन, नियोजन, निर्मिती आदी गोष्टी हाताळण्यातल्या कुशलतेचा महत्त्वपूर्ण वाटा होता. ‘आविष्कार’चे नेतृत्व जरी विजय तेंडुलकर, देशपांडे दाम्पत्य वगैरे मंडळींकडे होते, तरी संस्थेचा खरा आधारस्तंभ होते ते काकडेकाकाच! त्यामुळेच ही मंडळी गेल्यावरही काकडेकाकांनी ही संस्था जितीजागती ठेवली. ‘आविष्कार’ने फक्त स्वत:पुरते कधीच पाहिले नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील नव्या, धडपडय़ा रंगकर्मीनाही तिने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. रंगकर्मीच्या चार ते पाच पिढय़ा ‘आविष्कार’ने घडवल्या. ‘आविष्कार-चंद्रशाला’च्या ‘दुर्गा झाली गौरी’ या बालनाटय़ातून अनेक कलाकार घडले. ‘आविष्कार’ने दीडशेहून अधिक नाटके आतापर्यंत मंचित केली असून त्यांचे हजारो प्रयोग देशभरात केले आहेत. ‘वाडा चिरेबंदी’ त्रिनाटय़धारेचा नऊ तासांचा आगळा प्रयोग समांतर धारेत सादर करण्याचे धाडस केवळ ‘आविष्कार’च करू जाणे. नवे काही सादर करू पाहणाऱ्या तरुण रंगकर्मीमागे काकडेकाका खडकासारखे खंबीरपणे उभे राहत. त्यासाठी करावी लागणारी सारी उस्तवारही ते कसलाही गाजावाजा न करता करीत. प्रायोगिक रंगभूमीला स्वत:चे हक्काचे घर मिळावे म्हणून त्यांनी अ. भा. नाटय़ परिषदेशी अविरत संघर्ष केला. पण त्यांचे हे स्वप्न मात्र पुरे होऊ शकले नाही. काकडेकाकांच्या कार्याचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला असला तरीही प्रायोगिकांना स्वत:चे हक्काचे घर मिळेल त्या दिवशीच त्यांचा आत्मा खऱ्या अर्थाने शांत होईल.