कोकणात कोणताही प्रकल्प उभा राहण्यापूर्वी त्याचे राजकारणच जास्त होते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा वाद झाला होता. आता राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा वाद चिघळतो आहे. राजापूर तालुक्यातील दोन तर देवगड तालुक्यातील दोन अशी १६ गावे या प्रकल्पामुळे बाधित होणार असल्याने रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध आहे. नेहमीप्रमाणे स्थानिक राजकारण्यांनी या वादात उडी मारली आहे. भाजपने अधिकृतपणे प्रवेश नाकारल्याने वेगळा पक्ष स्थापन करावा लागलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्पाला विरोध तर केलाच, पण हा प्रकल्प उभारण्याकरिता शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचा आरोप केला. गेल्या आठवडय़ात विधानसभेत नाणार प्रकल्पाच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेल्या लेखी उत्तरावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले. प्रकल्पाला कोणाचाही विरोध नाही, असा उत्तरात उल्लेख होता. नेमके अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करीत तसे निवेदन सादर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. देसाई यांचे लेखी उत्तर आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका यातील गोंधळाकडे राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले. कोकणात हे शिवसेनेसाठी त्रासदायक ठरणार हे लक्षात येताच देसाई यांनी निवेदन सादर करताना, जनभावनेचा आदर करीत मुख्यमंत्र्यांनीच नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत निर्णय घेण्याची भूमिका मांडून स्वत:ची सुटका करून घेतली. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’त झालेल्या सुमारे १० लाख कोटींच्या सामंजस्य करारांचे उद्योगमंत्री म्हणून देसाई यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात झालेल्या करारांचे श्रेय देसाई यांनी घेतले होते. अर्थात, त्यातील किती करार प्रत्यक्षात आले हे वेगळे. आंध्र प्रदेशात होणारा तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणात आणण्याकरिता पुढाकारही घ्यायचा आणि विरोधही करायचा ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका झाली, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. ‘कोकणचा कसाई- सुभाष देसाई’ अशी घोषणा भास्कर जाधव यांनी केली आहे. समृद्धी महामार्गाबाबतही असेच. नागपूर ते मुंबई असा नवा मार्ग बांधण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना. हा मार्ग उभारण्याचे काम शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे खाते असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून करण्यात येणार आहे. शिवसेनेने आधी भूसंपादनाला विरोध केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, असे जाहीर केले. भूसंपादनाला अजूनही बाधित शेतकऱ्यांचा विरोध आहे. पण खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे मात्र अलीकडे समृद्धीचे समर्थन करू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याचे कार्यक्रम शिंदे यांच्या उपस्थितीत होऊ लागले. समृद्धी काय किंवा नाणार, शिवसेनेच्या भूमिकेवरून गोंधळच आहे. आधी विरोध करायचा आणि मग स्थानिक जनतेचा पाठिंबा आहे, असे सांगत प्रकल्पाचे समर्थन करायचे हे समृद्धीबाबत बघायला मिळाले. जैतापूर प्रकल्पास शिवसेनेने आधी कडवा विरोध केला होता. पुढे शिवसेनेचा विरोध तेवढा तीव्र राहिला नाही. समृद्धी मार्गात तर शिवसेनेचे मंत्रीच प्रकल्पाचे समर्थन करीत असून, शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध नसल्यास आम्ही विरोधी भूमिका का घ्यायची, असा सवाल करीत आहेत. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत असेच काही घडल्यास आश्चर्य वाटणार नाही.