‘आपलं जगणं देशासाठी असेलच, पण मरणही देशासाठीच असेल’, असा निश्चय करूनच लष्करात दाखल झालेल्या कर्नल संतोष महाडिकच्या पार्थिवावर साताऱ्याजवळच्या पोगरवाडीत अंत्यसंस्कार होत असताना अवघ्या देशाने त्याच्या शौर्याला शिर झुकवून सलाम केला आहे. एक उमदा जवान, एक खेळकर पुत्र, एक प्रेमळ पती, आणि दोन उमलत्या कळ्यांचा पिता असा अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे दु:ख त्या क्षणी पापणीआड दडवून त्याच्या वीरमरणाचा अभिमान नजरेत मिरवणाऱ्या त्याच्या आप्तेष्टांनीही देशाला एक वेगळा संदेश दिला आहे. संतोष महाडिक याच्या छातीवर याआधी जेव्हा शौर्यपदक झळकले, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांचा आनंद आणि संतोषविषयीचा अभिमान ओसंडून वाहत होता. संतोषला शाळेतील एका स्पर्धेत पदक मिळाले, तेव्हा त्याच्या वडिलांनी एका वाक्यातून मुलाच्या मनात एक स्वप्न रुजविले होते. ‘संतोषने आजची लढाई जिंकली असली, तरी त्याची खरी लढाई देशाच्या सीमेवर असणार आहे, आणि त्यातही तोच विजयी होईल’, असे तेव्हा संतोषचे वडील म्हणाले होते. वडिलांच्या या वाक्याने संतोषच्या मनाचा ठाव घेतला होता. देशासाठी सर्वोच्च त्यागाची तयारी ठेवूनच सैन्यात दाखल होणाऱ्या जवानांच्या भरवशावर देशातील जनता निर्भर असते, याची जाणीव संतोषच्या वागण्याबोलण्यात सदैव जागी होती, म्हणूनच ‘देशासाठी मरणे हेच खरे जगणे’ या विचारांशी तो बांधील राहिला, तसेच जगला आणि ती बांधीलकी उराशी जपतच त्याने हौतात्म्य पत्करले. कुपवाडय़ाच्या जंगलात अतिरेक्यांचा खात्मा करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करताना एका क्षणी समोरून आलेल्या गोळ्यांनी संतोषचा वेध घेतला आणि देशासाठी जगण्याचे व देशासाठी मरण्याचे त्याने अभिमानाने उराशी जपलेले एक स्वप्न दुर्दैवाने खरे ठरले. या लढाईत संतोषला प्राण गमवावे लागले असले, पण तो हरला नाहीच. देशासाठी प्राणाची बाजी लावून त्याने अखेर ही लढाई जिंकलीच. संतोषच्या वीरमरणानंतर उभ्या देशाने अश्रू ढाळले असतील, पण दुसरीकडे त्याच्या हौतात्म्याच्या आणि देशप्रेमाच्या अभिमानाने देशाची मान नक्कीच उंचावलीदेखील आहे. एखाद्या कुटुंबातील एक कर्तासवरता उमदा तरुण असा अवचित गमावल्यानंतर त्या कुटुंबावर होणाऱ्या मानसिक आघाताची कल्पना करणे अवघड नाही. तरीही, अशाही स्थितीत, त्याच्या शोकाकुल कुटुंबाची छाती संतोषच्या वीरमरणामुळे अभिमानाने फुलून आली, तेव्हा संतोष आणि त्याच्या देशभक्त कुटुंबाविषयीच्या आदराने प्रत्येकाचे मन निश्चितच भारावून गेले असेल. संतोष महाडिकची वीरगती ही केवळ एका जवानाची शौर्यकथा नाही. ती देशभक्तीच्या आणि राष्ट्रप्रेमासाठी सर्वोच्च त्यागाची तयारी करण्याच्या मानसिकतेची गाथा आहे. आपला जन्म बलिदानासाठीच झाला आहे, याच धारणेतून लहानपणीच सैनिकी शिक्षणाकडे वळलेल्या संतोषने आपल्या सर्वोच्च बलिदानातून विजय मिळवला आहे. आज देशात ‘एक श्रेणी एक निवृत्तिवेतन’सारख्या मुद्दय़ावर निवृत्त लष्करी अधिकारी बंडाचे झेंडे हाती घेऊन सरकारसमोर उभे ठाकले आहेत. नेमक्या अशाच संवेदनशील परिस्थितीत, कर्नल संतोषच्या कुटुंबाचा निर्धार हेलावून टाकणारा आहे. आपली दोन्ही मुले लष्करात दाखल होऊन देशसेवा करतील असा निर्धार करणाऱ्या संतोषच्या पत्नीला त्या क्षणी दु:खाचे कढ अनावर झालेही असतील, पण त्यावर मात करून या वीरपत्नीने राष्ट्रभक्तीचे आगळे उदाहरण देशासमोर ठेवले आहे. म्हणूनच संतोष आणि त्याचे राष्ट्रभक्त कुटुंब देशाची शान ठरले आहेत.