X

गादी आणि गाडी

अखेर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वास्तवाची जाणीव झाली.

अखेर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वास्तवाची जाणीव झाली. शरद पवार यांनी महाराष्ट्रात बेरजेचे राजकारण केले. त्यांच्या पक्षात प्रत्यक्ष बेरीज झाली नाही तरी परिघातील अन्य राजकीय पक्षांत होणाऱ्या वजाबाकीतून आपल्या पक्षाची बेरीज साधण्याचे कसब त्यांच्या अर्धशतकी राजकीय अनुभवामुळे त्यांना साधलेले आहे. पण गेल्या दोन-तीन वर्षांत राजकारण व सत्ताकारणाने अचानक कलाटणी घेतल्याने, भाजपविरोधातील सर्वच राजकीय पक्षांना आपली परंपरागत गणिते बदलणे भाग पडले. काँग्रेससारखे प्रस्थापित पक्षही अजूनही काहीसे चाचपडतच आहेत.  पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राजकारणात अधूनमधून महत्त्वाची भूमिका बजावत असली, तरी त्यांच्या अस्तित्वाची आणि विस्ताराची खरी भिस्त महाराष्ट्रावरच आहे. शिवाय, हा पक्ष स्वतंत्रपणे विस्तारू शकत नाही, हे त्यांच्या काँग्रेससोबतच्या आघाडीच्या राजकारणावरून स्पष्ट झाले आहे. शहरी महाराष्ट्रात अजूनही त्यांनी पुरेसे पाय रोवलेले नाहीत. अशा स्थितीतच भाजपच्या विस्तारवादी राजकारणाचे आव्हान उभे ठाकल्याने, बेरजेची गणिते नव्याने जुळविणे ही या पक्षाची गरज ठरली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असो, विदर्भ-मराठवाडय़ातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा असो किंवा मराठा आरक्षणासारखा सामाजिकदृष्टय़ा धगधगणारा मुद्दा असो, यावरून निर्माण झालेल्या राजकारणावर सध्याच्या विरोधकांना फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. कर्जमाफीच्या मुद्दय़ावर सरकारने चतुराईने बाजी मारली, तर मराठा आरक्षणासारख्या प्रश्नाचे सुकाणूच काँग्रेसमध्ये धुसफुसणाऱ्या नारायण राणे यांच्या हाती देऊन तो प्रश्नही विरोधकांच्या हातून भाजपने हिरावून घेतला. विदर्भातील आत्महत्यांच्या मुद्दय़ावर काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्ष फारसे प्रभावी ठरले नाहीत. अशा वेळी, पक्षाचा पाया असलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरील पकड पुन्हा भक्कम करणे ही राष्ट्रवादीची राजकीय गरज बनली. काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे भाजपप्रणीत रालोआच्या वळचणीला गेले. काँग्रेसमधील या वजाबाकीतूनही अप्रत्यक्ष बेरीज अशक्य असल्याची जाणीव राष्ट्रवादीला झाली असावी. त्यामुळेच, पश्चिम महाराष्ट्रातच पक्षाला उभारी देण्यासाठी थोरल्या पवारांनाच पुन्हा पुढाकार घ्यावा लागला आहे. साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार असले, तरी मुळात ते स्वयंभूच आहेत. कोणत्याही पक्षाचे निशाण खांद्यावर असणे ही त्यांची गरज नाही, हेही स्पष्ट झाले आहे. उलट, आपले निशाण उयनराजेंनी खांद्यावर घ्यावे यासाठीच तमाम पक्ष उत्सुक असताना उदयनराजेंना सोबत ठेवण्यासाठी थेट पवार यांनाच पुढाकार घ्यावा लागला आहे. उदयनराजे आणि शरद पवार यांचा पुणे-सातारा हा ‘सहप्रवास’ किंवा उदयनराजेंनी शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य करावे हे काही योगायोग नाहीत. ते घडविण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न केले गेले असणार हे उघड आहे. उदयनराजेंची नाळ अजूनही राष्ट्रवादीसोबत जोडलेली आहे, हे सिद्ध करणे हे या सहप्रवासाचे प्रयोजन असले, तरी ते घडवून आणण्याची किमया शरद पवार यांच्याखेरीज पक्षातील राज्यस्तराचा कोणताही नेता साध्य करू शकत नाही, हेही स्पष्टच आहे. राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांसोबत  असलेले उदयनराजेंचे सख्य जगजाहीर आहे. अशा परिस्थितीत राजघराण्याच्या गादीचा हा वारस आपल्यासोबत राखून पश्चिम महाराष्ट्रावरचा झेंडा फडकत ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे. राजघराण्याची ‘गादी’ आणि शरद पवारांची ‘गाडी’ एकत्र आल्याने, पश्चिम महाराष्ट्रात तरी राष्ट्रवादीचे वारे जोमदार होतील असा या पक्षाचा होरा असावा. उदयनराजेंचा स्वयंभूपणा पाहता, हे वारे जपण्याचे कसब  पवार यांच्याखेरीज अन्य नेत्यांना दाखविता येईल किंवा नाही याविषयी मात्र शंकाच आहे.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain