13 December 2019

News Flash

‘बाहुबली राज्या’च्या दिशेने?

हा अपघात की घातपात याची चौकशी उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनीच सीबीआयकडे वळवण्याची तयारी दर्शवली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशातील  उन्नाव येथील बलात्कार पीडितेला, तिच्या दोन नातेवाईकांना आणि वकिलाला झालेला भीषण अपघात हा या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेपाविषयी संशय वाढवणारा ठरतो. या अपघातात पीडितेच्या दोन्ही नातेवाईकांचा मृत्यू झाला, तर पीडिता व तिचा वकील जबर जखमी झाले. राजकीयदृष्टय़ा प्रभावशाली व्यक्तींच्या विरोधात दाद वा न्याय मागणाऱ्यांचा रस्ते अपघातात ‘निकाल’ लावल्याचे प्रकार आपण आजवर हिंदी चित्रपटांत असंख्य वेळा पाहिले असतील; परंतु सत्य हे कल्पितापेक्षा क्लेशकारी असू शकते, याची प्रचीती उत्तर प्रदेशात रायबरेली येथे झालेल्या या अपघाताने दिली.  हा अपघात की घातपात याची चौकशी उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनीच सीबीआयकडे वळवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना तर या प्रकरणात सकृद्दर्शनी काहीच संशयास्पदही आढळलेले नाही. तरीही प्रकरण स्वत:च्या अखत्यारीतून इतरत्र वळवावे लागते, हा विरोधाभास नव्हे काय? याचा अर्थ या पीडितेला उत्तर प्रदेश पोलिसांकडून न्याय मिळणार नाही, असे त्यांना वाटते का? उन्नाव पीडितेला एक सशस्त्र पोलीस व दोन महिला कॉन्स्टेबल अशी तिघांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. या तिघांपैकी एकही अपघातग्रस्त मोटारीत नव्हते. कारण काय? तर मोटारीत ‘पुरेशी जागा नव्हती’! अपघातग्रस्त ट्रकच्या नंबर प्लेटवरील क्रमांक खरवडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यावर काळा रंगही लेपण्यात आला होता. हा ट्रक उलटय़ा दिशेने भरधाव निघाला होता. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता हे सर्वच्या सर्व तपशील म्हणजे योगायोगच, असे मानणे तपास यंत्रणांनाही अशक्य ठरेल. उत्तर प्रदेशातील बांगरमाव येथील भाजप आमदार कुलदीपसिंग सेनगर यांच्यावर त्यांनी पीडितेवर २०१७ मध्ये त्यांच्या निवासस्थानी बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्या वेळी पीडिता अल्पवयीनही होती. न्यायदानात होत असलेल्या विलंबाला वैतागून याच पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेशातील सत्तारूढ भाजप सरकार आणि त्या राज्यातील भाजपचे काही नेते यांनी या प्रकरणाविषयी पुरेसे गांभीर्य आणि संवेदनशीलता बाळगलेली नाही, हे वारंवार दिसून आले आहे. पीडिता व तिच्या वकिलाला झालेला अपघात,  जीवितहानी हे उत्तर प्रदेशातील गृह व न्याययंत्रणेचे अपयश मानावे लागेल. सेनगर यांच्यावर वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या वडिलांना भलत्याच प्रकरणात गुंतवून सेनगर यांचा भाऊ  व त्याच्या साथीदारांनी पोलीस कोठडीतच मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. परवाच्या अपघातात मृत्युमुखी पडलेले दोन्ही नातेवाईक उन्नाव बलात्कार प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार होते. मात्र उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी तर गेल्याच महिन्यात सेनगर यांची भेट घेऊन निवडणुकीतील योगदानाबद्दल त्यांचे आभारही मानले, तेव्हा सेनगर यांचे राजकीय महत्त्व स्पष्ट झाले होते. आजतागायत सेनगर यांच्यासारख्या वादग्रस्त आमदारावर भाजप पक्षनेतृत्वाने अपात्रतेचीही कारवाई केलेली नाही. उन्नावसारखी प्रकरणे उत्तर प्रदेशचा ‘बाहुबली राज्या’च्या दिशेने प्रवास सुरू झाल्याचा पुरावा ठरू नयेत, न्यायदान प्रक्रियेतील विलंब जणू अंगवळणी पडत असताना पीडितांचा छळ करून साक्षीदारांना संपवण्याचा भयानक पायंडा या प्रकरणाने पडू नये, राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याकडे सर्वाधिक वेगाने निघाल्याचा दावा करणाऱ्या राज्यकर्त्यांवर सामाजिक असुरक्षिततेचा डाग राहू नये, ही लोकेच्छा ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न व्हावयास हवेत. अपघातानंतर सेनगर यांच्यावर दाखल झालेला मनुष्यवधाचा गुन्हा ही यातील पहिली पायरी ठरणार आहे.

First Published on July 30, 2019 12:04 am

Web Title: unnao woman who accused bjp mla of rape injured in accident abn 97
Just Now!
X