News Flash

पवारांचे बदलते वारे

राष्ट्रवादीच्या या राजकारणाचा अंदाज असल्यानेच काँग्रेसनेही पवार यांच्या आघाडीच्या प्रस्तावावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरीण मानल्या जाणाऱ्या शरद पवार यांनीही काँग्रेस या जुन्या मित्राशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत.

राजकारणात ध्येय, निष्ठा, विचारधारा हे सारे दुय्यम ठरले आहे. वारा कोणत्या दिशेने वाहतो त्या दिशेने पाऊल टाकल्यास यशस्वी होतो याचा राजकीय नेत्यांनाही अंदाज आला आहे. सत्तेच्या जवळ राहायचे, मग सत्ता कोणत्याही पक्षाची असो; तख्ताशी दोन हात करायचे नाहीत, अशा पद्धतीने काही राजकीय नेत्यांची पावले पडत असतात. देशाच्या राजकारणात बिहारचा नेहमीच आदर्श समोर ठेवला जातो. जयप्रकाश नारायण यांची चळवळ, काँग्रेसचा पाडाव याला बिहारचीच किनार आहे. बिहारच्या निकालानंतर राजकारणाचे संदर्भ बदलू लागले. नितीशकुमार-लालूप्रसाद-काँग्रेस या महाआघाडीच्या विजयाने ‘बिगरभाजप आघाडी’तील पक्षांमध्ये हुरूप आला. समविचारी पक्षांची मोट बांधल्यास यश मिळू शकते, असा विश्वास निर्माण झाला. वाऱ्याची दिशा बदलताच महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरीण मानल्या जाणाऱ्या शरद पवार यांनीही काँग्रेस या जुन्या मित्राशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता काँग्रेससह आघाडी करावी, अशी सूचना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केली आहे. राष्ट्रवादीचे सध्या नक्की काय चालले आहे, याचा पक्षातील नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनाच अंदाज येईनासा झाला आहे. सर्वसामान्य जनतेतही राष्ट्रवादीबद्दल संभ्रम तयार झाला आहे. केंद्र व राज्यात भाजप सत्तेत येताच राष्ट्रवादीने भाजपला अनुकूल अशी पावले टाकली. अगदी अलीकडेच झालेल्या बिहार निवडणुकीत नितीशकुमार यांच्या आघाडीतून राष्ट्रवादी आणि मुलायमसिंग ऐन वेळी बाहेर पडण्यामागे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणे हा हेतू होता, अशी टीका झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बारामती भेटींमुळे भाजपचेही पवारप्रेम लपून राहिलेले नाही. एकीकडे राष्ट्रवादीने भाजप सरकारवर टीका करायची आणि दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीतील वाढती जवळीक यामुळे राष्ट्रवादीबद्दल संशय बळावत चालला. बिहारचा निकाल भाजपच्या विरोधात जाताच पवार यांनी लगोलग काँग्रेसबरोबर मैत्रीचा पर्याय मोकळा ठेवला. बिहारच्या निकालानंतर बिगरभाजप पक्षांची राष्ट्रीय पातळीवर मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर नितीशकुमार यांच्या शपथविधीचे निमंत्रण पवार बहुधा स्वीकारण्याची शक्यता आहे. पुढील वर्षभरात विधान परिषदेच्या ३० जागांकरिता निवडणूक होत असून, दोन्ही काँग्रेसला परस्परांची गरज आहे. त्यातही राष्ट्रवादीला काँग्रेसची जास्त गरज आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत वातावरण कसे राहील याचा अंदाज घेऊनच राष्ट्रवादीची पावले पडू शकतात. उद्या काँग्रेसला वातावरण अनुकूल नाही हे लक्षात आल्यास भाजपला अनुकूल अशी भूमिका पुन्हा घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीच्या या राजकारणाचा अंदाज असल्यानेच काँग्रेसनेही पवार यांच्या आघाडीच्या प्रस्तावावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आघाडीचा निर्णय दिल्लीतच ठरेल, ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. राष्ट्रवादीवर किती विसंबून राहायचे, हा काँग्रेसला भेडसावणारा प्रश्न आहे. राज्यात काँग्रेसला पवारांशिवाय पर्याय नसतो. एकाच वेळी भाजप आणि काँग्रेस अशा दोन डगरींवर पाय ठेवल्यामुळे राज्यात राष्ट्रवादीचे नुकसानच झाले आहे. यातून राष्ट्रवादीला बाहेर पडावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 3:21 am

Web Title: sharad pawar in fever of alliance with congress
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 महासत्तेकडून ‘शहाणपणा’ची आस
2 जाफरी यांचे जाणे..
3 बिनकामाचा खुलासा
Just Now!
X