युक्रेनियन एअरलाइन्सचे विमान इराणची राजधानी तेहरानमध्ये इराणच्याच सुरक्षा यंत्रणेकडून ‘चुकून’ पाडले जाणे आणि त्यात १७६ प्रवाशांचा हकनाक जीव जाणे, हा इराणमधील स्फोटक परिस्थितीचा एक दुखद परिपाक. नववर्षांच्या सुरुवातीला, ३ जानेवारी रोजी अमेरिकेने इराणचा दुसऱ्या क्रमांकाचा उच्चपदस्थ लष्करी कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी याची बगदादमध्ये ड्रोनच्या साह्य़ाने हत्या केली. तोवर निव्वळ धमक्या-प्रतिधमक्यांपुरताच असलेला अमेरिका-इराण संघर्ष या घटनेनंतर गंभीर वळण घेणार हे अपेक्षित होते. इराण कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्युत्तर देणार हेही अपेक्षित होते. इराकमधील अमेरिकी तळ व सैनिक यांना इराण लक्ष्य करेल अशी भीती अमेरिकेला वाटत होती. त्यानुसार ८ जानेवारीच्या मध्यरात्री इराणने इराकमधील अमेरिकी तळांवर २२ क्षेपणास्त्रे डागली. यात अमेरिकेची कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर अमेरिकेकडून प्रतिहल्ला होईल, या अपेक्षेने इराणी क्षेपणास्त्र बचाव यंत्रणा सुसज्ज होती. पण ती सजग नसावी. कारण पहाटे सहा वाजता तेहरान विमानतळाच्या जवळ झालेली ‘हालचाल’ अमेरिकेकडून आलेले क्रूझर क्षेपणास्त्र मानले गेले आणि त्याचा निपात केला गेला. प्रत्यक्षात ते तेहरान विमानतळावरून उडालेले युक्रेनियन एअरलाइन्सचे, बोइंग ७३७ बनावटीचे प्रवासी विमान होते. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या, रशियन बनावटीच्या एसए-१५ क्षेपणास्त्राने क्षणार्धात विमानाचा निकाल लावला. इराणच्या सर्वशक्तिमान रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने हे क्षेपणास्त्र डागले. त्यावर इराणच्या लष्कराचे कोणतेही नियंत्रण नव्हते. इतकेच नव्हे, तर युक्रेनच्या विमानाला उड्डाण करण्याचे निर्देश तेहरान विमानतळाच्या ज्या हवाई नियंत्रकांनी दिले, त्यांचाही रिव्होल्युशनरी गार्ड कोअरशी कोणताही समन्वय नव्हता. या दुर्घटनेत सर्वाधिक ८२ प्रवासी इराणचेच मारले गेले. त्यापाठोपाठ ६३ कॅनेडियन, ११ युक्रेनियन अशी मनुष्यहानी झाली. इराणी मृतांमध्ये अनेक विद्यार्थी होते, जे नंतर कॅनडातील एडमंटन येथे विद्यापीठात शिकायला जाणार होते.

दोन वा अधिक देशांच्या व्यक्त किंवा सुप्त संघर्षांत प्रवासी विमान पाडले जाण्याची ही अर्थातच पहिली घटना नाही. बहुतेक घटनांमध्ये विमान पाडले जाण्याची घटना गैरसमजातून किंवा चुकीतून घडलेली आहे. परंतु या सर्व घटनांमध्ये सार्वत्रिक निष्काळजीपणा आणि मानवी जीविताविषयी संवेदनशून्यता दिसून आली. ३० वर्षांपूर्वी अमेरिकेने इराणच्या आखातात इराणचेच प्रवासी विमान क्षेपणास्त्राने पाडले. त्या दुर्घटनेत २९० प्रवासी – यात ६६ लहान मुले होती – मृत्युमुखी पडले. त्यावेळी इराण-इराक युद्ध सुरू होते. अमेरिकेने इराकची बाजू घेतली होती. इराणचे विमान पाडले गेले, त्याच्या जरा आधी दोन अमेरिकी युद्धनौका आणि काही इराणी नौकांमध्ये चकमक सुरू होती. त्याच वेळी त्या टापूवरून इराण एअरवेजचे विमान जाऊ लागले. ते इराणी नौकांच्या मदतीसाठी आलेले लढाऊ विमान समजून पाडले गेले. त्याच्या पाच वर्षे आधी न्यूयॉर्कहून अलास्कामार्गे सोलच्या दिशेने उड्डाण केलेले कोरियन एअरलाइन्सचे प्रवासी विमान तत्कालीन सोव्हिएत महासंघाच्या सागरी हद्दीत कामचात्का द्वीपकल्पाजवळ पाडले गेले. विमानातील सर्व २६९ प्रवासी आणि कर्मचारी मरण पावले. त्या काळात अमेरिकी- सोव्हिएत शीतयुद्ध शिगेला पोहोचले होते. सोव्हिएत महासंघ कामचात्का द्वीपकल्पात एक महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी घेणार होता, ज्यावर ‘नजर’ ठेवण्यासाठी अमेरिकी हवाई दलाचे बोइंग बनावटीचे विमान त्या भागात टेहळणी करत होते. या विमानाची खबर सोव्हिएत यंत्रणेला लागली. पण बोइंग बनावटीच्याच प्रवासी विमानाला ते टेहळणी विमान समजले. शहानिशेच्या फार खोलात न जाता, सोव्हिएत यंत्रणेने विमानाचा निकाल लावला! पाच वर्षांपूर्वी मलेशिया एअरलाइन्सचे प्रवासी विमान युक्रेनच्या हद्दीत रशियन बंडखोरांनी पाडले. २९८ प्रवाशांचे प्राण घेणाऱ्या या घटनेला युक्रेन-रशिया संघर्षांची पाश्र्वभूमी होती. विशेष म्हणजे या तिन्ही घटनांमध्ये दोषी व्यक्तींना शासन झालेले नाही. त्यामुळे ताज्या चौथ्या घटनेतही ते होईल किंवा मृतांना न्याय मिळेल, ही शक्यता नाही.

तेहरानमध्ये झालेल्या दुर्घटनेचा दोष सर्वार्थाने दोन व्यक्तींना द्यावा लागेल :  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी. ट्रम्प यांचे पूर्वसूरी बराक ओबामा यांनी महत्प्रयासाने बसवलेली इराणची घडी ट्रम्प यांनी पार बिघडवून, विस्कटून टाकली आहे. ट्रम्प यांच्या युद्धखोरीमुळे इराण क्रुद्धच नव्हे, तर झपाटय़ाने पुन्हा अण्वस्त्रसज्जही होऊ लागला आहे. दुसरीकडे, कासिम सुलेमानीसारखे लष्करी कमांडर विविध देशांमध्ये सक्रिय ठेवून इराणही युद्धखोरीची सव्याज परतफेडच करत आहे. इराणमध्ये धोरण नियंत्रण खामेनींसारख्या धार्मिक नेत्याकडे असल्यामुळे, धर्मयुद्धासारख्या मध्ययुगीन संकल्पनांतून हा देश अजूनही बाहेर पडू शकत नाही. आता मध्ययुगीन असो वा आधुनिक, पण या दोन नेत्यांच्या युद्धखोरीची किंमत १७६ निष्पापांना हकनाक मोजावी लागली आहे.