न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरात शुक्रवारी दोन मशिदींवर झालेल्या भीषण हल्ल्याचे वर्णन पहिल्यांदा न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांनी आणि नंतर लगेचच त्यांच्या पंतप्रधानांनी ‘दहशतवादी हल्ला’ असे केले. याउलट विशेषत काही पाश्चिमात्य वृत्तसंस्था आणि संकेतस्थळे या हल्ल्याचे वर्णन अगदी अलीकडेपर्यंत गोऱ्या माथेफिरूने वर्चस्ववादी भावनेतून केलेला हल्ला (व्हाइट सुप्रीमसिस्ट अ‍ॅटॅक) असेच करत राहिल्या. दुर्दैवयोगाने हा हल्ला अमेरिकेतील एखाद्या मशिदीवर झाला असता, तर तेथील सध्याच्या प्रशासनाने त्याला कधीही ‘दहशतवादी हल्ला’ असे संबोधले नसते. परंतु प्रार्थनास्थळी किंवा कोठेही निशस्त्र, निष्पाप सामान्यांवर झालेले असे हल्ले दहशतवादीच असतात. ते विशिष्ट धर्मीयांनी घडवून आणल्यावरच दहशतवादी ठरवायचे, ही गोऱ्या देशांची सवय प्रथम न्यूझीलंडने मोडून काढली हे योग्यच झाले. ख्राइस्टचर्चमधील घटनेत एखाद्या पतीसमोर त्याची पत्नी ठार झाली, एखाद्या मातेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या पुत्राला बाहूत घेऊन आक्रोश करावा लागला, एखाद्या तरुणीसमोर तिच्या वडिलांवर बंदुकीच्या गोळ्यांची बरसात झाली, एखाद्या मित्राला वाचवणारा स्वतच हल्लेखोराच्या गोळ्यांना बळी पडला या व अशा असंख्य करुण कहाण्या समाविष्ट आहेत. भारतीय वंशाचे आणि भारतातील किमान नऊ जण मृत्युमुखी पडले.

ख्राइस्टचर्च घटनेतला मारेकरी ब्रेंटन टॅरेंट हा मूळचा ऑस्ट्रेलियन आणि गोरा. त्याच्या गोळ्यांना बळी पडलेले बहुसंख्य स्थलांतरित होते. हा आणखी एक ज्वलंत मुद्दा. त्यावर ‘आमच्या आदर्शातला न्यूझीलंड असा नाही,’ असे त्या देशाच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेर्न यांनी शुक्रवारी रात्रीच जाहीर केले, हे बरे झाले. युरोपातील काही सरकारे आणि विद्यमान अमेरिकी सरकार स्थलांतरित नागरिकांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेऊ लागले आहेत. मूलत बेकायदा निर्वासितांबाबत सुरू झालेली चर्चा अखेरीस कायदेशीर स्थलांतरितांपर्यंत पोहोचतेच. चरितार्थ, शिक्षण, उद्योग, व्यापारानिमित्त इतर देशांच्या सीमा ओलांडणे हे नवीन सहस्रकात अपरिहार्य बनले आहे. त्यातून ‘बाहेरचे येऊन इथल्या संधी हिरावून घेतात’ छापाच्या दाव्यांना कोणताही आधार उरलेला नाही. तरीही अनेकदा निवडणुकीनिमित्त विशेषत भावनिक जनाधारावरच जन्माला येणारे आणि तगून राहणारे नेते स्थलांतरितांच्या मुद्दय़ाचे हुकमी अस्त्र बाहेर काढतातच. त्यातून जो विखार निर्माण होतो आणि समाजमनात झिरपतो त्याचे उत्तरदायित्व घेण्यास असे नेते कधीही तयार नसतात. ख्राइस्टचर्चमधील बळी हे एका अर्थाने या विखाराचेही बळी आहेत. वरकरणी ऑस्ट्रेलियन मारेकऱ्याने युरोपातील कथित इस्लामी दहशतवादाचा दाखला दिला असला, तरी त्याच्या मुळाशी स्थलांतरितांविरोधातील राग हेही एक कारण आहे.

ब्रेंटन टॅरेंट ऑस्ट्रेलियन असला, तरी तो स्वतला निओ-नाझीवादाचा हस्तक समजतो. युरोपात इस्लामी प्रभाव वाढू लागला असून, त्याविरोधात शस्त्र घेणाऱ्या समुदायाचा सदस्य असल्याचा दावा करतो. अमेरिका आणि युरोपात स्थलांतरितांवर हल्ले करणारे हल्लेखोर त्याचे ‘आदर्श’ आहेत. त्यामुळे एका अर्थाने या प्रकारच्या दहशतवादाच्या मुळाशी वांशिक राष्ट्रवाद आहे. धर्माधारित दहशतवादाइतकाच हा वांशिक राष्ट्रवादावर आधारित दहशतवादही व्यापक आणि तितकाच धोकादायक कसा आहे, हे ख्राइस्टचर्चमधील घटनेने दाखवून दिले आहे. त्यातही धक्कादायक प्रकार म्हणजे, वांशिक राष्ट्रवाद हा दहशतवादी वाटेने गेलेल्या धार्मिक बंधुत्ववादावर उत्तर किंवा त्याला प्रतिसाद म्हणून फोफावू लागला आहे.

अशा प्रवृत्तींपासून न्यूझीलंडसारखा सुस्थित, सुपोषित आणि सुसंस्कृत देशही सुरक्षित नाही, ही जाणीव अस्वस्थ करणारी आहे. टॅरेंटच्या काही ‘आदर्शा’पैकी एक लुका ट्रेनी याने इटलीत सहा स्थलांतरितांना जखमी केले. दुसरा डिलन रूफ ज्याने अमेरिकेत चर्चमध्ये नऊ आफ्रिकनांना ठार केले. आणखी एक डॅरेन ओसबोर्न, ज्याने लंडनमध्ये मुस्लीम स्थलांतरितांवर व्हॅन चालवली. टॅरेंटने ‘स्फूर्ती’ घेतली तो अँडर्स बेरिंग ब्रायविक हा नॉर्वेजियन माथेफिरू, ज्याने ७७ युवकांचे बळी घेतले! ख्राइस्टचर्च हल्ल्याआधी जारी केलेल्या ‘जाहीरनाम्या’त पोलंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अगदी व्हेनेझुएलातील त्याच्यासारख्या माथेफिरूंकडून पाठिंबा मागतो तेव्हा कोणत्याही धार्मिक दहशतवादाइतकाच हा वांशिक राष्ट्रवादही धोकादायक पद्धतीने पसरू लागला आहे.