चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहिले म्हणजेच देशभक्ती सिद्ध होते असे नाही. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी चित्रपटगृहात उभे राहिलेच पाहिजे असे नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे म्हणजे तमाम अतिरेकी राष्ट्रवाद्यांना दिलेली सणसणीत चपराकच. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे तर यासाठी खास आभार मानावयास हवेत. एखादी व्यक्ती नाही उभी राहिली म्हणून ती कमी देशप्रेमी असते असे नाही, असे त्यांनी सुनावलेच; परंतु हा खेळ असाच चालू राहिला तर उद्या कोणी नाटय़गृहांत, क्रीडागारांतही राष्ट्रगीताची सक्ती करा अशी मागणी करतील, असा इशारा दिला. त्यांचा प्रश्न होता तो सक्तीबद्दल. तो विचारून त्यांनी गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्र व न्या. रॉय यांच्या पीठाने दिलेल्या निकालालाही हलकेच चापटय़ा दिलेल्या आहेत. तेव्हा न्यायालयाने चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजविण्याची सक्ती केली होती. लोकांच्या मनात ‘संवैधानिक राष्ट्रप्रेम’ आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करणे हा त्यामागील हेतू होता. त्यात फारशी चूक नाही. कोणत्याही समाजात अशा प्रकारच्या प्रतिकात्मकतेला महत्त्वाचेच स्थान असते. विशिष्ट प्रतिमा, चित्रे, शब्द यांचा समाजमनावर परिणाम होत असतो. तसा होत नसता, तर कोणताही ध्वज म्हणजे साधा कापडाचा तुकडा हे माहीत असूनही अनेकांनी त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली नसती. तेव्हा राष्ट्रजीवनात त्यास महत्त्वाचे स्थान असतेच. परंतु राष्ट्र काय किंवा व्यक्ती काय, त्यांचे जीवन केवळ भावनांच्या हिंदोळ्यांवर झुलून चालत नसते. त्याला विवेकाचाही पक्का पाया असावा लागतो. देशप्रेम दाखविण्याची सक्ती करण्यात हा विवेक काही दिसला नव्हता. तो न्या. चंद्रचूड यांनी दाखविला. ही बाब नीट लक्षात घ्यायला पाहिजे. अन्यथा उद्या या विधानावरून कोणी सर्वोच्च न्यायालयालाच राष्ट्रद्रोही ठरवून पाकिस्तानात पाठवायला कमी करणार नाही. ही भयशंका वाटण्याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत हा विवेकही काहीसा वेडा झाल्याचे दिसत आहे. तसे नसते, तर चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजविणे आणि त्या वेळी सर्वाना उभे राहण्याची सक्ती करणे यातून फार मोठे देशकार्य होत आहे असा कुणाचा समज झाला नसता. पण तसा समज दृढ होता. त्यामुळेच चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सुरू असताना काही देशप्रेमी कोण उभे आहे वा नाही याकडे लक्ष ठेवून असत आणि बसून राहिलेल्या देशबांधवांना नंतर बुकलून काढत असत. त्यातून फार मोठी देशसेवा केल्यासारखे त्यांना नक्कीच वाटत असेल. चूक त्यांची नाही. अशा प्रकारच्या सांस्कृतिक व धार्मिक धारणांवरच आपल्या समाजाचे पोषण झालेले आहे. या धारणांमुळेच दारूचे गुत्ते चालवून अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा गंधटिळे लावतो म्हणून देवभक्त किंवा पाचदा नमाज पढतो म्हणून पवित्र मानला जातो. त्यात काही भ्रष्टता आहे हेही कोणाच्या ध्यानी येत नाही. आपल्या देशप्रेमाची गतही अशीच, नरोटीच्या उपासनेसारखी झालेली आहे. हे लक्षात आल्यामुळेच न्यायालयाने, देशप्रेम ही काही मिरविण्याची गोष्ट नाही, असे बजावले. ते खरेच आहे. क्रिकेट सामन्यात भारत जिंकल्यानंतर वाजलेल्या फटाक्यांत जेवढे देशप्रेम असते त्याहून कितीतरी पटीने ते आपले काम प्रामाणिकपणे करण्यात असते. परंतु हे लक्षात कोण घेते? कारण – अनेकांना हे देशप्रेम मुळात मिरवायचेच असते. ते कशासाठी हेही आपल्याला माहीत आहे. फक्त आपल्यातील कोणी हे बोलत नाही, की त्यांची ती देशभक्ती नाही, तर द्वेषभक्ती आहे. त्या द्वेषाच्या पावसावर त्यांना मतांची शेती पिकवायची आहे. सर्वोच्च न्यायालयाने एवढय़ा थेट शब्दांत हे सांगितले नाही. पण ते जेव्हा सरकारला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, असे सुनावतात तेव्हा त्याचा अर्थ तोच असतो.