सीरियातील युद्धभूमीवर सध्या सुरू असलेला गोंधळ हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या इतिहासात ‘न भूतो न भविष्यती’ असाच असून, तेथे कोण कोणाचे शत्रू वा मित्र आहे हे त्यांचे त्यांनाही कळेनासे झाले असल्यासारखी परिस्थिती आहे. सीरियाच्या सीमेवरील रशियाचे लढाऊ विमान तुर्कस्तानने पाडल्याची मंगळवारची घटना हे त्याचे ताजे उदाहरण. सीरियातील आयसिसविरोधी नाटोच्या फौजा लढत आहेत. तुर्कस्तान हा नाटोचा सदस्य देश. रशियाही सीरियातील बंडखोरांविरोधात लढत आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी रशियाचे हे विमान गेले होते. ते तुर्कस्तानी विमानांनी पाडले. याचे कारण ते तुर्कस्तानच्या हद्दीत बेकायदा घुसले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. रशियाच्या म्हणण्यानुसार तसे काहीही नव्हते. ते सीरियाच्या हद्दीतच होते आणि त्या हद्दीतच कोसळले. त्या विमानाचा एक चालक नंतर सीरियाच्या लष्कराच्या हाती लागला. हे पाहता तुर्कस्ताननेच आगळीक करून हे विमान पाडले असून, हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दिली आहे. यात चूक कोणाची हा आता मुद्दाच राहिलेला नसून, रशिया आणि तुर्कस्तानचे संबंध या घटनेमुळे कमालीचे ताणले गेले आहेत. रशिया आज तरी सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या बाजूने उभा आहे. याचे कारण सीरियात असलेले रशियाचे हितसंबंध. त्यामुळे असाद यांच्याविरोधात लढणाऱ्या बंडखोरांच्या टोळ्यांविरोधात रशियाने कारवाई सुरू केली आहे. यातील काही बंडखोरांच्या टोळ्यांना अमेरिका आणि नाटो देशांचा पाठिंबा आहे. याचे कारण अमेरिकेला असाद यांची सत्ता उलथवून लावायची आहे. आयसिसचे उद्दिष्टही तेच आहे. मात्र अमेरिकेचा आयसिसला विरोध आहे. थोडक्यात आयसिस आणि अन्य बंडखोरांचा व अमेरिकेचा असाद यांना विरोध आहे. त्यात सौदी अरेबियाचाही समावेश आहे. या बंडखोर टोळ्यांना अमेरिका सर्व प्रकारची मदत करीत आहे. पण रशिया या बंडखोरांच्या विरोधात आहे कारण रशियाला असाद हवे आहेत. आणि या सर्व देशांचा आणि बंडखोरांचा आयसिसला विरोध आहे. यातही मौज अशी की या बंडखोरांच्या वेगवेगळ्या टोळ्या एकमेकांविरोधातही लढत आहेत. असा हा एकंदर राजकीय घोळ आहे. सीरियात सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या क्रांतीपासून तुर्कस्तान तेथील बंडखोरांच्या बाजूने आहे. परंतु त्यांचा सीरियातील कुर्दी बंडखोरांना विरोध आहे. रशिया बिगरकुर्दी बंडखोरांवर करीत असलेल्या हल्ल्यांमुळेच तुर्कस्तान रशियाला विरोध करीत आहे. यापूर्वीही तुर्कस्तानने रशियाच्या विमानांना अटकाव केला होता. परवा त्यातीलच एक विमान त्यांनी पाडले. पुतिन यांनी याचे वाईट परिणाम होतील असा इशारा दिला आहे. अर्थात युक्रेन आणि सीरियात अडकलेला आणि आंतरराष्ट्रीय र्निबधांच्या ओझ्याने वाकलेला रशिया आणखी एखादे युद्ध ओढवून घेण्याची आज तरी शक्यता नाही. मात्र त्याचा परिणाम सीरियातील संघर्षांवर झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे असेच सुरू राहिले तर त्याचा फायदा अंतिमत: आयसिसलाच होणार आहे. याचे कारण आयसिसविरोधात लढणारे हे देश एकमेकांचा शक्तिपात करण्यातच अधिक रस घेत आहेत. या सगळ्यांत तर अमेरिकेची मोठीच अडचण झाली आहे. धरले तर चावते आणि सोडले तर पळते हे ओबामांनी इराक आणि अफगाणिस्तानमध्ये अनुभवले. तीच पाळी त्यांच्यावर सीरियातही आली आहे. सीरियातील िहस्र गोंधळाचा अंत सध्या तरी कोणाच्याही नजरेसमोर नाही.