तामिळनाडूमध्ये अचानक झालेला सत्ताबदल हा तेथील व्यक्तिपूजेचा आविष्कार आहे. दक्षिणेकडील चार राज्यांपैकी तामिळनाडू हे एकच असे राज्य आहे, की तेथील सार्वजनिक आणि राजकीय जीवनात व्यक्तिपूजेचा परिपाठ आजही टिकून आहे. केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांत काही काळ वगळता, हे व्यक्तिस्तोम फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळेच जयललिता यांच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांना पदावरून दूर करून तेथे शशिकला नटराजन यांना बसणे शक्य झाले आहे. जयललिता यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात उपमुख्यमंत्री राहिलेले आणि त्यांचा सर्वाधिक विश्वास असलेले पनीरसेल्वम यांना यापूर्वीही अडचणीच्या काळात तीन वेळा मुख्यमंत्रिपद मिळाले होते. त्या काळात जयललिता यांनी कधीही शशिकला यांचा विचारही केला नव्हता. याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट होता. तरीही शशिकला यांची सत्ताग्रहणाची घाई तेथील आमदारांनी का स्वीकारली, असा प्रश्न पडू शकतो. याचे उत्तर त्यांच्यावर असलेले अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत, हे असू शकते. मुख्यमंत्री झाल्याने काही प्रभाव पडू शकतो आणि आपण त्यातून सहीसलामत सुटू शकतो, असे शशिकला आणि त्याहून त्यांचे पती एम. नटराजन यांना वाटणे स्वाभाविक होते. गेल्याच आठवडय़ात मद्रास उच्च न्यायालयाने शशिकला यांची निर्दोष सुटका करण्यास नकार दिला होता. त्या पाश्र्वभूमीवर ज्या व्यक्तीने आयुष्यभरात एकही निवडणूक लढवलेली नाही, सार्वजनिक जीवनात कधी जाहीर भाषणही केले नाही, जिच्यावर ‘फेरा’पासून ते अफाट संपत्ती बाळगल्याप्रकरणी अनेक खटले सुरू आहेत, अशा व्यक्तीला इतक्या झटपट मुख्यमंत्रिपद मिळू शकते, ही घटना आश्चर्यकारक म्हणावी अशी आहे. मुख्यमंत्रिपदावर असलेले पनीरसेल्वम यांनी जल्लिकट्टू आंदोलनात बजावलेली भूमिका, त्यांना केंद्र सरकारकडून मिळणारी आपुलकीची वागणूक पाहता, अधिक वेळ दवडला, तर त्यांची लोकप्रियता अधिक वाढण्याची भीती शशिकला यांना वाटली असावी. त्यामुळेच अण्णाद्रमुक पक्षात स्वत:चा गट प्रभावी करून त्यांनी या पदावर आपले स्थान पक्के करण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली. शशिकला यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीपेक्षाही जयललिता यांना अम्मा मानणाऱ्या त्यांच्या पक्षातील सर्व आमदारांच्या सदसद्विवेकबुद्धीचा मुद्दा यासंदर्भात अधिक महत्त्वाचा मानायला हवा. पनीरसेल्वम यांचे व्यक्तिमत्त्व मवाळ या गटात मोडत असल्याने, त्यांचा गट यापुढेही शशिकला यांच्याविरोधात दंड थोपटून उभा राहील, अशी शक्यता नाही. तरीही शशिकला यांना राज्यातील कायदा सुव्यवस्थेपासून एलटीटीईच्या कारवाया आणि कावेरी पाणीवाटपाच्या तंटय़ापर्यंत अनेक प्रश्नांना तातडीने सामोरे जावे लागणार आहे. केवळ पक्ष पाठीशी आहे, म्हणून त्यांचे मुख्यमंत्रिपद विनासायास राहू शकेल, अशी शक्यता नाही. खटले व आरोपांची टांगती तलवार असलेल्या या नव्या मुख्यमंत्र्यांना तेथील सामाजिक जीवनातील व्यक्तिपूजेचे स्तोम किती उपयोगी होईल, हे आता पाहावे लागेल. ‘मन्नरगुडी माफिया’ या नावाने शशिकला यांच्या कुटुंबाची ओळख सांगितली जाते. (मन्नरगुडी हे शशिकला यांचे जन्मगाव) या कुटुंबातील अनेकांवर गंभीर स्वरूपाचे खटले सुरू आहेत, त्यांना आता सरकारी संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. शशिकला यांना आता स्वत:ची ओळख निर्माण करून जनतेचा विश्वास संपादन करावा लागेल, त्यासाठी आधी पक्ष एकसंध ठेवावा लागेल आणि प्रशासनावर पकड निर्माण करावी लागेल, शिवाय जयललिता यांच्याशी साधम्र्य दर्शविणारा करिश्माही दाखवावा लागेल. कोणतेही कारण नसताना, काहीही अनपेक्षित घडलेले नसताना, अण्णाद्रमुकच्या सर्व आमदारांनी शशिकला यांना बिनविरोध पाठिंबा देऊन ‘वारसनाटय़म्’ का घडविले, याचे उत्तरही नजीकच्या भविष्यातच मिळणे अपेक्षित आहे.