News Flash

पुन्हा पवारांचे क्रिकेट राज्य!

आर्थिकदृष्टय़ा बडय़ा असणाऱ्या बहुतेक सर्व क्रीडा संघटनांची अध्यक्षपदे राजकारण्यांकडे आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय या देशातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील संघटनेच्या अध्यक्षपदी नागपूरच्या शशांक मनोहर यांचे पुन्हा एकदा विराजमान होणे ही राजकारणाची एक नवी चाल आहे, हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. मनोहर यांनी याआधी तीन वर्षे अध्यक्षपद भूषविले होते. क्रिकेट, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स आदी सर्व क्रीडा संघटना राजकारण्यांचा अड्डा झाल्या आहेत. आर्थिकदृष्टय़ा बडय़ा असणाऱ्या बहुतेक सर्व क्रीडा संघटनांची अध्यक्षपदे राजकारण्यांकडे आहेत. कबड्डी, खो-खो, कुस्ती या मैदानी खेळांच्या संघटनांमध्ये महत्त्वाची पदे भूषविल्यावर शरद पवार यांनी मुंबई क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट संघटनेत प्रवेश केला. जगमोहन दालमिया, बिंद्रा आदींची भारतीय क्रिकेट संघटनेत वर्षांनुवर्षे मक्तेदारी होती. राजकारणात भल्याभल्यांना गारद केलेल्या शरद पवारांनी तेथे अशी काही फिल्डिंग लावली, की एकाच अपयशानंतर बीसीसीआयचे अध्यक्षपद त्यांच्या पदरात सहजपणे आले. भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद भूषविल्यावर पवारांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे वेध लागले आणि ते पदसुद्धा त्यांनी पटकावले. पवार दिल्लीत गेले तरी त्यांचे लक्ष गल्लीत असते, असे नेहमीच बोलले जाते. तसेच झाले, आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षपद भूषविल्यावरही त्यांना मुंबईच्या अध्यक्षपदाचा मोह सुटला नाही. दालमिया यांच्या निधनानंतर अध्यक्षपदासाठी वास्तविक पवार यांनीच तयारी सुरू केली होती. माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हेसुद्धा पट्टीचे. त्यांनी पवारांच्या नावाला विरोध केला. अध्यक्षपदाकरिता भाजपशी संबंधित आठ मते निर्णायक होती. पवारांनी पुन्हा एकदा अशी काही जादू केली, की भाजपने त्यांच्या मागे सारी ताकद उभी केली. वित्तमंत्री अरुण जेटली हे पवारांच्या मदतीला धावून आले. बीसीसीआयचे सचिव व भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांचा अध्यक्षपदाकरिता प्रयत्न सुरू होता. पक्षांतर्गत राजकारणात ठाकूर यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खप्पामर्जी आहे. यातूनच ठाकूर यांना मंत्रिपद न देता हिमाचल प्रदेशातून अजिबात जनाधार नसलेल्या नड्डा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. अध्यक्षपद मिळण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात येताच पवार यांनी अध्यक्षपद आपल्या निकटवर्तीयाकडे राहील याची व्यवस्था केली. यातूनच पवारांचे बीसीसीआयमधील पट्टशिष्य शशांक मनोहर यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. मनोहर अध्यक्ष असले तरी देशातील बलाढय़ संघटनेची अप्रत्यक्षपणे सूत्रे पवारांच्या हाती आली आहेत. यापूर्वीही मनोहर यांची पवारांमुळेच अध्यक्षपदी निवड झाली होती आणि तेव्हाही पवार यांच्या कलानेच या संघटनेचा कारभार होत होता. केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजप आणि पवार यांचे चांगलेच गूळपीठ जमले आहे. बिगरकाँग्रेसी पक्षांना चुचकारण्याकरिता भाजपला पवारांची मदत लागते. तसेच कायम दिल्लीच्या तख्ताबरोबर राहण्याकरिता प्रसिद्ध असलेले पवार भाजपला मदत होईल, अशी खेळी खेळत असतात. आयपीएलमधील सट्टा प्रकरण, ललित मोदी आदींमुळे भारतीय क्रिकेट संघटना बदनाम झाली आहे. आयपीएलमधील घाण साफ करण्यासाठी न्या. लोढा समितीने काही उपाय सुचविले असले तरी काही पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध आड येत असल्याने कारवाईबाबत मुळमुळीत भूमिका घेतली जात आहे. मनोहर यांनी संघटनेचा कारभार पारदर्शक करण्याचा निर्धार केला आहे. गुरू शरद पवार यांनीही साथ दिली, तर हा निर्धार प्रत्यक्ष कृतीतही येऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2015 1:02 am

Web Title: shashank manohar elected bcci chief
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 नैतिकता आणि बाजारपेठेचा तिढा
2 ‘कोर्टा’चा सल्ला
3 सर्वधर्मसमभाव!
Just Now!
X