द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर पक्षात अपेक्षेप्रमाणेच नेतृत्वाचा वाद सुरू झाला. करुणानिधींचे राजकीय वारसदार स्टालिन हे पक्षाची सूत्रे हाती घेणार हे स्पष्ट असतानाच करुणानिधींचे दुसरे पुत्र अळगिरी यांनीही नेतृत्वाच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. पक्षातील निष्ठावंतांचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा केला. स्टालिन यांना आव्हान दिल्याची शिक्षा म्हणूनच करुणानिधी यांनी २०१४ मध्ये अळगिरी यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आपल्याला पक्षात परत घ्यावे, असा अळगिरी यांचा प्रयत्न असून पक्षात घेतले नाही तर द्रमुकचे वाटोळे होईल, असा इशारा देण्यास ते विसरलेले नाहीत. स्टालिन आणि अळगिरी हे दोन पुत्र, कन्या कानिमोळी, भाचा मुरासोली मारन, त्यांचा पुत्र दयानिधी मारन या साऱ्यांना करुणानिधी यांनी राजकारणात पुढे आणले. एकाच वेळी घराण्यातील अनेकांना राजकारणात पुढे आणण्याची करुणानिधी यांनी चूक केली होती. व्यक्तिकेंद्रित राजकारण असलेल्या पक्षांमध्ये नेत्यांच्या हयातीतच किंवा त्यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वावरून वाद सुरू होतात. याची देशात अनेक ज्वलंत उदाहरणे आहेत. त्याची सुरुवात करुणानिधी यांच्यापासूनच झाली. १९६९ मध्ये अण्णा दुराई यांच्या निधनानंतर करुणानिधी यांनी द्रमुकच्या तत्कालीन अध्यक्षांना बाजूला सारत पक्षाचे नेतृत्व आणि मुख्यमंत्रिपद पटकविले. एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी जानकीअम्मा आणि जयललिता यांच्यात संघर्ष झाला. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांची मैत्रीण शशिकला, त्यांचे भाचे दिनकरन आणि ओ. पन्नीरसेल्वम यांच्यात सुरू असलेला वाद अद्यापही शमलेला नाही. करुणानिधी यांनी जे पेरले तेच त्यांच्या पश्चात उगवले आहे. शेजारील आंध्र प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांनी दुसऱ्या पत्नीला राजकीय वारस नेमल्याने अन्य नातेवाईक संतापले आणि चंद्राबाबू नायडू यांनी रामाराव यांना दूर करीत मुख्यमंत्रिपद व पक्षावर आपली पकड निर्माण केली. या धक्क्यातून रामाराव सावरले नाहीत आणि त्यांचे काही दिवसांतच निधन झाले. कर्नाटकात जनता दलाला (एस) मुख्यमंत्रिपद मिळाले असले तरी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या दोन मुलांमध्ये वर्चस्वाची लढाई आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना मिळणारे महत्त्व त्यांचे बंधू रेवण्णा यांना सलते. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्यावर राष्ट्रीय जनता दलाची जबाबदारी त्यांनी दोन मुलांवर सोपविली; पण तेजप्रताप आणि तेजस्वी यादव या दोन मुलांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. अकाली दलात प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र आणि पुतण्यात वाद झाला होताच. हरयाणामध्ये देवीलाल आणि भजनलाल या दोन नेत्यांच्या वारसांमध्ये नेतृत्वाचा गोंधळ झाला होता. घराणेशाही आणि त्यातून झालेले संघर्ष याला महाराष्ट्रही अपवाद नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच पुत्र उद्धव आणि पुतणे राज यांच्यात नेतृत्वावरून संघर्ष झाला आणि त्यातून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वेगळी चूल मांडली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुलीला राजकीय वारसदार नेमल्याने पुतणे धनंजय यांनी बंडाचे निशाण फडकविले. अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापैकी शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण, ही चर्चा नेहमीच घडते. हे सारे चित्र बघितल्यावरच सोनिया गांधी यांनी प्रियंका गांधी यांना राजकारणात सक्रिय होण्यापासून बहुधा रोखले असावे. एकाच घरातील एकापेक्षा अधिक राजकारणात सक्रिय झाल्यावर सर्वाच्याच महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटतात. द्रमुकमध्ये नेमके तेच होत आहे. त्यातून पक्षात फूट पडणार हे उघडच आहे.