News Flash

सरकारच्या अधिकारास आव्हान

शरद पवार यांनी नेहमीच बेरजेच्या राजकारणावर भर दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

संसदीय कारकीर्दीस अर्धशतक पूर्ण झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच बेरजेच्या राजकारणावर भर दिला. अगदी त्यांच्यावर विविध आरोपांची राळ विरोधी नेत्यांनी उठविल्यावरही पवार विचलित झाले नाहीत. तेवढय़ाच शांतपणे आरोपांना सामोरे गेले. संसदीय कारकीर्दीत निम्म्यापेक्षा जास्त काळ सत्तेत किंवा सत्ताधारी पक्षात काढल्याने विरोधाची धारही तेवढी आक्रमक नसायची. पण पहिल्यादांच पवारांनी थेट सरकारला सरळसरळ आव्हान दिले आहे. भाजप सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असला तरी त्याची अद्यापही पूर्तता झालेली नाही. त्यातच वीज थकबाकीसह विविध वसुलींसाठी सरकारने शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला आहे. ‘कर्जमाफीचा लाभ मिळाल्याशिवाय सरकारचे कोणतेही कर, वीज बिल भरू नका,’ असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. तसेच शेतकऱ्यांना त्रास दिला किंवा त्यांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न झाल्यास बळीराजा सरकार उलथवून टाकेल, असा सक्त इशाराही पवारांनी दिला. नागपूरच्या विधिमंडळावर काढण्यात आलेल्या मोर्चात पवारांनी भाजप सरकारच्या विरोधात सरळसरळ बंडाचीच भाषा केली. ‘कर भरू नका’ हे सरकारच्या अधिकाराला थेट आव्हान असते. पवारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादीला राजकीय लाभ किती होतो हा मुद्दा. केंद्रात दहा वर्षे कृषी खाते भूषविताना शेतकऱ्यांच्या जीवनात पवारांनी आमूलाग्र बदल घडवून आणला, असा दावा राष्ट्रवादीच्या वतीने सातत्याने केला जातो. हमी भावात वाढ, शेतकऱ्यांच्या हातात चार जादा पैसे पवारांमुळे मिळाले, असे राष्ट्रवादीकडून बिंबवले जाते. पण या शेतकरीवर्गाने गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला राज्यात साथ दिली नाही. राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पीछेहाट झाली. पश्चिम महाराष्ट्र या पक्षाचे बलस्थान असलेल्या विभागातही भाजपने मुसंडी मारली. राष्ट्रवादीचे बालेकिल्ले भाजपमुळे भुईसपाट झाले. स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. अशा वेळी राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देणे हे मोठे आव्हान पवारांसमोर आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा हाती घेत पवारांनी पुन्हा एकदा वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा हाणून पाडतात यावरही बरेच अवलंबून असेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असला तरी त्यासाठी क्लिष्ट अर्ज भरण्याची सक्ती करण्यात आली. आधीच जाचक अटी लादून शेतकऱ्यांची सहानुभूती गमाविली. माहिती तंत्रज्ञान आणि सहकार या सरकारच्याच दोन विभागांमध्ये योग्य समन्वय साधला गेला नाही. या पाश्र्वभूमीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ लवकरात लवकर कसा मिळेल याकडे मुख्यमंत्र्यांनाही लक्ष द्यावे लागणार आहे. सरकार उलथविण्याची किंवा सरकारला आव्हान देण्याची भाषा पवारांनी केली असली तरी त्यांचा एकूणच पूर्वेतिहास लक्षात घेता ते कितपत ताणतात हासुद्धा कळीचा मुद्दा. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही काळात एकाच वेळी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवल्याने या पक्षाचे आतापर्यंत नुकसानच जास्त होत गेले आहे. मात्र शेतकऱ्यांना चिथावणी देत पवारांनी त्यांच्यातील अस्वस्थतेला वाट तरी करून दिली आहे. शेतकरीवर्ग पवार अथवा राष्ट्रवादी काँग्रेसला किती साथ देतो एवढेच सरकारपुढील आव्हान नसून, हे सरकार आपले असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना देणे आणि सरकारचे अधिकारच अमान्य करण्याची भाषा कुणाहीकडून होऊ न देणे, ही खरी कसोटी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 2:49 am

Web Title: sharad pawar attacks pm narendra modi
Next Stories
1 सरकारी अनास्थेचा विकार..
2 नेपाळमध्ये ‘चीनमित्र’ सरकार
3 नगरपालिकांचे दुखणे कायम
Just Now!
X