लागून सुट्टय़ा किंवा सणवार आल्यानंतर रस्त्यांवर बाहेर पडणे नको व्हावे अशी सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली येथील परिस्थिती आहे. या बहुतेक शहरांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, चालक यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. एरवी जे अंतर कापण्यासाठी २० ते ३० मिनिटे लागतात, त्यासाठी गेले काही दिवस दोन-दोन तास किंवा त्याहीपेक्षा अधिक वेळ लागतो आहे. उत्सवाचे दिवस सुरू झाले असून, पुढे गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा बहुदिन उत्सवांदरम्यानही अशीच परिस्थिती राहील, हे जवळपास निश्चित आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे, आपल्याकडील यंत्रणा बऱ्याचदा प्रतिक्रियात्मक उपाययोजना करते आणि त्यातून हाती काहीच लागत नाही. ठाणे, मुंबई, नवी मुंबईच्या वेशींवरती अवजड आणि इतर वाहनांची कोंडी हल्ली बऱ्याचदा होते. लागून सुट्टय़ा आल्यानंतर तर हा प्रकार नित्याचा आहे. तरीही पुरेसे उपाय योजले जात नाहीत. एकाच दिशेने जाणारी वाहतूक मोठय़ा प्रमाणात असेल, तर त्यानुसार टोल नाक्यांवर मार्गिका व्यवस्थापन करावे लागते. बहुतेकदा हे काम टोल नाके हाताळणाऱ्या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर सोडून दिले जाते. त्यामुळे टोल नाक्यांवर तासन्तास ताटकळत बसावे लागते. ऑनलाइन मासिक टोल पासधारकांसाठी मुंबईच्या वेशीवरील सर्व नाक्यांवर स्वतंत्र मार्गिका आहे. तिचे पावित्र्य पाळले जात नाही. ही शिस्त मोडणाऱ्यांकडून दंडवसुली करण्यात कुचराई होते. शिस्त पाळण्याविषयी बहुतेक वाहनचालकही फार उत्साही नसल्यामुळे ज्या मार्गिकेतून निव्वळ वाहनाचा क्रमांक कॅमेऱ्याद्वारे नोंदवून द्वार उघडले जाऊ शकते, तेथेच सर्वाधिक काळ ताटकळत राहावे लागते. कारण अशा मार्गिकेत बिगरपासधारकांचीच घुसखोरी सर्वाधिक होते.

पण मुद्दा केवळ टोल नाक्यांचा नाही. ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये अवजड वाहनांच्या वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. जवाहरलाल नेहरू बंदरातून (जेएनपीटी) येणारा माल ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरून पुढे वसईमार्गे गुजरातकडे आणि भिवंडी रस्त्यावरून नाशिककडे मोठय़ा प्रमाणावर पोहोचवला जातो. नाशिक, गुजरातकडून याच मार्गाने जेएनपीटीकडे मालवाहतूक होते. याशिवाय देशातील विविध भागांतून मुंबईकडे होणारी बरीचशी मालवाहतूक ठाणे, नवी मुंबईमार्गेच होते. परिणामी इतर कोणत्याही मोठय़ा शहरांच्या तुलनेत या दोन शहरांमध्ये अवजड वाहनांचा वावर अधिक असतो. ही वाहने किती वाजता रस्त्यावर आणायची याविषयीच्या वेळा ठरलेल्या आहेत. रात्री १० ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ या वेळा वगळता इतर वेळी अवजड वाहनांना मुख्य शहरात प्रवेशबंदी आहे. ती कधीही पाळली जात नाही. ठाण्यातील अवजड वाहनांच्या कोंडीवर ‘लोकसत्ता’ने गेले काही दिवस विशेष वृत्तमालिका चालवली आहे, त्यात या त्रुटीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मनाई आदेश सर्रास मोडून कोणत्याही वेळेस बिनदिक्कतपणे वाहने ठाणे, नवी मुंबईत शिरत आहेत. या भागांतून मुंबईकडे नोकरी-उद्यमानिमित्त खासगी वाहनांनी येणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यांच्यासाठी स्वतच्या शहराची वेस ओलांडणेच आव्हानात्मक ठरू लागले आहे. गुजरातकडून जेएनपीटीकडे होणाऱ्या अवजड वाहतुकीस मनाईकाळात रोखण्याची जबाबदारी पालघर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई पोलिसांची आहे. पण त्यांच्याकडून कर्तव्यात कसूर होत असल्यामुळे ठाणे पोलिसांना धावाधाव करावी लागते. त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. परिणामी अवजड वाहतुकीचा हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. ठाणे-बेलापूर रस्ता, पूर्व द्रुतगती मार्ग, कल्याण-शीळ रस्ता, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, मुंबई-पुणे रस्ता या टापूत येणाऱ्या सर्व महानगरांमध्ये तो भेडसावत राहतो.

गेल्या वर्षी पावसामुळे झालेल्या खड्डय़ांमुळे रस्त्यांची चाळण झाली. शीव-पनवेल मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. यंदा मुंबई महानगर परिसरात प्रचंड पाऊस झाला, त्यामुळे खड्डय़ांची समस्याही सालाबादप्रमाणे उद्भवली आहेच. मुंबईत केवळ ४००च खड्डे असल्याचे मध्यंतरी महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. खड्डय़ांच्या आकडेवारीला इतके महत्त्व देणारी ही जगातील एकमेव महापालिका असावी! महापालिकेने खड्डे किती हे जाहीर करावे आणि माध्यमांनी त्या दाव्याची चिरफाड करावी हा खेळ गेले काही वर्षे अव्याहत सुरू आहे. आजवर या किंवा इतर संलग्न महापालिकांनी ‘यंदा ५०पेक्षा अधिक खड्डे दिसणार नाहीत’ किंवा तत्सम दावे करण्याचे धाडस का बरे दाखवलेले नाही? दर वेळी पावसाकडे आणि वाहनांच्या संख्येकडे बोट दाखवून पालिका प्रशासन हात वर करते. तरीही दर वर्षी नव्याने खड्डे निर्माण होतात. त्यात दुचाकी अडखळून काही हकनाक जीव जातात. मध्यंतरी कल्याणमध्ये वाहतूक नियंत्रण कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाचाच दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. खड्डय़ांमुळे वाहतुकीला होणारा अर्धा ते दोन तासांपर्यंत विलंब होतो, हे अनेकदा दिसून आले आहे. पुन्हा एका पावसाळ्यात पडलेले अनेक खड्डे पुढील पावसाळ्यापर्यंत तरी बुजवण्याची तसदी घेतली जात नाही. त्याचाही परिणाम वाहतुकीवर होत आहे.

वाहतूक नियंत्रणाचे स्वतंत्र शास्त्र आहे. शहरात नेमकी वाहने किती धावतात, किती वाहने बाहेरून येऊ शकतात, त्यांचे नियंत्रण आणि नियमन कशा प्रकारे करावे या विषयीचे तज्ज्ञ पोलीस, प्रशासनाकडे असतात. या विषयाचा अभ्यास करणारे अनेक चांगले अभ्यासकही आहेत. त्यांच्या समग्र ज्ञानातून वाहतूक आराखडे बनवता येऊ शकतात. दर वेळी एखाद्या विशिष्ट दिवशीच हे केले पाहिजे, असे नाही. या बाबतीत प्रतिक्रियात्मकतेपेक्षा पूर्वतयारीवर आणि पूर्वानुमानावर भर दिला गेला पाहिजे. गेल्या वर्षी मुंब्रा बाह्य़वळण मार्गाचे काम सुरू झाल्यामुळे सर्व वाहतूक ऐरोली, कळवामार्गे ठाण्याकडे वळवली गेली. या काळात ऐरोली आणि आनंदनगर येथील टोल काही काळ स्थगित करण्याचा सोपा उपाय कोणालाही सुचला नाही. अखेर ‘लोकसत्ता’ने याविषयी आग्रही भूमिका घेऊन जनजागृती केल्यानंतर सरकारला जाग आली आणि पुढील काही दिवस या मार्गावरील प्रवास सुरळीत झाला. वाहतूक कोंडी हे आजचे वास्तव असले, तरी ती फोडण्याच्या बाबतीत सर्वसामान्यांइतकेच पोलीस, प्रशासनही हतबल होते तेव्हा ती कोंडी निरंतर आणि न फुटणारीच ठरते.