म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात नेत्यांच्या मोटारी थेट अ‍ॅथलेटिक्स धावपट्टीवर नेण्याची घटना, शासनाची क्रीडा या प्रकाराकडे पाहण्याची दृष्टी स्पष्ट करणारी आहे. महाराष्ट्रात क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांसाठी पुरेशा सुविधा नाहीत, अशी ओरड असतानाच आहेत त्या व्यवस्थांचाही नीट सांभाळ करता न येणे, हे या राज्यातील आजवरच्या शासकांचे अपयश. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने १९९४मध्ये हे क्रीडा संकुल उभारण्यात आले. त्यानंतर २००८मध्ये तेथेच राष्ट्रकुल युवा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. खेळांसाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची सामग्री आणि अद्ययावत व्यवस्था त्या वेळी निर्माण करण्यात आल्या. त्याच वेळी या संकुलाचा नंतरच्या काळात खेळांच्या विकासासाठी उपयोग होईल काय, अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. शासनाच्या नाकर्तेपणामुळे तसेच झालेही. तेथील साऱ्या व्यवस्था हळूहळू कोलमडू लागल्या. बड्या असामींचे भव्य विवाह सोहळे, कुणा बाबा, बापू, माँ यांची प्रवचने, चित्रताऱ्यांचे आणि लोकप्रिय कलावंतांचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी हे क्रीडा संकुल अधिक उपयोगी ठरू लागले. अनेकदा राज्यातील क्रीडापटूंनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर त्याकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात झाली. कोट्यवधी रुपये खर्चून तेथे नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल, बॉक्सिंग, बॅडमिंटन यांसारख्या क्रीडा प्रकारांसाठी सुविधाही निर्माण करण्यात आल्या. हे सगळे ज्यांच्यासाठी केले, त्यांच्याऐवजी भलतेच त्याचे ‘अन्य’ फायदे मिळवू लागल्याच्या तक्रारी अजूनही अधूनमधून होतच असतात. अशा संकुलातील व्यवस्थांची पाहणी करण्यासाठी नेत्यांनी तेथे जाणे यात काहीच गैर नाही. मात्र त्यामुळे तेथील व्यवस्थांची नासधूस होणार नाही, एवढी साधी काळजीही घेतली न जाणे, ही अनास्था म्हणावी की मुर्दाडपणा? ज्या धावपट्टीवर या मोटारी पोहोचल्या, त्यांना कुणीच अटकाव कसा केला नाही आणि तेथील व्यवस्थापकांना, क्रीडामंत्र्यांनाही हे वेळीच लक्षात कसे आले नाही, या प्रश्नाचे उत्तर केवळ माफी मागून मिळणारे नाही. अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यवस्था निर्माण करून त्याचा लाभ देशभरातील खेळाडूंना सातत्याने मिळण्यासाठी त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडेही लक्ष पुरवणे आवश्यक असते. ज्या कुणाला कोणत्याही खेळात रस आहे, त्याला ती आवड पूर्णत्वाला नेण्यासाठी पुरेशा व्यवस्था राज्यात अन्यत्र नाहीत. शाळेची क्रीडांगणे हळूहळू आक्रसू लागली आहेत आणि तेथील क्रीडा शिक्षक आणि संगीत मास्तर यांची जोडी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. लहान वयातच खेळांविषयीचे आकर्षण निर्माण होईल, अशी कोणतीही व्यवस्था या राज्यात निर्माणच होऊ शकलेली नाही. त्यामुळे खेळ खेळण्यापेक्षा दूरचित्रवाणीवर पाहण्यासाठीच असतात, असे चित्र निर्माण होऊ लागले आहे. अशा स्थितीत कोट्यवधी रुपये खर्चून निर्माण केलेल्या अ‍ॅथलेटिक्सच्या धावपट्टीवर नेत्यांच्या मोटारी सहजपणे जाऊ शकतात. याचे कारण क्रीडांगणाला आपलेसे करण्याऐवजी क्रीडा संकुलाच्या नावाखाली क्लबना आपलेसे करणारी आणि तेथील महागड्या सदस्यत्वांमध्ये इतिश्री मानणारी नवसंस्कृती गेली अनेक वर्षे राज्यात फोफावते आहे. बहुतेक क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बडे राजकारणी असतातच ना? मग मैदानातील अ‍ॅथलेटिक्स धावपट्टीवर मोटारी आल्यास बिघडले कुठे, याच सहजप्रवृत्तीतून हे घडले आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान क्रिकेटपटूंच्या बाकांवर फ्रँचायझींचे मालक दिसणे आणि नेत्यांच्या आलिशान मोटारी अ‍ॅथलेटिक्सच्या मैदानावर थेट धावपट्ट्यांवर अवतरणे यात काहीही फरक नाही. केंद्रीय क्रीडामंत्र्यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनीही माफी मागून धावण्यासाठीचा हा ट्रॅक ‘पूर्ववत’ करण्याचे आश्वासन दिले आहे. तो मोटारींसाठी की खेळाडूंसाठी, याचाही खुलासा व्हायला हवा होता!