इतिहास स्वत:च स्वत:ला पुनरावृत्त करीत असतो असे म्हणतात. अमेरिकेने ते विधान शतश: योग्य ठरविण्याचा विडा उचलला आहे असेच त्यांच्या सध्याच्या सीरियाविषयक धोरणातून दिसत आहे. सीरियातील संघर्ष थांबण्याची चिन्हे नसल्याचे पाहून आता तेथे अमेरिकी लष्कराच्या तुकडय़ा उतरविण्याचा गंभीर विचार ओबामा प्रशासन करीत आहे. अद्याप हे प्रस्तावाच्या पातळीवरच असले, तरी ओबामा प्रशासनावर त्याबाबत अमेरिकी लष्कराचा मोठा दबाव आहे. मुळातच सुमारे दोन महिन्यांपूर्वी रशियाने सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या बाजूने आपले वायुदल उतरविल्यापासून ओबामा प्रशासनात मोठी अस्वस्थता आहे. या संघर्षांत अमेरिकेसमोर दोन उद्दिष्टे होती. एक म्हणजे आयसिसचा पाडाव आणि दुसरे म्हणजे असाद यांना सत्ताच्युत करणे. हा खेळच मुळी विचित्र आहे. त्यात एका दृष्टीने आयसिस आणि अमेरिका एका बाजूला आहेत, तर दुसरीकडे ते दोन्ही एकमेकांचे शत्रू आहेत. अमेरिका एका बाजूला आयसिसविरोधात लढणाऱ्या बंडखोर गटांना साह्य़ करीत आहे, त्याचवेळी आयसिसविरोधात लढणाऱ्या असाद यांच्याविरोधातील शक्तींनाही बळ देत आहे. यामुळे सीरियातील लढाई आज ‘चेकमेट’च्या अवस्थेत आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग लष्कराने काढावा यासाठी अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर हे पेंटॅगॉनवर दबाव आणत असून, त्यातून जे पर्याय समोर आले आहेत त्यात थेट जमिनीवरून चढाई करण्याचा पर्याय अग्रस्थानी आहे. हे जे सुरू आहे ते अमेरिकेचा पाय आणखी खोलात नेणारेच ठरणार आहे यात शंका नाही. इतिहासाने अफगाणिस्तान आणि इराकच्या भूमीतून हा धडा एकदा दिलेला आहे. अफगाणिस्तान आणि सीरिया यांतील साम्य तर सहजी लक्षात येणारे आहे. तेथे सोव्हिएत रशियाने घुसविलेल्या फौजा परतवून लावण्यासाठी अमेरिकेने मुजाहिदीनांना पाठिंबा दिला. पाकिस्तानच्या साह्य़ाने तालिबान नावाचा राक्षस उभा केला. ओसामा बिन लादेन हा तेव्हा सीआयएचा लाडका होता. पुढे रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतली आणि त्यातून निर्माण झालेली पोकळी तालिबान्यांनी भरून काढली. आयसिसचा जन्मही नेमका अशाच स्वार्थी आणि अदूरदृष्टीच्या राजकारणातून झाला आहे. अमेरिका आणि तिच्या कच्छपी लागलेल्या ब्रिटनसारख्या देशांनी खोटारडेपणा करून इराकच्या सद्दाम हुसेन यांच्याविरोधात सर्व जगास पेटविले. त्यात इराक बेचिराख झाला. त्याचा लाभ उठवत इराणने इराकी शियांना बळ देण्यास सुरुवात केली. त्यातून सुन्नी चवताळले. आयसिसचा जन्म त्या सुन्नी बंडखोरांच्या संतापातून झालेला आहे. त्यातील काही बंडखोर गट सीरियातील असाद राजवटीविरोधात लढत होते. त्यांना अमेरिकेने साह्य़ केल्याची वदंता आहे. थोडक्यात, अल् कायदाहून भयंकर असलेल्या आयसिसचे अनौरस पितृत्व अमेरिकेकडेच जाते. आता मध्य पूर्वेतील अमेरिकेचे आजवरचे सगळे राजकारण मोडून काढण्यास ही संघटना उभी ठाकली आहे. तेव्हा तिला संपविणे हे अमेरिकेस आवश्यक आहे. त्याचबरोबर अमेरिकेला असादही नकोसे आहेत. असाद यांचा सद्दाम हुसेन करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत. त्यात आज रशियाचा अडथळा आहे. म्हणून सीरियात लष्कर घुसविण्याचा पर्याय समोर आला आहे. एकंदर सीरियातील संघर्ष अफगाणिस्तान वा इराकच्याच वाटेने चालला आहे. तोच खेळ पुन:पुन्हा खेळला जात आहे..