जम्मूमध्ये काँग्रेसमधील ‘जी-२३’ गटाचे संमेलन भरलेले होते, या गटाला ‘बंडखोर’ काँग्रेस नेत्यांचा समूह किंवा ‘पत्रलेखक नेते’ असेही म्हणतात. गेल्या २४ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात या २३ नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर, प्रामुख्याने माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारभारावर आक्षेप घेतला होता. याच नेत्यांनी आरोप केला की, काँग्रेसला कमकुवत केले जात आहे. पण असा आरोप करताना पक्षाला कमकुवत करण्याचे काम कोण करत आहे, हे मात्र आनंद शर्मा वा कपिल सिबल यांनी उघडपणे मांडले नाही. इथे प्रश्न असा आहे की, पक्ष कमकुवत असण्याचा आणि सत्तेत असण्याचा अन्योन्य संबंध असतो का? १९८४ नंतर काँग्रेसला कधीही लोकसभेत बहुमत मिळाले नाही. २००४-१४ या काळात काँग्रेसने आघाडी सरकार चालवले, तेव्हाही काँग्रेस पक्ष कमकुवतच होता किंबहुना संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) सहभागी सगळे राजकीय पक्ष संख्याबळात ‘अशक्त’ होते. तरीही, दहा वर्षे केंद्रात सत्ता राबवली गेली. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी पाच वर्षे अल्पमतातील सरकार चालवले. ९०च्या दशकात काँग्रेसप्रणीत आघाडीच नव्हे तर, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) एकाही पक्षाकडे बहुमत नव्हते. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भाजप आत्ताप्रमाणे मजबूत नव्हता. मग, ‘जी-२३’ नेत्यांच्या पक्ष कमकुवत झाल्याच्या आरोपांचा नेमका अर्थ काय? दोन दशके काँग्रेसचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे असताना या नेत्यांनी कधीही पक्ष कमकुवत झाल्याचे म्हटलेले नव्हते. त्यामुळे सहा वर्षे काँग्रेसकडे केंद्रातील सत्ता नसल्याने पक्ष ‘शक्तिहीन’ होऊ लागला असल्याचे हे नेते सुचवत आहेत का, याचे उत्तर ‘जी-२३’मधील कोणी तरी दिले पाहिजे. काँग्रेस हा वैचारिक पाया असलेला पक्ष असल्याचे सातत्याने सांगितले जाते. पण, दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये तिथल्या स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बाबूलाल चौरासिया नावाच्या महाशयांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला गेला. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे चौरासिया समर्थक आहेत, त्यांनी गोडसेच्या अर्धपुतळ्याची पूजा केली होती. या चौरासियांचे काँग्रेसमध्ये ‘शुद्धीकरण’ केल्याचे काँग्रेस म्हणत आहे. हे शुद्धीकरण मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सांगण्यावरून झाले. याच कमलनाथ यांनी काँग्रेस नेतृत्व आणि ‘जी-२३’ नेत्यांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सोनिया गांधींचे निवासस्थान ‘१० जनपथ’वर पाच तास झालेल्या या बैठकीत कमलनाथ त्यांच्यासह पी. चिदम्बरम हेही उपस्थित होते. चिदम्बरम सातत्याने काँग्रेसच्या वैचारिक वारशाबद्दल बोलत असतात. आता गोडसेसमर्थकाला पक्षात आणून काँग्रेसने कोणता वारसा सिद्ध केला, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही वैचारिक विसंगती कमलनाथ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या कृतीतून चव्हाटय़ावर आलेली आहे. मग, काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचे काम कोण करत आहे? काँग्रेसचे विद्यमान केंद्रीय नेतृत्व की, काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते, याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे कार्यकर्ते मागू शकतात. जम्मूमध्ये झालेले संमेलन गुलाम नबी आझाद यांच्या ‘गांधी ग्लोबल फॅमिली’ या संस्थेने आयोजित केले होते. यातील गांधी फॅमिलीचा काँग्रेसच्या गांधी कुटुंबाशी संबंध नाही, तो महात्मा गांधींशी ऋणानुबंध व्यक्त करण्याचा भाग होता. या व्यासपीठावरून चौरासियांचा निषेध झालेला दिसला नाही. ‘जी-२३’मधील प्रमुख नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षांव केला. इथल्या मातीशी जोडलेला नेता अशी प्रशंसा त्यांनी केली; पण ‘जी-२३’मधील नेतेही इथल्या मातीतील आहेत, त्यांना काँग्रेसची पडझड का थांबवता आली नाही, हाही प्रश्न जम्मूतील त्यांच्या ‘शक्तिप्रदर्शना’नंतर विचारला जाऊ शकतो!