डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमधून प्रकाशित होणाऱ्या एका मोठय़ा वृत्तपत्राचा रविवारी मुख्य मथळा होता : ‘डेन्मार्क पराभूत, पण जीव वाचला!’. शनिवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी त्या शहरात ‘युरो २०२०’ फुटबॉल स्पर्धेअंतर्गत झालेल्या सामन्यात ४०व्या मिनिटाला जे घडले; आणि त्यानंतर मैदानात, कोपनहेगन शहरात, डेन्मार्कमध्ये, युरोपमध्ये आणि संपूर्ण जगभर जी घटनासाखळी उलगडत गेली, त्याची परिणती सुखान्त म्हणावी अशीच. ख्रिस्तियन एरिक्सन हा डेन्मार्कचा प्रमुख वलंयाकित फुटबॉलपटू फिनलंडविरुद्धच्या सामन्यात मध्यांतराच्या काही मिनिटे आधी कोसळला आणि जवळपास चेतनाहीन झाला. काही तरी भयंकर घडते आहे याची जाणीव मैदानावरील त्याचे सहकारी आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही लगेच झाली. ब्रिटिश पंचांनी सामना तात्काळ थांबवून वैद्यक पथकाला पाचारण केले. एरिक्सनवर मैदानातच तातडीचे वैद्यकीय उपचार सुरू झाले, त्यावेळी प्रेक्षकांमुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ नये किंवा ते दृश्य पाहून प्रेक्षकांची अस्वस्थता वाढू नये याचे भान ठेवून डॅनिश फुटबॉलपटूंनी घटनास्थळाभोवती कडे उभे केले. एरिक्सनचे प्राण त्या क्षणी वाचले, तरी पुढील उपचार अत्यावश्यक होते. त्यामुळे त्याला रुग्णालयात घेऊन जावे लागले, त्यावेळी मैदानावरील स्वयंसेवक, सहायकांनी पांढरे पडदे हातात धरून त्यांना वाट मोकळी करून दिली. एरिक्सनची प्रकृती रुग्णालयात स्थिर आहे असे कळल्यानंतर डॅनिश फुटबॉलपटूंच्या पुढाकाराने आणि मैदानावर सर्वकाळ उपस्थित प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाने स्थगित सामना सुरू झाला. त्या सामन्याचा निकाल (तो फिनलंडने काहीसा अनपेक्षित जिंकूनही) गौण होता, कारण बहुतेक सर्व संबंधितांनी एक मोठी लढाई यशस्वीरीत्या जिंकलेली होती.

कोपनहेगनमधील वृत्तपत्राच्या मथळ्याला ही पार्श्वभूमी होती. ज्या क्षणी एरिक्सन कोसळला, त्यानंतरचा दीड तास जगभरातील फुटबॉल रसिकांसाठी आणि फुटबॉलविषयी काहीही संबंध नसलेल्यांसाठीही अत्यंत अस्वस्थतेमध्ये गेला. कित्येकांसाठी तर जणू आपला एखादा आप्तस्वकीयच जीवनमरणाची लढाई लढत आहे यासम जाणीव धास्तावणारी आणि खंतावणारी ठरत होती. ही खंत आणि धास्ती करोनाच्या अनिर्बंध फैलावामुळे गेल्या वर्षभरात जगभरातील बहुतांच्या मनांत घर करून आहे. टाळेबंदी आणि शिथिलीकरणाच्या कधीही न संपणाऱ्या चक्रात उद्या काय वाढून ठेवले आहे याचे ठोकताळे बांधण्यापलीकडे गेलेली हतबल मानसिकता जगभर दिसून येत होती. या पार्श्वभूमीवर युरोपचे करोनाजोखडातून बाहेर पडणे आश्वासक वाटत होते. ‘युरो २०२०’ ही स्पर्धा या आश्वासकतेचे प्रतीक होती. ती खोटी ठरणार का, एरिक्सन प्रसंगाने या आश्वासकतेला गालबोट लागणार का, ही भीती नंतरच्या घडामोडींनी फोल ठरवली. वरकरणी सारे काही उत्स्फूर्तपणे घडून आल्यासारखे वाटते. जे उत्स्फूर्त, सहजप्रवृत्तीतून घडते ते सार्वत्रिक असते, असा एक समज करून घेतला जातो. पण हा प्रसंग एका स्कँडेनेव्हियन देशात, दोन स्कँडेनेव्हियन संघांदरम्यान घडला नसता, मैदानावर ब्रिटिश पंच उपस्थित नसता किंवा युरोपीय फुटबॉलच्या कार्यकक्षेबाहेर इतरत्र घडला असता, तर एरिक्सन दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहू शकला असता का आणि तो सामनादेखील पूर्ववत सुरू होऊ शकला असता का, असे प्रश्न उपस्थित होतातच. त्यांचे उत्तर होकारार्थी मिळणे कठीण भासू लागते.

याचे कारण शनिवारी कोपनहेगनमध्ये जे दिसले, त्यात उत्स्फूर्तता थोडी आणि तयारी अधिक होती. तशी जाणीव आणि भान समाजात मुरावे लागते. मैदानातील प्रेक्षकांना आहे तेथेच बसून राहण्याची विनंती करण्यात आली, पण बहुसंख्य प्रेक्षक एरिक्सनची खुशाली समजेपर्यंत तेथून हालणार नव्हते. मैदानातून एरिक्सनची रुग्णालयात रवानगी झाली, त्यावेळी फिनलंड आणि डेन्मार्क या दोन्ही संघांच्या समर्थकांनी त्याचा नामोच्चार सुरू केला. एरिक्सनला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या वाहनामागे माध्यमांची वाहने धावली नाहीत आणि ‘तो याच रुग्णालयात मृत्यूशी कसा झुंज घेतोय’ वगैरे अनावश्यक तपशिलावर कानठळ्या बसवणारे दूरचित्रवृत्तान्तकथनही त्या परिसरात सुरू झाले नाही. एरिक्सनच्या चेहऱ्याचे एकच अस्पष्ट छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसृत झाले, त्यापलीकडे तो पूर्णपणे पडद्याआड होता आणि कोपनहेगन स्तब्ध होते. सामना पुन्हा सुरू करावा, अशी विनंती डेन्मार्कच्या खेळाडूंनीच युरोपीय फुटबॉल संघटनेला केली. प्राण कंठाशी आलेल्याला तात्काळ मदत करावी आणि ती मिळाल्यानंतर फार कशात अडकून न राहता जीवनचक्र सुरू करावे, ही पाश्चात्त्य विचारसरणी अनुकरणीय अशीच. एका जिवाचे मोल हे जीवनाच्या मोलापेक्षा स्वतंत्र किंवा अधिक नसते. जिवाला वाचवण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी लागते, आणि त्याही आधी ती उभी करावी लागते. ख्रिस्तियन एरिक्सन कदाचित पुन्हा फुटबॉल खेळेल किंवा खेळणारही नाही. खरे तर ही बाब एखाद्या फुटबॉल सामन्याच्या निकालाइतकीच गौण. कारण त्याला मैदानावर संपू न देण्याची जबाबदारी डेन्मार्कच्या यंत्रणेने यशस्वी पार पाडली, तो सुखान्त हेच अधिक चिरंतन वास्तव!