जिनिव्हा शहरात अमेरिका-रशिया शिखर परिषदा यापूर्वीही झालेल्या आहेत. १९५५मध्ये अमेरिकी अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाचे नेते निकिता क्रुश्चेव्ह यांची पहिली शिखर परिषद या शहरात झाली. १९८५ मध्ये याच शहरात तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष रोनाल्ड रीगन आणि सोव्हिएत नेते मिखाइल गोर्बाचेव्ह भेटले आणि त्यांनी अण्वस्त्रकपातीच्या मार्गाने शीतयुद्धसमाप्तीची मुहूर्तमेढ रोवली. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे जो बायडेन आणि रशियाचे व्लादिमीर पुतीन यांची भेट बुधवारी झाली. त्यात पहिल्या भेटीची नवलाई नव्हती किंवा रीगन-गोर्बाचेव्ह भेटीप्रमाणे काही ठोस ठरवले जाईल, अशी अपेक्षाही नव्हती. परंतु या दोन महासत्ताधीशांचे समक्ष भेटणे महत्त्वाचे होते आणि बायडेन यांनी तसे बोलूनही दाखवले. एरवी अशा नेत्यांचे भेटणे जागतिकीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाई. या भेटीत मात्र द्विपक्षीय मुद्दे प्राधान्याने चर्चिले गेले. अमेरिकी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप, अमेरिकी खासगी वा सरकारी आस्थापनांवर सायबर हल्ले हे स्थानिक मुद्दे; तसेच अलेक्सी नवाल्नीसारख्या राजकीय विरोधकांची जाहीर गळचेपी आणि युक्रेन आदी पूर्व युरोपीय राष्ट्रांच्या भौगोलिक सार्वभौमत्वाची पायमल्ली हे आंतरराष्ट्रीय मुद्दे दोन्ही देशांतील सकारात्मक, विधायक संबंधांच्या मार्गातील प्रमुख अडथळे असल्याचे बायडेन यांनी पुतीन यांना सांगितले आहे. बराक ओबामा प्रशासनात उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना आणि त्याही आधी अनेक अमेरिकी परराष्ट्रसंबंधविषयक तसेच सामरिक विषयांशी संबंधित समित्यांवर काम करताना रशियातील राजकीय संस्कृतीचा, रशियाच्या नेत्यांचा आणि त्यांच्या तऱ्हेवाईकपणाचा पुरेसा अनुभव बायडेन यांनी घेतलेला आहे. पुतीन किंवा चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग अशा प्रभावी परंतु बेभरवशाच्या एकाधिकारशहांच्या बाबतीत गळाभेट किंवा गळा पकडणे यांपैकी कोणताच मार्ग यशस्वी ठरत नाही, हे व्यवस्थित जाणण्याइतके पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत. पुतीन शिखर परिषदेपूर्वी त्यांनी प्रामुख्याने युरोपिय सहकारी देशांचा समावेश असलेल्या असलेल्या जी-७ आणि ‘नाटो’ समूहातील नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. अमेरिकेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे होते. कारण लोकशाही आणि मुक्त व्यापाराचा पाया असलेल्या जी-७ राष्ट्रांचा किंवा सामरिक-सुरक्षेच्या मुद्द्यावर  ‘नाटो’ राष्ट्रांचा, त्या संकल्पनांचा जाहीर अपमान करण्याचे अत्यंत चुकीचे धोरण बायडेन यांचे पूर्वसुरी डोनाल्ड ट्रम्प यांनी राबवले आणि अमेरिकेला निष्कारण एकाकी पाडून घेतले. लोकशाहीवादी राष्ट्रांच्या मैत्रीची विस्कटलेली बैठक स्थिरस्थावर करणे हे कदाचित पुतीन यांच्या भेटीपेक्षा अधिक महत्त्वाचे होते. ती कामगिरी पार पाडून, तो आत्मविश्वास घेऊनच बायडेन जीनिव्हात दाखल झाले होते. पुतीन यांची विद्यमान धोरणे काही बाबतींत सोव्हिएतकालीन नेत्यांपेक्षा अधिक भ्रष्ट व लोकशाहीमारक आहेत. नवाल्नीसारख्या विरोधकांवर विषप्रयोग करणे, युक्रेनमध्ये क्रिमियाचा घास घेणे, बेलारूसचे हुकूमशहा लुकाशेन्को यांची पाठराखण आणि सायबर तंत्रज्ञानाच्या जोरावर अमेरिकेची निवडणूक किंवा आस्थापनांमध्ये घुसखोरी करून त्यांचा विध्वंस करणे असे विविधांगी उद्योग त्यांच्या कोणत्याही पूर्वसुरींनी केले नसावेत. अशा नेत्याला वठणीवर आणणे किंवा किमान इशारा देणे एका भेटीतून शक्य नसते. तरीही अण्वस्त्रकपातीच्या चर्चेला पुन्हा सुरुवात करणे आणि परस्परांचे राजदूतावास पुनस्र्थापित करणे या मुद्द्यांवर सहमती झाली, हे या भेटीचे फलितच म्हणावे लागेल. रीगन यांनी सोव्हिएत महासंघाचा उल्लेख ‘सैतानी साम्राज्य’ असा केला होता. बायडेन यांनी पुतीन यांना ‘खुनी’ असे संबोधले होते. तरीही या मंडळींशी चर्चा करण्याचे अमेरिकेने सोडले नाही. ती त्या देशाची संस्कृती आहे. बायडेन यांनी ती पुनरुज्जीवित केली. जीनिव्हा शिखर बैठकीच्या निमित्ताने याची सुरुवात झाली.