अनेक विषयांमुळे अमेरिकेतील एका महत्त्वाच्या घडामोडीची चर्चा आपल्याकडे फारशी झाली नाही. मात्र तिची दखल घेणे आवश्यक आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांना ‘माघारी बोलावण्या’च्या प्रस्तावावर झालेल्या मतदानात, या प्रस्तावाच्या विरोधात म्हणजे न्यूसम यांच्या बाजूने घसघशीत मतदान झाले. न्यूसम हे डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर. त्यांना पदभ्रष्ट करण्यासाठी कंबर कसली अर्थातच रिपब्लिकन पक्षाने. परंतु अमेरिकेतील या सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यातील ही घडामोड अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची. कारण हा कौल होता न्यूसम यांच्या त्या राज्यातील करोना हाताळणीच्या बाजूने. ती कशी असावी वा नसावी याविषयी अमेरिकेत राजकीय पक्ष व जनमत दुभंगलेले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची भूमिका ही विज्ञानाधारित आणि साथनियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या बाजूची आहे. परंतु रिपब्लिकन जनमत तसे मानायला तयार नाही. यास्तव लशी उदंड उपलब्ध असूनही निव्वळ ती घेण्यात विविध कारणांनी टाळाटाळ (वॅक्सिन हेजिटन्सी) केल्यामुळे अमेरिकेच्या करोनाविरोधी लढ्याला म्हणावे असे यश आलेले नाही. किंबहुना, युरोपातील अनेक समृद्ध देशांच्या तुलनेत अमेरिकेतील करोनानियंत्रण कार्यक्रम ढिसाळच मानावा लागेल. दिवसाकाठी लाखभर बाधित आणि हजार बळी हे दुसऱ्या लाटेदरम्यान दिसलेले भेसूर समीकरण पुन्हा आढळू लागले आहे. रिपब्लिकन नेते आणि समर्थकांचा करोनाप्रति प्रच्छन्न बेजबाबदारपणा हे याचे प्रमुख कारण. यंदा ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेवरील सर्वांत भीषण दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाली. ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या त्या हल्ल्यात जवळपास ३००० नागरिक दगावले होते. परवा ११ सप्टेंबर याच एका दिवशी कोविडमुळे ३१०० बळींची नोंद त्या देशात झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी हा आकडा ३२०० इतका नोंदवला गेला. ही आकडेवारी जगातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांपैकी एक असलेल्या देशातली आहे. कारण रिपब्लिकनांचे प्राबल्य असलेल्या मिसुरी, लुइझियाना व टेक्साससारख्या दक्षिणी राज्यांमध्ये लस घेणे म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर आणि उद्यमशीलतेवर बंधने घातल्यासारखे असल्याचे वारंवार भासवले जाते. याच राज्यांमध्ये बाधितांचे आणि बळींचे प्रमाणही अधिक आहे, कारण तेथे लसीकरण पुरेसे झालेले नाही आणि डेल्टा या करोना उपप्रकाराने त्यामुळे तेथे हैदोस घातला आहे. निर्बंध आणि लसीकरण हे दोन कार्यक्रम समांतर राबवणे ही तारेवरची कसरत. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्य आणि उद्यमस्वातंत्र्याविषयी जाणिवा तीव्र असल्या, तरी त्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांच्या धोरणांमुळे त्या देशाला मोठ्या मनुष्यहानीला सामोरे जावे लागले. ‘उपचार न स्वीकारण्याचा तुमचा हक्क मान्य, पण म्हणून दुसऱ्याला बाधित करण्याचा अधिकार तुम्हाला खचितच नाही’, असा खणखणीत इशारा त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अगदी १९०५मध्येच व्यक्तिस्वातंत्र्याचे टुमणे वाजवणाऱ्यांना साथनियंत्रणाच्या संदर्भातच दिलेला होता. कॅलिफोर्नियासारख्या समृद्ध राज्यात यानिमित्ताने लस व निर्बंध जबरदस्तीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकावा, या विचारात रिपब्लिकन नेतृत्व होते. त्यांना कॅलिफोर्नियाच्या सुजाण मतदारांनी सणसणीत चपराक लगावली आहे.