21 February 2019

News Flash

भरवशालाच टाचणी!

आठवडा उलटला आणि  सेन्सेक्सचा पारा ३४ हजारांवर येऊन ठेपला.

संग्रहित छायाचित्र

अर्थव्यवस्थेत बरे काही घडो अथवा न घडो, एक घटक मात्र सरकारवर भरवसा ठेवून होता. अर्थव्यवस्थेला सुदिन नक्कीच आणले जातील याबाबत भांडवली बाजार पूर्ण आशावादी होता. या आत्यंतिक आशावादाच्याच परिणामी सेन्सेक्सने ३६ हजाराचा ऐतिहासिक मैलाचा दगड आठवडय़ापूर्वी गाठला. पण आठवडा उलटला आणि  सेन्सेक्सचा पारा ३४ हजारांवर येऊन ठेपला. व्यवहार झालेल्या अवघ्या चार-पाच दिवसांत तब्बल दोन हजारांची ही घसरंगुडी. बाजाराचा वजनदार आशावाद पार कचकडय़ाचा ठरला. अर्थसंकल्पातील कर तरतुदींमुळे तो पराकोटीचा निराशावादी बनला, असा ताज्या घसरणीचा निष्कर्ष काढला गेला. अर्थात देशाच्या अर्थमंत्रालयाला हे मान्य नसणेही स्वाभाविकच. म्हणूनच बाजारातील ताजी महाघसरण ही अर्थसंकल्पातून प्रस्तावित दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभावरील १० टक्क्यांच्या करमात्रेवरील रोष म्हणून नाही, तर जागतिक बाजारातील नरमाईचा हा परिणाम असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अधिया यांना सोमवारी द्यावे लागले. ते बव्हंशी खरेही आहे. जगभरातच समभाग बाजाराला नकारात्मक भावनेचा वेढा पडला आहे. पण अधिया अधिकचे असेही म्हणाले की, ३६ हजारांवर चढलेल्या सेन्सेक्समधून पाचशे-हजार इकडे-तिकडे झाले तर त्याने इतका काय फरक पडणार? सत्ताधाऱ्यांच्या प्रतिनिधीने अथवा राजकारण्यांनी भाष्य करणे केव्हाही बाजाराला रुचत नाही आणि जेव्हा जेव्हा असे घडले तेव्हा तेव्हा बाजारात भूकंप घडून आला आहे. शिवाय घसरण पाचशे-हजारावर थांबेल की आणखी विस्तारेल, याची हमी नाहीच. अर्थसंकल्पाआधी वास्तवदर्शी सूर लावताना देशाचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन एका मुलाखतीत म्हणूनही गेले की ‘बाजाराचा सद्य फुगवटा’ अर्थव्यवस्थेचा अस्सल निदर्शक नाही. यामागील त्यांचा रोख आणि इशारा सरकारला ध्यानात घ्यावासा वाटला नाही. तसा त्यांचा सल्ला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्यक्षात अर्थसंकल्प मांडतानाही लक्षात घेतलेला नाहीच! एकंदरीत भांडवली बाजाराला कर-धडकीने घेरले आहे आणि तो कोसळत चालला आहे. तर त्या धास्तीतून जेटली यांना माघारीचे पाऊल टाकावे लागते काय असे चित्र निर्माण केले आहे. तसे झाले तर यंदाच्या अर्थसंकल्पातील एकमेव कठोरतम आणि पर्यायाने न्याय्य म्हणावी अशी तरतूदही मागे घ्यावी लागण्याची नामुष्की सरकारवर येईल. नव्या कराचे समर्थन करण्यामागे तर्क साफ आणि शुद्ध आहे. पगारदार, मग त्यांचे उत्पन्न कितीही कमी आणि अपुरे का असेना, ते जर करपात्र ठरत असल्यास त्यांना प्रामाणिकपणे किंबहुना सक्तीने कर भरावाच लागतो. मग चांगला लाभ मिळवून देणाऱ्या शेअर गुंतवणुकीवर कर भरावा लागला तर आदळआपट कशासाठी? मात्र गुंतवणूकदारांच्या दृष्टीने मोलाचा प्रश्न भांडवली बाजाराचा आगामी कल कसा असेल? ही मोठी अनिश्चित आणि जोखमीची बाब जरूरच आहे. पण वास्तविक मूल्यांकनापेक्षा किती तरी जास्त आणि सेन्सेक्सच्या आठवडय़ाला हजार या गतीने सुरू असलेल्या मुसंडीतही जोखीम होतीच. भारताबाहेर इतर प्रमुख बाजारांकडे नजर फिरविल्यास, त्यांचेही मूल्यांकन असे अवास्तव ताणले गेल्याचे आढळून येते. अमेरिका-जपानच्या बाजारांचे निर्देशांक अनुक्रमे १५ आणि २५ वर्षांच्या उच्चांकांना मागे टाकत पुढे सरसावत चालले होते. त्या सर्वाना एकाच वेळी टाचणी लागली आणि नेमकी आपल्याकडे अर्थसंकल्पातील कर-जाचाशी त्याची वेळ जुळली हा योगायोगच! बाजाराच्या तेजीला ग्रहण लागून तो अकस्मात घरंगळणे नवलाचे नाही. मोठय़ा कालावधीचे उद्दिष्ट ठेवून गुंतवणूक करणाऱ्यांनी असे चढ-उतार दुर्लक्षितच करावेत. महिन्याला छोटय़ा छोटय़ा एसआयपीच्या रूपात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारांसाठी तर हे चढ-उतार पोषकच. जोखीम असली तरी दीर्घावधीत सर्वाधिक सरस परतावा मिळविण्याचा हाच एक पर्याय आहे. हा विश्वास आणि भरवसा मात्र ढळता कामा नये!

First Published on February 7, 2018 4:44 am

Web Title: sensex falls down budget 2018