News Flash

सरळमार्गी, समृद्ध!

सहायक म्हणून काम करत नेत्यांची सावली बनून वावरताना खांडेकरांनी स्वत:च एक लक्ष्मणरेषा आखून घेतली होती. ती त्यांनी कधीही ओलांडली नाही.

तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्यासमवेत

सलग पाच दशके सत्तेच्या वर्तुळात राहूनसुद्धा स्वत:ला मोहापासून दूर ठेवणे ही तशी अशक्यप्राय बाब. राम खांडेकरांनी ती शक्य करून दाखवली. ते तसे मूळचे स्वयंसेवक. संघाच्या मुशीत वाढलेले पण आधी सरकारी सेवेत व नंतर काँग्रेस व समाजवादी नेत्यांचे सहायक म्हणून वावरताना त्यांनी हे सेवकपण कधीही कर्तव्यनिष्ठेच्या आड येऊ दिले नाही. त्यामुळे यशवंतराव असोत की नरसिंह राव, मोहन धारिया असोत की वसंत साठे; या साऱ्यांच्या विश्वासास ते पात्र ठरले. अलीकडच्या काळात स्वयंसेवकाचे बदलते रूप बघून ते जसे अस्वस्थ व्हायचे तसेच स्वीय सहायक नावाच्या जमातीचे स्लखनशील होणे त्यांना व्यथित करून जायचे. याला केवळ सहायकच नाहीत, तर नेतृत्वसुद्धा तेवढेच जबाबदार आहे, असे ते खेदाने म्हणायचे. १९६२ साली घेतलेला लाकडी सोफा अजूनही घरात दिमाखात मिरवणाऱ्या खांडेकरांनी तत्त्व, ध्येय व निष्ठा याच्याशी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे ‘पंतप्रधान कार्यालयात सायकलवर जाणारे’ अशी ओळख कधीही त्यांच्या हेटाळणीचा विषय ठरली नाही; उलट कार्यालयात त्यांचा आदर निर्माण करणारी ठरली. सहायक म्हणून काम करत नेत्यांची सावली बनून वावरताना खांडेकरांनी स्वत:च एक लक्ष्मणरेषा आखून घेतली होती. ती त्यांनी कधीही ओलांडली नाही. म्हणूनच त्यांच्या शब्दाला वजन असायचे. लातूरला भूकंप झाला तेव्हा ‘तातडीने भेट देऊन मदतकार्यात अडथळा निर्माण करू नका’ असे पंतप्रधानांना स्पष्टपणे सांगणारे खांडेकर व त्यांचे ऐकून जाहीर झालेला दौरा रद्द करणारे नरसिंह राव विरळाच. सरकारी नोकरीत साधे टंकलेखक म्हणून लागलेल्या खांडेकरांनी अख्खे आयुष्य नेत्यांच्या संगतीत काढावे लागेल असा विचारही कधी केला नव्हता, पण कामाप्रति त्यांची निष्ठा व निरलस वृत्ती त्यांना त्या वर्तुळात घेऊन गेली. आधी मुंबई व मग दिल्लीत ते यशवंतरावांचे विश्वासू म्हणून वावरले. राजकीय व प्रशासकीय स्तरावरील अनेक घडामोडींचे ते साक्षीदार होते; पण नोकरीचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांनी कधीही त्याविषयी तोंडातून ब्र काढला नाही व नेत्यांना अडचणीत आणण्याचा उद्योग केला नाही. जे घडले त्यातले सकारात्मक तेवढे घ्यायचे अशीच त्यांची वृत्ती होती. याचे यथार्थ दर्शन त्यांनी २०१८ मध्ये ‘लोकसत्ता’त लिहिलेल्या ‘सत्तेच्या पडछायेत’ या स्तंभातून घडले. वर्षभर वाचकप्रिय ठरलेल्या या स्तंभातून त्यांनी समवेत काम केलेल्या नेत्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे अनेक नवे पैलू उलगडून दाखवले. यशवंतरावांच्या काळात राज्याची जी जडणघडण झाली, त्यातले अनेक बारकावे या लेखनातून राज्याला प्रथमच कळले. अशा लेखनप्रकारात नेत्यांच्या आयुष्यातील राजकीय वादळे नेमकी कशी होती यात अनेकांना रस असतो. हे ठाऊक असूनही खांडेकरांनी त्या वादळांच्या वाटेला फारसा स्पर्श केला नाही. तरीही त्यांचे लेखन वाचकांच्या ज्ञान व अनुभवात भर घालणारेच ठरले. आयुष्याच्या उत्तरार्धात जगताना पूर्वार्धाकडे निरपेक्ष वृत्तीने बघणे साऱ्यांनाच जमत नाही. मात्र खांडेकरांनी ती कला साधली व याला कारण त्यांची जीवननिष्ठा व निर्विकारी वृत्ती. कायम सत्तेच्या धुंदीत वावरणारी दिल्ली भल्याभल्यांना बिघडवून टाकते. खांडेकर मात्र होते तसेच राहिले. ‘कॉमन मॅन’ बनून सर्वत्र वावरले. नरसिंह रावांचा कालखंड देशात अस्थिर राजकारणाचा काळ म्हणून ओळखला जातो. हा काळ खांडेकरांसाठीही कठीण होता. हर्षद मेहता प्रकरणात तर थेट त्यांचे नाव घेतले गेले, मात्र सचोेटीने जगणे हेच एकमेव ध्येय उरी बाळगणाऱ्या खांडेकरांवर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. ‘उद्या माझे नाव वाईट अर्थाने माध्यमात झळकणार आहे, काळजीचे काही कारण नाही’ असा निरोप आदल्या दिवशीच नातेवाईकांना देणारे प्रामाणिक व सच्चे खांडेकर आताच्या काळात शोधूनही सापडणे कठीण. पंतप्रधानांच्या कार्यालयात काम करताना त्यांना मोहात अडकवण्याचे अनेक उद्योग झाले. काहींनी तर त्यांच्या घरी परस्पर पैसे पाठवण्याचे उद्योग केले. कुठलाही वाद न घालता त्यांचे पैसे परत करण्याची सवय त्यांनी स्वत:ला लावून घेतली व अशा उद्योगकत्र्यांविषयी कधी वैरभावही मनात बाळगला नाही. यांसारख्या गोष्टींचा ब्रभा करून मी किती प्रामाणिक हे मिरवण्याचा मोह त्यांच्या मनात कधी आला नाही. यातून त्यांच्या नेकीचे व मोठेपणाचे दर्शन घडते. अयोध्येतील वादग्रस्त ढाचाचे उद्ध्वस्तीकरण ही नरसिंह रावांच्या काळजाला झालेली मोठी जखम. या अस्वस्थ काळात अनेकांशी चर्चा करणाऱ्या नरसिंह रावांनी तिथे राम मंदिर कसे बांधता येईल याचा स्वहस्ताक्षरात एक आराखडा तयार केला होता. तो कागद आयुष्याच्या अखेरपर्यंत जपून ठेवणारे व त्याविषयी भरभरून बोलणारे, पण लिहायला नकार देणारे खांडेकर आता नाहीत. काँग्रेसच्या दरबारी राजकारणाने नरसिंह रावांची कशी पंचाईत केली व ती करणारे नेते कोण होते, याची इत्थंभूत माहिती खांडेकरांसमवेत आता काळाच्या उदरात गडप झाली आहे. तेव्हा आर्थिक गर्तेत अडकलेल्या देशाला स्थिर करण्यात मनमोहन सिंगांबरोबरच नरसिंह रावांचे योगदान किती मोठे आहे व त्याची दखल कशी घेतली जात नाही, याची सल त्यांच्या मनात अखेरपर्यंत होती. दिल्लीत दीर्घकाळ राहूनही महाराष्ट्राचा विचार करणारे, भालजी पेंढारकरांना फाळके पुरस्कार मिळावा म्हणून प्रयत्न करणारे खांडेकर कायम लक्षात राहतील. सत्तेच्या दालनात राहूनही प्रसारण मंत्रालयातर्फे दाखवले जाणारे चित्रपट व दिल्लीत जानेवारीत होणारा ‘बीटिंग रिट्रीट’ हा सोहळा सरकारी पासेस मिळवून बघणे एवढाच मोह सबंध नोकरीभर बाळगणाऱ्या खांडेकरांना दिल्लीतील परिचितांनी सोहळा आयोजित करून निरोप दिला. एका स्वीय सहायकाच्या नशिबात यापेक्षा दुसरा मोठा सन्मान असूच शकत नाही, अशी कृतार्थ भावना मनात बाळगणारे खांडेकर एका आदर्श जीवनाचा परिपाठ आपल्यासमोर ठेवून गेले. सभ्य, सुसंस्कृत नेत्यांचे वर्तुळ त्यात वावरणाऱ्या सरळमार्गी माणसांनी समृद्ध होत असते, हे वाक्य शब्दश: खरे करून दाखवणारे खांडेकर एका मोठ्या पर्वाचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. अशा सरळमार्गी सेवकास ‘लोकसत्ता’तर्फे आदरांजली!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:05 am

Web Title: straightforward prosperous conscientiousness government job typist akp 94
Next Stories
1 अखेर गाठ पडली..
2 राजकीय संस्कृतीचे नुकसान
3 लस नफेखोरी कोणामुळे?
Just Now!
X