जवळपास तीन-चार कोटी लोकसंख्या, तरीही हक्काचा देश नाही म्हणून सार्वत्रिक उपेक्षा, जनसंहार आणि भटकंती वाटय़ाला आलेली कुर्दिश जमात पुन्हा एकदा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या गुंत्याची सुरुवात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कृपेने झाली. उत्तर सीरियातील अमेरिकी फौजा माघारी बोलावण्याचा त्यांचा निर्णय अयोग्य असल्याचा ठपका खुद्द त्यांच्याच देशात त्यांच्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी ठेवलेला आहे. ‘दुसऱ्यांच्या निरुपयोगी लढाया लढण्यात रस नाही. तसेही कुर्दिशांना अमेरिकन सैनिकांविषयी फार ममत्व नाहीच’, असे ट्वीट करून ६ ऑक्टोबर रोजी ट्रम्प यांनी सीरिया-तुर्कस्तान सीमावर्ती भागातून फौजा माघारीची घोषणा केली. त्याच्या आदल्या रात्रीच त्यांचे तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांच्याशी बोलणे झाले होते. वास्तविक सीरिया आणि इराकचा विशाल भूभाग इस्लामिक स्टेट वा आयसिसच्या ताब्यातून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने राबवलेल्या मोहिमेत कुर्दिश बंडखोर आणि तुर्कस्तान हे दोघेही सहकारी होते. कुर्दिश बंडखोरांचा प्रामुख्याने भरणा असलेला पीपल्स प्रोटेक्शन ग्रुप (वायपीजी) हा गट आयसिसचा बीमोड करण्यात आघाडीवर होता. त्यांनी आयसिसला मागे रेटून जिंकलेल्या भूमीवर कब्जा केला. सीरिया-तुर्कस्तानच्या सीमेवरील या भूभागावर सध्या पीपल्स प्रोटेक्शन ग्रुपचे नियंत्रण असून त्यांच्या ताब्यात आयसिसचे ११ हजार कैदी याच ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आयसिस जिहादींच्या कुटुंबीयांच्या, तसेच काही हजार निर्वासितांच्या छावण्या याच भागात आहेत. पण यात एक मोठी अडचण म्हणजे, पीपल्स प्रोटेक्शन ग्रुप ही तुर्कस्तानात सक्रिय असलेल्या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीची शाखा आहे. या संघटनेचा तुर्कस्तानमध्ये जवळपास दशकभर लढा सुरू आहे. कारण जगातील सर्वाधिक दीड ते दोन कोटी कुर्द लोक तुर्कस्तानमध्ये राहतात. तुर्कस्तान, सीरिया, इराण आणि इराक या चार देशांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या भूभागात एक दिवस स्वतंत्र कुर्दिस्तान राष्ट्र निर्माण होईल, अशी आशा या जमातीला अजूनही वाटते. या स्वतंत्र राष्ट्रनिर्मितीची चळवळ तुर्कस्तानात सर्वाधिक तीव्र आहे. आता सीरियाच्या तुर्कस्तानशी लागून असलेल्या सीमा भागात आणखी एका कुर्दिश गटाचे नियंत्रण प्रस्थापित होणे एर्दोगान यांना मान्य नाही. तुर्कस्तान आणि कुर्दिश बंडखोरांमध्ये समेट व्हावा, या दोघांतील संघर्षांचा परिणाम आयसिसविरोधी लढय़ावर होऊ नये, यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळेच आयसिसविरोधी प्राधान्याच्या मोहिमेत या दोन परस्परविरोधी पक्षांना सामावून घेणे त्यांना जमले. त्यांच्या ठायी असलेला द्रष्टेपणा व मुत्सद्देगिरी ट्रम्प यांच्या ठायी तिळमात्र नाही! त्यामुळे त्यांनी मागचा-पुढचा कोणताही विचार न करता, सीरियाच्या उत्तरेकडे असलेल्या अमेरिकी फौजा माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेत असताना, एर्दोगान यांना निर्बंधांची पोकळ धमकीही देऊन टाकली. तिला एर्दोगान किती महत्त्व देतात, हे दुसऱ्याच दिवशी दिसून आले. कारण अमेरिकी फौजांना माघारी परतण्याची उसंतही न देता, तुर्की फौजांनी सीरियातील कुर्दिश तळांवर हल्ले सुरूही केले. या हल्ल्यांत एकदा तर अमेरिकी जीवितहानीच व्हायची बाकी राहिली होती. या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी आता सीरियाचे अध्यक्ष बाशर अल असाद आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही लक्ष घातले आहे. तुर्कस्तानच्या बरोबर असादविरोधी सीरियन बंडखोरही आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल. परिणामी येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा सीरियाचा उत्तर भाग युद्धजन्य आणि उद्ध्वस्त होण्याची चिन्हे आहेत. परंतु ट्रम्प यांचे लक्ष पुढील वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे असल्यामुळे त्यांना असल्या किरकोळ बाबींमध्ये रस नसावा!