तुर्कस्तानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांच्या जस्टिस अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट पार्टीला (एकेपी) बहुतेक मोठय़ा शहरांतील मतदारांनी नाकारले. राजधानी अंकारा, आर्थिक राजधानी इस्तंबूल, इझमीर, अंताल्या, अदाना या मोठय़ा शहरांमधून मतदारांनी सत्तारूढ पक्षाविषयी मतपेटय़ांतून नाराजी दाखवून दिली. या निवडणुका एर्दोगान यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यामुळे ‘एकेपी’च्या प्रचारात एर्दोगान स्वत:हून उतरले होते. ढासळलेली अर्थव्यवस्था, राजकीय विरोधक आणि माध्यमांची होत असलेली गळचेपी आदी घटकांमुळे विशेषत: शहरी भागात पसरलेल्या असंतोषाची त्यांना जाण असावी. म्हणूनच प्रचारादरम्यान एर्दोगान यांनी तुर्की राष्ट्रीयत्वाला हात घातला. न्यूझीलंडमधील मशिदींमध्ये अलीकडे झालेल्या हत्याकांडाच्या चित्रफिती दाखवल्या गेल्या आणि मुस्लीम विश्वबंधुत्वाचा नारा दिला गेला. विरोधकांमध्ये बहुतेक सगळे देशद्रोही असून त्यांचे दहशतवाद्यांशी संधान आहे, असेही एर्दोगान जवळपास प्रत्येक प्रचारसभेत निक्षून सांगत होते. अंकारा आणि इस्तंबूल या दोन शहरांतून एर्दोगान यांची कारकीर्द सुरू झाली. त्यामुळे येथील पराभव त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी सहज स्वीकारलेला नाही. विशेषत: इस्तंबूलमधील निकाल वादग्रस्त असल्याचा दावा ‘एकेपी’ने केला आहे. त्यामुळे या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब अद्याप झालेले नाही. या शहरात त्या पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार बिनाली यिल्दिरिम हे माजी पंतप्रधान असून, संसदेचे सभापती आहेत. याशिवाय स्वत: एर्दोगान यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणा यिल्दिरिम यांच्यासाठी अक्षरश: राबवली. तरीही रिपब्लिकन पीपल्स पार्टी (सीएचपी) या प्रमुख विरोधी पक्षाचे उमेदवार इक्रेम इमामोग्लू यांनी चुरशीच्या लढतीत यिल्दिरिम यांचा पराभव केला. मतमोजणीत इमामोग्लू यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केल्यानंतर ती बातमीच दाखवणे तुर्कस्तानच्या सरकारी आणि सरकारधार्जिण्या वाहिन्यांनी थांबवले! इमामोग्लू यांच्याकडे २५ हजार मतांची आघाडी असून, अंतिम निर्णय तुर्कस्तानच्या निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे. या पराभवामुळे एर्दोगान यांचे अध्यक्षपद किंवा तुर्की संसदेतील त्यांच्या पक्षाचे बहुमत यांवर फार परिणाम होणार नसला, तरी हा निकाल प्रतीकात्मक आहेच, शिवाय एर्दोगान यांच्या एककल्ली कारभारावर तो काही प्रमाणात अंकुश आणू शकेल. विरोधी पक्ष आपापले संकुचित हितसंबंध बाजूला सारून एकवटले, तर २०२३ मधील अध्यक्षीय निवडणुकीत एर्दोगान यांच्यासमोर समर्थ आव्हान उभे राहू शकेल, असेही तुर्कस्तानातील राजकीय विश्लेषकांना वाटते. तुर्कस्तानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठय़ा प्रमाणावर अधिकार असतात. तेथील महापौर एखाद्या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करू शकतात. या स्वराज्य संस्था ८१ प्रांतांचे प्रमुख निवडतात, ज्यात या प्रांतांमधील नगरांचा आणि महानगरांचाही समावेश आहे. ८१ प्रांतांमध्ये आपल्याचे पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या, असे एर्दोगान म्हणत असले, तरी अदृश्य शत्रू आणि बेगडी राष्ट्रीयत्वाला यापुढे मतदार बधणार नाहीत, हा महत्त्वाचा धडा तुर्की जनतेने त्यांना शिकवला आहे. अनेक वर्षांच्या वृद्धीनंतर तुर्की अर्थव्यवस्था मंदीसदृश स्थितीमध्ये आली आहे. बेरोजगारी वाढली आहे. लिरा हे तुर्की चलन डॉलरच्या तुलनेत घसरले आहे. चलनवाढ आटोक्याबाहेर आहे. युवा मतदारांमध्ये एर्दोगान आणि त्यांच्या समर्थकांच्या भ्रष्टाचाराविषयी प्रचंड नाराजी आहे. या नाराजीसमोर एर्दोगान यांची संस्था, उद्योग, माध्यमे यांच्यावर असलेली पकड, विरोधकांमध्ये असलेली दहशत यांची काहीही मातब्बरी चालू शकली नाही, हे दाखविणारा कौल त्या देशातील लोकशाहीसाठी आशादायी ठरेल.