21 October 2019

News Flash

जाळ आणि ऊब

विरोधकांनी आपल्यापुढे उभेच राहू नये, इतपत दमनशाहीदेखील याच कार्यकाळात सुरू होती.

बांगलादेशाची सत्ता पुन्हा शेख हसीना

बांगलादेशाची सत्ता पुन्हा एकवार शेख हसीना यांनाच- तीही ३०० पैकी २८८ जागा सत्ताधारी आघाडीला अशा प्रचंड बहुमताने- देणारा निकाल तेथील विरोधी पक्षीयांनी संशयास्पद ठरविला नसता तरच नवल. याहीपैकी हसीना यांच्या अवामी लीगने २६८ जागा जिंकल्यामुळे बांगलादेशात ‘एकपक्षीय लोकशाही’ असल्याचे चित्र कायम झाले आहे. निवडणुकीच्या प्रचारकाळात कोठडीतच डांबले गेलेले देशभरातील १५०० विरोधी पक्षीय कार्यकर्ते आता एक वेळ सुटतील, पण विरोधकांची फेरनिवडणुकीची मागणी मान्य होणे अशक्य आहे. राजकीय हिंसाचारातील बळींची संख्या २१ वर जाऊनही निवडणूक जणू शांततेतच पार पडल्याच्या थाटात वावरणारे तेथील निवडणूक आयुक्त आणि ‘हिंसाचाराचा फटका आम्हालाच बसला’ या सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याला प्रसिद्धी देणारी माध्यमे असे आलबेल वातावरण असताना विरोधकांची मागणी हास्यास्पदच नव्हे तर थेट ‘लोकशाहीविरोधी’सुद्धा ठरविली गेल्यास नवल ते काय? आपण का हरलो याविषयीचे आत्मपरीक्षण ‘शेख हसीना यांना विरोध’ या एकाच मुद्दय़ासाठी एकत्र आलेले विरोधकांचे कडबोळे करील तेव्हा करील.. पण शेख हसीनाच पुन्हा का जिंकल्या, याचा विचार जगातील -किमान त्यांच्या पुनरागमनामुळे हायसे वाटलेल्या भारतासारख्या अनेक देशांतील- लोकशाहीप्रेमी नागरिकांनी तरी करायला हवा. ‘पर्याय नाही’ हा प्रचार तर हसीना यांच्या बाजूने होताच, शिवाय हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशची केवढी प्रगती झाली, मानवी विकास निर्देशांक कसा वाढला हा जगभर कौतुकाचा ठरलेला विषयही मतदारांवर परिणाम घडविणारा होता. विरोधकांनी आपल्यापुढे उभेच राहू नये, इतपत दमनशाहीदेखील याच कार्यकाळात सुरू होती. तेव्हा विरोधकांच्या म्हणण्यात समजा तथ्य असले आणि समजा ही निवडणूक गैरप्रकारांनीच जिंकण्यात आली असली, तरी समजा गैरप्रकार झाले नसते तर हसीना हरल्याच असत्या असे नव्हे. हसीना यांनी सत्तेकडून सत्तेकडे प्रवास केला, एवढेच आता खरे. ही सत्ता म्हणजे दमनशाही, असे विरोधक मानतात आणि कदाचित बांगलादेशी सामान्यजनांनाही ते पटत असेल. पण शेजारील देशांनी -विशेषत: भारताने- हसीना यांच्या विजयाचे स्वागतच केले आहे, ते का? दक्षिण आशियाई देशांमध्ये कितीही अंतर्गत अस्वस्थता असो, त्या देशांतील धोरणकर्ते भारतमित्र असणे, हे भारताचे दक्षिण आशियातील स्थान -आणि सुरक्षादेखील- टिकविणारे ठरते, हे यामागचे कारण. आपल्या सहाही शेजाऱ्यांना चीन कहयात ठेवू पाहात असताना मालदीव, श्रीलंका व भूतान येथील सत्तापालट आपल्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह ठरतात. केवळ ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पासाठी बांगलादेशातील चिनी गुंतवणूक ३० अब्ज डॉलरवर असेल, तर भारताने साडेचार अब्ज डॉलरची कर्जरूपी मदत बांगलादेशला देऊ केली आहे. मात्र चीनच्या आहारी न जाण्यासाठी भारताशी सख्य टिकवायचे आणि मुस्लीम देश म्हणून सौदी अरेबियाकडूनही मदत घ्यायची, असे शेख हसीना यांचे धोरण दिसते. चीनकडून भले दोन-दोन पाणबुडय़ा घेऊ, पण नौदलाचा संयुक्त सराव भारताबरोबरच करू, असे या धोरणाचे दोनच महिन्यांपूर्वी दिसलेले रूप. तेव्हा बांगलादेशात भले लोकशाही जळत असेल, शेजारी देश असलेल्या भारताला मात्र बांगलादेशातील स्थैर्याची ऊबच मिळणार आहे.

First Published on January 1, 2019 2:36 am

Web Title: sheikh hasina wins third term as pm in bangladesh